संगीतकार म्हणून ओळख असलेल्या सलील कुलकर्णी यांचे मराठी पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण म्हणून आलेला चित्रपट, कसा असेल याची तमाम रसिकांना उत्सुकता होती. त्यातच ‘वेडिंगचा शिनेमा’ असे हटके शीर्षक असलेल्या चित्रपटात काय असेल, याची उत्कंठाही वाढीस लागली होती. मात्र सलील कुलकर्णी यांनी या सगळ्या अपेक्षांना उतरत एक आल्हाददायी असा चित्रपट सादर केला आहे. शीर्षकाप्रमाणेच यात ‘वेडिंग’ची गोष्ट आहे आणि ती मांडताना या ‘शिनेमा’ने सूर आणि तालाची बहारदार पेशकश केली आहे.
       या ‘शिनेमात’ अर्थातच लग्न आहे, दोन्ही बाजूंकडची वऱ्हाडी मंडळी आहेत, मानपान आहे, कुटुंबांचा संवाद आहे, नाती आहेत, आप्तेष्ट आहेत; पण याहून महत्त्वाचे म्हणजे यात लग्नापूर्वीचा माहोल आहे. ही संकल्पना सलील कुलकर्णी यांच्या ‘तालावर’ सुपीकतेने डोलत राहिली आहे आणि तिने इतरांनाही डोलायला लावले आहे. चित्रपटाची गोष्ट म्हणावी तर फार विस्तृत नाही; मात्र या टीमने जमवलेल्या सगळ्या गोतावळ्यामुळे या गोष्टीचा परीघ वाढला आहे. तर, लग्न जुळलेल्या ‘त्या दोघांचे’ लग्नापूर्वीचे ‘फोटोशूट’; जे अलीकडच्या काळात ‘मस्ट’ होऊ घातले आहे; ते या चित्रपटाचा गाभा आहे. परी आणि प्रकाश यांच्या लग्नाचे ‘फोटोशूट’ करण्यासाठी उर्वी ही दिग्दर्शिका तिची साधनसामग्री घेऊन या दोघांच्या घरात येते आणि मग खऱ्या अर्थाने या गोष्टीत लग्नापूर्वीचा बार उडतो.
     प्रकाशचे कुटुंब सासवडचे; तर डॉक्टर असलेली परी ही मुंबईची!  या दोघांमध्ये केवळ हा फरक असल्याचे पडसादच पुढे या मन:स्पर्शी अशा वातावरणाला छेद देत जातात. बाकी या गोष्टीत, नकारात्मक असे काही नसल्याने चित्रपटाचा आनंदी ‘मूड’ शेवटपर्यंत कायम राहिला आहे. परी व प्रकाशच्या ‘फोटोशूट’च्या निमित्ताने उर्वीच्या आयुष्याचा पटही मांडला जातो आणि ऊर्वीलाही त्यातून तिची प्रतिमा लख्ख दिसू लागते. बाकी, लग्न म्हटले की वऱ्हाडी मंडळी आलीच आणि तशी ती या गोष्टीत येऊन या आनंदात अधिक भर घालतात. ही सगळी भट्टी लेखक व दिग्दर्शक या नात्याने सलील कुलकर्णी यांनी झकास जमवून आणली आहे. फक्त या गोष्टीला थोडी कात्री लागली असती, तरी चालण्यासारखे होते. संदीप खरे यांची गीते व सलील कुलकर्णी यांच्या संगीतासह; अभिजीत अब्दे यांचे छायाचित्रण, अभिजीत देशपांडे यांचे संकलन आदी चित्रपटाची तांत्रिक अंगे परिपूर्ण आहेत.
       ऋचा इनामदार (परी) व शिवराज वायचळ (प्रकाश) ही फ्रेश जोडी या चित्रपटाने दिली आहे आणि त्यांना मिळालेल्या संधीचे योग्य ते व्यवधान राखून या दोघांनी या गोष्टीत बहारदार रंग भरले आहेत. मुक्ता बर्वेची यातली उर्वी, तिच्या स्वभावाचे विविध विभ्रम रंगतदार पद्धतीने सादर करण्यात यशस्वी ठरली आहे. मुळात या गोष्टीतल्या लग्नाच्या गडबडीतही, उर्वी या व्यक्तिरेखेला लेखनातच वेगळे स्थान दिले असल्याची जाणीव मुक्ताच्या या भूमिकेत प्रकर्षाने दिसून येते. शिवाजी साटम, अलका कुबल-आठल्ये, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, योगिनी पोफळे, प्रवीण तरडे, भालचंद्र कदम, प्राजक्ता हणमघर, त्यागराज खाडिलकर आदी अनुभवी कलाकारांची तगडी टीम या चित्रपटात आहे आणि या सर्वांनी मोठया नजाकतीने लग्नाचे हे वऱ्हाड रंगवले आहे. संकर्षण कऱ्हाडेने त्याची विशेष छाप पाडली आहे; तर सुनील बर्वे व अश्विनी काळसेकर यांच्यातले प्रसंग उठावदार आहेत. एकूणच, लग्नसोहळ्याच्या माहोलात रमवत मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करणारा हा ‘शिनेमा’ आहे.
चित्रपट:   ‘वेडिंगचा शिनेमा’
 
दर्जा:    * * *  १/२  (साडेतीन स्टार) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *