मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या झालेल्या दहा सभांचा हिशेब निवडणूक आयोगातर्फे मागण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमातून झळकत आहे. पण “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत नोटीस किंवा पत्र मिळालेलं नाही” अशी माहिती मनसे नेते शिरीष सावंत यांनी ‘कलमनामा’ला दिली.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा कोणताही उमेदवार उभा न करता महाराष्ट्रात विविध ठिकाणी दहा सभांचं आयोजन केलं होतं. या सभांतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या जोडगोळी विरोधात मोहीमच उघडली होती. आपल्या सभांमध्ये मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी केलेली विधाने आणि नंतर केलेली विधाने याचे व्हिडीओ दाखवत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींची विरोधाभासी प्रतिमा जनसामांन्यांसमोर आणली. याच सभांदरम्यानचं राज ठाकरेंचं “ए लाव रे तो व्हिडीओ… ” हे वाक्य तर भाजपच्या मुळावर उठलं होतं. इतकंच नव्हे तर राज यांनी काही विषयांबाबतचे थेट पुरावेही सभेत मांडल्याने भाजपची कोंडी होऊन बसली होती. राज ठाकरेंना उत्तर देणं कठीण होऊन बसल्यामुळे भाजपा नेत्यांनी राज यांच्या सभांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मनसे निवडणूक लढवित नसून त्यांच्या सभांच्या खर्चाचा हिशेब घ्यावा, असे पत्रच भाजपाने निवडणूक आयोगाला दिले होते. अखेर निवडणूक आयोगाने भाजपाच्या तक्रारीची दखल घेतली आहे. राज यांना सभांच्या खर्चासंदर्भात तपशील द्यावा लागेल अशी माहिती प्रसारमाध्यमांद्वारे देण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते शिरीष सावंत यांच्याकडे विचारणा केली असता,” आम्हालाही हि बातमी प्रसारमाध्यमांतूनच कळली आणि प्रसारमाध्यमच त्यावर अधिक चर्चा करत आहेत. मात्र निवडणूक आयोगाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत नोटीस किंवा पत्र आम्हाला मिळालेलं नाही.” असं म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *