
नवी दिल्ली । लोकसभा निवडणुक प्रचारात वादग्रस्त भाषण केल्या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपा प्रमुख मायावती यांना निवडणूक आयोगानं प्रचारबंदी केली आहे. योगी यांना ३ दिवस तर मायावती यांना दोन दिवस प्रचारबंदी केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानं दोन्ही नेत्यांसह पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
१६ एप्रिल पासून ही प्रचारबंदी लागू
योगी आदित्यनाथ यांना ७२ तास तर, मायावती यांच्यावर ४८ तास प्रचारबंदी घालण्यात आलेली आहे. १६ एप्रिल पासून ही प्रचारबंदी लागू होणार आहे. यापूर्वी प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांनी भडकाऊ भाषणं केली होती. त्याची दखल आता निवडणूक आयोगानं घेत दोन्ही नेत्यांच्या प्रचारावर बंदी घातली आहे. योगी आदित्यनाथ हे भाजपचे तर, मायावती या बसपा – सपा आघाडीच्या स्टार प्रचारक आहेत.
काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ यांनी भारतीय सेनेचा उल्लेख ‘मोदी की सेना’ असा केला होता. या वक्तव्याची दखल घेत निवडणूक आयोगाने घेत योगी आदित्यनाथ यांना नोटीस देखील पाठवली होती. त्यानंतर आता त्यांच्या प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे.
काय म्हणाल्या होत्या मायावती
बसपाच्या नेत्या मायावतींनी उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूर आणि बरेली जिल्ह्यात मुस्लीम मतदारांना आवाहन केलं होतं. मतांचं विभाजन होण्यापासून सावध राहा, असा इशाराच त्यांनी दिला होता. यानंतर, आपण हे वक्तव्य बहुजन समाजाला उद्देशून केलं, मुस्लिमांना नाही, अशी सारवासारव मायावतींनी केली.