समृद्धी महामार्गासाठी सरकारने अमरावती जिल्ह्यातील ‘प्रश्नचिन्ह’ ही पारधी मुलांची शाळा जमीनदोस्त केली आहे. नोटीस न देताच शाळेवर बुलडोझर चढवून शाळा पाडली, असं शाळेच्या मुख्यध्यापकांनी म्हटलं आहे. शाळा पाडल्यामुळे शाळेतील मुलांचे पालक चिंतेत आहेत.

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तसंच गावातील लोक योग्य वागणूक देत नसत. म्हणून, मतीन भोसले यांनी पारधी मुलांसाठी ‘प्रश्नचिन्ह’ ही शाळा २०१२ मध्ये सुरू केली. घरातल्या सहा बकऱ्या विकून आणि नोकरीतून साठवलेल्या पैशांतून त्यांनी ८५ मुलांच्या मदतीने ही शाळा सुरू केली.

मतीन भोसले ‘प्रश्नचिन्ह’ या पारधी मुलांच्या शाळेचे शिक्षक

२०१५ मध्ये मतीन यांनी सरकारी मान्यता तसंच सवलती मिळाव्या म्हणून बालहक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार दाखल केली. यावर आयोगाने राज्य शासनाला शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली. कायद्यानुसार शाळेला आवश्यक सर्व बांधकाम आणि सोयी सुविधा उपलब्ध असतील तर त्या शाळेला सरकारी मान्यता मिळण्याचा हक्क आहे, असं आयोगाने म्हटलं आहे. परंतु राज्य शासनाने याकडे दुर्लक्ष करत सरकारी मान्यता आणि शासकीय सुविधांपासून या शाळेला आजवर वंचित ठेवलं होतं.

मात्र अमरावतीमधील ‘प्रश्नचिन्ह’ ही पारधी मुलांची शाळा महाराष्ट्र शासनाच्या ७०० किलोमीटर लांब समृद्धी महामार्गासाठी पाडण्यात आली आहे. राज्यातल्या ३९२ गावांतून आणि २६ तालुक्यातुन हा महामार्ग निघणार आहे.

हा समृद्धी महामार्ग पारधी मुलांच्या स्वप्नांच्या आड आला आहे. ‘ आम्ही भेदभाव, नकार, गैरसोयींच्या प्रश्नांना सामोरे गेलो. तेव्हा आम्हाला ‘शिक्षण’ असं उत्तर मिळालं. तर, तुम्ही विस्थापणाचा नवा प्रश्न आमच्या समोर उभा केला आहे’, असा प्रश्न ‘प्रश्नचिन्ह’ शाळेचे शिक्षक मतीन भोसले यांनी उपस्थित केला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *