ऋतुचक्र बदलत असतं. काळ कुणासाठी थांबत नसतो, ही सुभाषितं सार्यांनाच माहित आहे. प्रश्‍न असा असतो की बदलत्या काळात माणूस म्हणून आपण काय करायचं? बदल ही नैसर्गिक प्रक्रिया असेल तर माणसाने त्या प्रक्रियेत रहावं की नाही? जी रहात नाहीत ती डबकी असतात. अशी अनेक डबकी आता आसपास मुबलक आहेत. अनाकलनीय प्राचीनता कवटाळत भविष्यकाळ बिघडवणार्यांची संख्या कमी नाही. फ्रान्स सोबत राफेल डील करायचं आणि पुष्पक विमान आम्हीच बनवलं असा डांगोरा पिटवणार्यांचा हा काळ. तर मुद्दा हा बदलाचा आहे.

कलमनामा हे साप्ताहिक २०१२ पासून सुरू झालं. ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यातील विश्वसनीय साप्ताहिक हे बिरूद घेवून अल्प काळातच कमलनामा साप्ताहिकाने आपला ठसा उमटवला. मराठी साप्ताहिकांची मळलेली वाट सोडून ‘कलमनामा‘ने ताजेपणा आणला. विषयांचं वैविध्य, तरूण आणि नवे लेखक, स्पष्ट भूमिका आणि आकर्षक मांडणी हे कलमनामाचं वैशिट्य होतं. याच आधारे कलमनामा हे तरूणांचं विचारपीठ बनलं होतं.

झपाट्याने मीडिया बदलतोय. माध्यम क्रांतीचा हा काळ आहे. मीडियातील हा बदल तांत्रिक दृष्टया जेवढा क्रांतिकारक आहे, तेवढीच त्याची नाळ लोकजिवनापासून विलग होतेय, ही वस्तूस्थिती आहे. बाजारूपाने मुल्यहीनता आलेली आहे. भारतीय मीडियाचा विचार करता हा मीडिया कमालीचा धर्मवादी, काही प्रमाणात भेदरलेला तर अधिक प्रमाणात कणाहीन, स्वत्व हरवलेला असा आहे. याचाच उलटा परिणाम होतोय. प्रस्थापित मीडियाचं अस्तित्व उतरणीला लागलेलं आहे ही खरी माध्यमांची सध्याची परिस्थिती आहे. वर्तमानपत्रांचा खप झपाट्याने कमी होतोय. वाचक थोपवण्यासाठी सर्कस करावी लागतेय. गेल्या चार वर्षात तेचतेच पाहून वाचून वाचक ऊबल्याने बड्या वर्तमानपत्रांना आता सरकारविरूध्द लिहावं लागलंय. हीच स्थिती न्यूज चॅनेल्सची आहे. चॅनल्सच्या प्रेक्षकांत दिवसेंदिवस कमालीची घट होतेय. (संदर्भ – हिंदुस्थान टाइम्सच्या ‘मिंट‘चा पाहणी अहवाल-जुलै २०१८) याचा अर्थ माहिती-बातम्यांसाठी वाचकांची नवी पिढी वर्तमानपत्र किंवा चॅनेल्सवर अवलंबून राहिलेली नाहीत. नेटवरील नवा मीडिया हाच तरूणांच्या माहिती आणि बातम्यांचा स्त्रोत आहे. प्रत्येक क्षणाला वेबसाईट, वेबचॅनल्सवर येवून धडकणारी माहिती याचं महाजाल अदभूत आहे. हा मीडिया कुणाच्या दावणीला बांधला जाणार नाही किंवा त्यावर असत्याचा अपलाप फार काळ कुणाला करता येणार नाही. आता कुणाची गळचेपी कुणी करणार नाही. प्रत्येकाच्या अभिव्यक्तीला संधी आणि न्याय देणारा हा नव्या जगाचा नेट मीडिया आहे.

याच नव्या मीडियात एक नवा प्रयोग आम्ही घेवून येत आहोत. मांडणीचा नवा अविष्कार या नव्या माध्यमात असणार आहे. वेबवर कलमनामा प्रसिद्ध होईलच, पण वेबच्या माध्यमातून काही कार्यक्रमही आम्ही सादर करणार आहोत. दृकश्राव्य असा हा कलमनामाचा अविष्कार असणार आहे. अर्थात पत्रकारितेतील मुल्य, सत्य मांडण्याची निर्भीडता आणि सामान्य माणसासोबतची दृढ बांधिलकी हा तर पाया आहेच.
कोणतंही बडं भांडवल हाताशी नसताना जिद्दीच्या जोरावर लोक पाठिंब्यावरच कलमनामाचा वेब माध्यमांतील हा नवा प्रयोग करण्यास आम्ही सज्ज झालो आहोत…
आजवर आपण साथ दिलेली आहेच. यापुढेही असेच सोबत रहाल ही खात्री आहे…
आपला

-संपादक

2 Comments

  1. कलमनामा नव्या रूपाने आला खूप छान वाटले तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *