कलेतून व्यक्त होणे…समाजभान राखणे…वैश्विक संदेश देणे इ. गोष्टी व्यावसायिक कलेतून सांभाळणे कठीण असते. कारण इथे व्यवहार असतो. ग्राहकाला आणि ग्राहकाच्या ग्राहकाला काय पाहिजे आहे यावर ती संकल्पना पुढे जात असते. अर्थात काही वेळेला ग्राहकाचा लवचिकपणा आणि समज लक्षात घेऊन आपण आपला स्वार्थ साधूही शकतो.
कणकवलीसारख्या छोटया शहरातल्या एका स्थानीक टेलर ची जाहिरात मी २००२ साली डिझाईन केली. आर्टवर्क बनवताना त्याने मला एवढे मोठे अवकाश आणि स्वातंत्र्य दिले. मी ते माझ्या भावनिक आणि बौद्धिक क्षमतेने सजवले. भारत पाकिस्तान देश सुईदोर्‍याने शिवले…जोडले.
शांती, बुद्ध, गांधीवाद, वैश्विकता, सहिष्णुता, स्वातंत्र्य इ. विचारांनी प्रत्येक कलाकार मूलतःच भारलेला असतो.(व्यावसायिक कलाकाराला मात्र बर्‍याच वेळेला त्याच्या भावनांना आवर घालावा लागतोच! )
परंतु मानवी मनाला भिडणार्‍या परिणामकारक कलात्मक मांडणीतून, रचनांमधून, काव्य, संगीत नाट्यकृतींमधून दिलेल्या संदेशामुळे काही क्रांतिकारी, सकारात्मक वास्तव बदल झाले तर तो कलावंत आणि कला कृतार्थ होते!
२००२ साली मी केलेले हे आर्टवर्क मागील १५ दिवसात मला पुन्हा आठवले. देशात निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती पाहून अनेक कलावंतांच्या संवेदनशीलतेचा भडीमार सोशल मीडियावर सुरु झाला. तेव्हा माझेही हे आर्टवर्क लोकांपर्यंत पोहोचवावेसे वाटले. परंतु त्यातून काही ठोस परिणाम साधेल असे जाणवले नाही.
परंतु, परवाच म्हणजे २७ फेब्रुवारीला जेजे च्या कॅम्पस मध्ये एका कार्यक्रमामध्ये लोकसत्ताचे सिनिअर आर्टिस्ट आणि ग्रेट संकल्पनाकार श्री. सतीश सोनावणे सरांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग्य आला. मला पाहताच मनोज अशी हाक मारून त्यांनी मला मिठी मारली आणि माझ्या याच आर्टवर्कचा उल्लेख करून त्यांनी आपल्या इतर चित्रकार मित्रांशी ओळख करून दिली.
आपल्या छोट्याशा कामातूनही आपली ओळख होणे आणि आपल्यापेक्षा अनुभवी आणि मुख्य प्रवाहात काम करणार्‍या तज्ञानीं त्याची दाखल घेणे हे माझ्यासारख्या सतत नव्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करणार्‍या कलावंताला प्रेरणादायीच आहे.
त्यादिवशी मी हाच धागा घेऊन जेजेतून बाहेर पडलो…नव्याच्या शोधात!

-मनोज मेस्त्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *