मोदींना पराभव माहीत नाही कारण त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी एकही निवडणूक हरलेली नाही. सततच्या विजयामुळे अहंकार तर सततच्या उपेक्षेमुळे आक्रमकता आणि आत्मकेंद्रीपणा यांचे मिश्रण त्यांच्या व्यक्तीमत्वात झाले. सत्ता जाणे ही बाब त्यांच्या कल्पनेपलीकडील आहे कारण सतत विजय हा त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीतील महत्वपुर्ण घटक आहे. म्हणून त्यांना सतत माझ्या विरोधात कोणीतरी कट रचत आहे. मला संपविण्याचा प्रयत्न करत अशी त्यांची भयग्रस्त ( paranoid) अवस्था झाली झाली आहे. म्हणून ‘माझ्या मृत्यूची स्वप्ने’ माझे विरोधक पाहत असल्याचा बालिश आरोप मोदी करत आहेत.

निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस माझा मृत्यू इच्छित असल्याचा विचित्र दावा केला. कॉंग्रेस मला ठार करेल , असे भीती व्यक्त करून मते मागण्यासाठी पुलवामा अतिरेकी हल्ल्यानंतर आणखी एक भावनिक कारण पुढे केले. मोदींच्या या वक्तव्याचा अर्थ आणि अन्वयार्थ नेमका काय ? हे पाहणे महत्वाचे आहे.

कणखर आणि बलवान छप्पन इंची छातीचे नेतृत्व, तेवढेच प्रबळ असे बहुमत, सरकार आणि पक्षावर मजबूत पकड, प्रचंड धनसंपत्ती आणि जातीय ध्रुविकरणास बळी पडलेली बहुसंख्य प्रजा, हेच मोदींच्या विराट आणि विशाल क्षमतेचे वास्तव आहे. असे असतानाही मोदींना कॉंग्रेस माझा मृत्यू इच्छित आहे आणि मला ते ठार करतील अशी भयग्रस्त अवस्था का झाली असावी ? याची कारणे शोधताना मोदींची एक नेता म्हणून झालेली जडण घडण आणि त्यांचे मनोविश्लेषण महत्वाचे ठरते!

मोदी हे आजपर्यंत भारतीय इतिहासात झालेल्या इतर कोणत्याही पंतप्रधानांपेक्षा नव्हे, तर इतर सर्व पक्षीय राजकीय नेत्यांपेक्षा सुद्धा अनेक बाबींत वेगळे आहेत. मोदी हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिलेच पंतप्रधान आहेत. जवाहरलाल नेहरू, लाल बहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई आदी नेत्यांनी ब्रिटीश सत्तेच्या विरोधात अनेक आंदोलने केली होती. संसदीय पद्धतीने लढे दिले होते. पी. व्ही नरसिंहराव यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिलेले होते. संसदीय कामकाजात नरसिंहराव यांचा सहभाग इंदिराजीच्या काळापासून होता. त्यानंतर पंतप्रधान झालेले अटलबिहारी वाजपेयी संसदीय राजकारणात जनसंघाच्या माध्यमातून सन १९५२ पासून होते. अडवाणी आणि वाजपेयींनी बहुतांश वेळा पराभव तर कधी विजयही पहिला होता. त्यांना पहिल्यांदा पंतप्रधान पद मिळाले ते १९९६ सालात, तेही अवघ्या १३ दिवसांचे ! त्यानंतर १३ महिन्याचे आणि त्यानंतर साडेचार वर्षाचे ! परंतु वाजपेयी यांनी अनेक पराभव अनुभवले होते आणि खुल्या दिलाने स्विकारले होते. जय पराजय स्थितप्रज्ञ होऊन पाहत त्याचा धैर्याने सामना करत ते पंतप्रधान पदी विराजमान झाले होते. अगदी हीच बाब अडवाणी, व्ही. पी. सिंग, इंद्रकुमार गुजराल यांना देखील लागू पडते. या सर्व नेत्यांनी भारतीय राजकारणात अनेक पराभव पहिले होते आणि त्यातून त्यांचे एक राजकीय व्यक्तिमत्व घडले होते ! शायनिंग इंडियाची प्रचार मोहीम राबवूनही वाजपेयी सरकार पराभूत झाले आणि डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान बनले. वाजपेयी आणि अडवाणींना जसा १९५२ पासून जयापराजयाचा अनुभव होता तसा डॉ.सिंग यांनाही १९९१ पासून १९९६ पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळातील कामकाजाचा होता. आणि त्यांचा तसाच अनुभव १९९८ ते २००४ या काळात विरोधी पक्षनेता म्हणून होता. या सर्व नेत्यांनी केंद्रीय राजकारणात अनेक पराभव पहिले होते. सत्ता हातातून जाताना अनुभवली होती. शिवाय केंद्रीय राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी होता !

नेहरू, पटेल, शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले असले तरीही एक राजकारणी या शिवाय लेखक, पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. नेहरू, शास्त्री आणि इंदिरा गांधी या उच्च विद्याविभूषित होते. इंदिराजी आणि नेहरूंचे शिक्षण विदेशात झाले होते. राजीव गांधी एक राजकारणी अपघाताने बनले पण राजकारणाशिवाय त्यांची ओळख पायलट अशी होती. व्ही. पी. सिंग आणि वाजपेयी हे कवी म्हणून प्रसिध्द होते. नरसिंहराव एक सिद्धहस्त लेखक आणि बहुभाषा कोविद म्हणून प्रसिद्ध होते. इंद्रकुमार गुजराल यांची ओळख दक्षिण आशियायी राजकारणाचे तज्ञ अशी होती. मनमोहन सिंग यांची ओळख एक राजकारणी याशिवाय जागतिक अर्थतज्ञ अशी आहे. हे सर्व नेते देश विदेशात शिक्षण घेतलेले… त्यामुळे जागतिक पातळीवर विचार करण्याची क्षमता तसेच एक व्यापक दृष्टी असणारे नेते होते. स्वतंत्र प्रतिभावान व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होते आणि आहेत .

नेहरूंपासून मोदींपर्यंत सर्वच पंतप्रधान आणि उपपंतप्रधान वाजपेयी वगळता गृहस्थाश्रमी आहेत. मात्र वाजपेयी मिश्किलपणे म्हणत की मी अविवाहित आहे , ब्रह्मचारी नाही ! कारण गृहस्थी जीवनातील नातेसंबधाचे बंध व जबबाबदा-या वाजपेयींनी अविवाहित असूनही सांभाळल्या होत्या. नरेंद्र मोदी मात्र विवाहित असूनही अशा नातेसंबंधात जास्त न रमणारे नव्हे तर गृहस्थाश्रमाचा तिटकारा असणारे व्यक्तिमत्व म्हणून समोर येतात ! त्यातूनच त्यांची संन्यस्त अशी प्रतिमा तयार झालेली आहे. मोदींच्या शिक्षणाबाबतच्या शंकाना सध्या पुर्णविराम मिळाला असला तरीही त्यांच्या व्यक्तीमत्वात त्यांना राजकारणाशिवाय इतर कोणत्याही क्षेत्रात रुची नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे !

नरेंद्र मोदी यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाची जडणघडण अगदी सामान्य कार्यकर्ता इथपासून सुरु झाली आहे. इतर सर्व नेत्यांना काहीना काही स्वरुपात केंद्रीय आणि उच्च वर्तुळातील राजकारणाचा अनुभव होता. मात्र मोदींबाबत असे काहीच नव्हते. पण मोदींकडे एक विलक्षण अशी क्षमता आहे. ती म्हणजे, जे सर्वसामन्यांच्या मनात आहे परंतु सामाजिक व राजकीय नीतिमत्तेच्या बंधनामुळे स्पष्टपणे आजपर्यंत कोणताच नेता बोलत नव्हता अशी बाब मोदी बिनदिक्कतपणे चुकीची असली तरीही बोलतात आणि म्हणून लोकांना ते आपले वाटू लागले असावे.

मोदींना लोकप्रियता लाभली याचे कारण मोदींप्रमाणेच बहुसंख्य प्रजा देखील राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या कितपत प्रगल्भ कि अप्रगल्भ आहे यात लपलेले आहे. सर्वसमावेशक प्रगल्भ विचार करून, विवेक ,विधीनिषेध, तर्क, ज्ञान व बुद्धीआधारे समस्यांचे उत्तर  शोधण्यापेक्षा भावनिक उत्तर शोधून तात्काळ अभासी का असेना पण समाधान देणारा नेता जनतेला जवळचा वाटतो. मोदींबाबत हे चपखल लागू पडते. मोदींना  राजकारणातही लाभलेली प्रसिद्धी ही एका दैवी शक्ती असलेल्या अवतारी पुरूषाप्रमाणे का आहे,  याचे उत्तर यात आहे !

मोदी राजकारणात पूर्वीपासून होतेच मात्र ते महत्वहीन होते. अचानकपणे त्यांचा उदय २००१ साली गुजरातमधील भाजपा अंतर्गत अव्यवस्थेवर तात्पुरते उत्तर म्हणून झाला. परंतु गोध्रामध्ये जे घडले त्याचा पुरेपूर वापर करत मोदी प्रथमच २००२ साली सत्तेत आले ! धार्मिक ध्रुवीकरण आणि मुस्लिम द्वेष अशा दंगलीच्या छायेतच निवडणुका झाल्या पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. म्हणून निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेणा-या तत्कालीन निवडणुक आयुक्त जे. एम. लिंगडोह यांच्यावर ते तुटून पडले! लिंगडोह आणि सोनिया गांधी मिळून चर्च मध्ये प्रार्थनेला जातात, या आधारावर लिंगडोह यांचा धर्म अधोरेखीत केला. ते हिंदुद्रोही असल्याचा आरोप त्यांनी त्यांच्यावर केला. मोदींप्रमाणे निवडणूक आयोगावर अशा शब्दात हिंदूंचा कैवार या स्वरुपात कधीच कोणत्याही नेत्याने राजकीय टीका केली नव्हती. मोदींवर इथूनच पुढे अनेक विचारवंत, बुद्धीजीवी, विद्वान टीका करू लागले. पण उथळपणाने भारलेल्या समाजात मोदींच्या उथळ वक्तव्यांना लोकप्रियता मिळत गेली. मोदी सत्तेवर आले मात्र बुद्धीजीवींकडून त्यांना मान सन्मान कधीही मिळाला नाही. मोदींनी त्यांना लोकशाही विरोधी ठरवले. मात्र याच न्युनगंडातून त्यांच्यात एक प्रकारची बुद्धीवादी व विद्वान समजल्या जाणा-यांच्या विरोधात आक्रमकता निर्माण झाली. त्यांच्या या आक्रमकतेला २००२, २००७, २०१२ साली गुजरातेत आणि २०१४ साली प्रामुख्याने उत्तर भारतात मिळालेल्या विजयामुळे अहंकाराची आणि बुद्धीजीवींकडून होणा-या सततच्या उपेक्षेमुळे आत्ममग्नतेची जोड मिळाली !

मोदींना पराभव माहीत नाही कारण त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी एकही निवडणूक हरलेली नाही. सततच्या विजयामुळे अहंकार तर सततच्या उपेक्षेमुळे आक्रमकता आणि आत्मकेंद्रीपणा यांचे मिश्रण त्यांच्या व्यक्तीमत्वात झाले. सत्ता जाणे ही बाब त्यांच्या कल्पनेपलीकडील आहे कारण सतत विजय हा त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीतील महत्वपुर्ण घटक आहे. म्हणून त्यांना सतत माझ्या विरोधात कोणीतरी कट रचत आहे. मला संपविण्याचा प्रयत्न करत अशी त्यांची भयग्रस्त ( paranoid) अवस्था झाली झाली आहे. म्हणून ‘माझ्या मृत्यूची स्वप्ने’ माझे विरोधक पाहत असल्याचा बालिश आरोप मोदी करत आहेत.

ग्रीक शोकनाट्यात ‘किंग इडीपस’ नावाचे एक सोफोलीकसचे नाटक आहे. त्यात स्फिंक्स नावाची एक राक्षसी जिचे तोंड मानवाचे शरीर सिंहाचे असते. म्हणजे वरकरणी ती सिंहासारखी शूर मात्र आतून प्रचंड भित्री असते. ती थीब्स या शहरात येणाऱ्या प्रत्येकाला प्रश्न विचारून निरुत्तर करत असे. दरवेळी ती जिंकत असे आणि पराभूत झालेल्या व्यक्तीस दगडावर आपटून ती खावून टाकत असे. सतत जिंकत गेल्यामुळे तिच्यात प्रचंड अहंकार निर्माण होतो. शेवटी तिचा अहंकार एवढा वाढतो की माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर देण्याची क्षमता कोणाकडेही नाही, अशी ती वल्गना करू लागली. तेंव्हा राजा इडिपस तिच्या सर्वात अवघड अशा प्रश्नाचे उत्तर देतो आणि तीला पराभूत करतो. आपण कधीच पराभूत होऊ शकत नाही असा अहंकार असणारी ती राक्षसी स्वत:चा पराभव झाला आहे हे मान्यच करत नाही. कारण तीने पराभव कधीच पाहीलेला नसतो. अखेर अहंकाराच्या भरात ती स्वतःच दगडावर डोके आपटून आपला जीव देते !

अहंकार हा मानवाला आतून जाळत असतो आणि त्याला हिंसा आणि आक्रमकतेची संगत असेल तर पराभव सहन होत नाही. स्वत:चा नाश होईल की काय हे भय सतत छळत राहतं. म्हणून अशा व्यक्तीमत्वाच्या मनातील स्वअस्तित्वाचे भय कधीही संपत नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *