लोकसभा निवडणुक २०१९चे मतदान तोंडावर आलं असतानाही पक्षानं अद्याप उमेदवारी जाहीर न केल्यानं नाराज झालेल्या भाजप नेत्या व लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे. तसं पत्रकच त्यांनी प्रसिद्ध केलं असून पक्ष नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली आहे. तसेच यावेळी’आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी इंदूरच्या जनतेचे व पक्षाचे आभार मानले आहेत. इंदूर मतदारसंघातील उमेदवारीचा निर्णय पक्ष लवकरच घेईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
 भाजपनं यावेळी पक्षाचे संस्थापक नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक दिग्गजांना वयाचा मुद्दा पुढं करून विश्रांती दिली आहे. आडवाणी व जोशी यांना तिकीट नाकारल्यानेेत्यांनी स्वत:हून निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही तोच मार्ग पत्करला आहे. महाजन या मध्य प्रदेशातील इंदूर येथून भाजपचं प्रतिनिधीत्व करतात. यावेळी पुन्हा उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, अद्याप त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
निवडणूक न लढविण्याची घोषणा करताना त्यांनी पक्षनेतृत्वाला लक्ष्य केलं आहे. ‘माझ्या उमेदवारीबद्दल पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी मी आधीच चर्चा केली होती. उमेदवारीचा निर्णय त्यांच्यावर सोपवला होता. मात्र, अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही. ही अनिर्णायकी परिस्थिती का आहे? नेतृत्वाच्या मनात संभ्रम असल्याचं दिसत आहे. ही संभ्रमावस्था दूर व्हावी व पक्षाला विनासंकोच निर्णय घेता यावा म्हणून मी स्वत:हून निवडणुकीतून माघार घेत आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *