भारताच्या लोकसभेत कधी नव्हे इतके साधुसंत निवडून आलेले आहेत. या नव्याने निर्माण झालेल्या संतपरिषदेने आपला स्वतःचा एक अजेंडा तयार केलेला आहे. त्यांना स्वतंत्र भारताच्या संविधानातील बोलण्याचं स्वातंत्र्य मान्य आहे आणि त्याचा आम्ही केव्हाही आणि कसाही वापर करू शकतो असा दावा आहे. मात्र संविधानाने मान्य केलेला धर्मस्वातंत्र्याचा मुद्दा मान्य नाही. त्यामुळे अधूनमधून धर्माचा उमाळा आला की हे साधुसंत इतर धर्मांच्या विरोधात फुत्कार टाकतात. त्यांचा रोख हा देशातील अल्पसंख्यांक असलेल्या जमातींच्या विरोधात असतो. हे हिंदुराष्ट्र आहे असं ते उच्चरवाने सांगतात. ते जेव्हा हिंदुधर्माची तुतारी वाजवतात तेव्हा भारतीय जनता पार्टीचे पक्षशिरोमणी तातडीने आम्ही त्यातले नाही असं जाहीर करतात आणि त्यांच्या फुत्कारांबद्दल नापसंती व्यक्त करतात. त्यांनी तसं करायचं हे जणू आधीच ठरलेलं असतं. मग ती साध्वी निरंजन ज्योती असो अथवा महान संत साक्षी महाराज असोत.

आपण आपली स्वतःची प्रतिमा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत उंचावत ठेवतानाच देशात सत्तेपर्यंत घेऊन जाणार्या धर्माच्या घोड्यावरची आपली मांड पक्की ठेवायची अशी रणनीती नरेंद्र मोदी यांनी आपल्या मातृसंघटनेच्या बौद्धिकांमधून ग्रहण केलेली आहे, हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलेलं आहे.

देशविदेशात विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटीगाठी घेताना एक प्रागतिक आणि विकासाभिमुख चेहरा समोर ठेवावा लागतो. तो तसा ठेवण्याचं आणि सांभाळण्याचं काम पंतप्रधान या नात्याने नरेंद्र मोदी हे उत्तमरित्या करतात. तेव्हाचा त्यांचा चेहरा वेगळा असतो. मात्र जेव्हा साक्षी महाराजांसारखा उच्चविद्याविभूषित स्वघोषित संत जागरूकपणे नथुराम गोडसेला देशभक्तिचं प्रमाणपत्र देतो तेव्हा त्याबद्दल जाहीरपणे नापसंती व्यक्त करणं हे देखील त्याच रणनीतिचा भाग म्हणून पहावं लागेल. तो केवळ एक मुखवटा आहे हे त्यांना आणि साक्षी महाराजांनाही माहीत असतं. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी ज्या उथळपणाने साक्षी महाराजला खेद व्यक्त करायला सांगितला ते ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं त्यांना हे पटेल की त्या खेद व्यक्त करण्यात खेदाची भावना असण्याची सुतराम शक्यता नव्हती. भारतीय जनता पार्टीच्या मातृसंघटनेने पिढ्यान्पिढ्या साध्य केलेला आपल्या खर्या भावना लपवून समाजाला भावेल असा सामाजिक बांधिलकी मानणारा, राष्ट्रप्रेम दाखवणारा साळसूद चेहरा लोकांसमोर ठेवायचं तंत्र सुमित्रा महाजन यांनाही अवगत असावं असं त्यांच्या देहबोलीवरून दिसलं. संसदेत आलेले साध्वी आणि साधु यांना तर आपल्या धर्मपरायणतेचा दर्प प्राप्त झालेला उघड उघड दिसतो. त्यातून जर त्यापैकी एखाद्याला मंत्रिपद मिळालेलं असेल तर पाहायलाच नको. साध्वी निरंजन ज्योती यांचं रामजादे आणि हरामज्यादे हे वक्तव्य खूप उशिराने लोकांच्या समोर आलं. वास्तवात त्यांनी ते आपल्या मतदारसंघातील ६० पेक्षा अधिक झालेल्या सभांतील प्रत्येक सभेत, प्रत्येक भाषणात वापरलेलं लाडकं वाक्य होतं. त्यांची भाषा अशी जहाल की पुरुषही लाजावेत. मला मुस्लिमांची मतं नकोत असे त्या जाहीरपणे आपल्या भाषणात सांगत असत. त्यांनी किंवा त्यांच्या सारख्यांनी म्हणजे साक्षीमहाराज किंवा योगी आदित्यनाथ यांनी मुस्लिमांवर आगपाखड केली तर त्यात नवल वाटून घेण्याची गरज नाही. हरामजादेफेम निरंजन ज्योती यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योगसारखं महत्त्वाचं खातं नरेंद्र मोदी यांनी सोपवलेलं आहे. त्यांचा देशातील एका समाजाबद्दलचा विचार हा वगळण्याचा असेल तर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना जे मी भेदभाव करणार नाही असं म्हटलं त्याचं काय असा प्रश्न उपस्थित होतो. याचा अर्थ एवढाच की घेतलेल्या शपथेचं त्यांना गांभीर्य नाही. कारण या देशाच्या संविधानाबद्दल अत्यल्प आदर ठेवूनच राजकारण करायचं ठरवून ही संतमंडळी राजकारणात आलेली आहेत. एकदा कमरेचं सोडण्याचा निर्णय घेतला की मग कोण गांधी आणि कोण नेहरू. इतिहास गुंडाळून ठेवून सरदार वल्लभभाई पटेलांना, तर कधी सुभाषचंद्र बोस यांना डोक्यावर घेतलं की राष्ट्रप्रेमाचा डंका आपोआपच पिटला जातो. परंतु मूळ विचारधारा बदलत नाही. साधू, संत, बैरागी आणि यांची सद्दी चालावी यासाठीच आपण सत्तेत आलेलो आहोत असा संदेश दिला की पुढलं काम सोपं होतं.

 

नथुराम गोडसेला देशभक्त असल्याचं प्रमाणपत्र देणार्या साक्षी महाराज याचं चरित्र पहाण्यासारखं आहे. जशी साध्वी निरंजन ज्योती लोकांच्या मनात क्षोभ निर्माण करण्यासाठीच भाषणं करण्यासाठी प्रसिद्ध आहे तसाच हा बाबाही कुख्यात आहे. महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य सुजाता वर्मां यांच्या खून प्रकरणातील तो एक महत्त्वाचा आरोपी आहे. त्यांच्या आश्रमाच्या दारातच वर्मांना गोळ्या घालून त्यांचा खून करण्यात आलेला होता. याशिवाय हाच सच्चिदानंद हरी साक्षी ऊर्फ साक्षी महाराज एक महिना तिहारच्या तुरुंगात होता. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा होता. मात्र पुराव्याअभावी तो सुटला. बाबरी मशिद पाडण्याच्या घटनेतीलही तो एक आरोपी आहे. एबीपी या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतही तो काश्मीर मांगोगे तो चीर देंगे… याच भाषेत बोलतो. या साक्षी महाराजाने धर्म प्रचारासाठी देशभरात अनेक मठ स्थापन केलेले आहेत. त्याचा चेहरा हा फिलिप मेडोज टेलर यांच्या पुस्तकातील ठगांच्या जथ्याच्या चित्रातील ठगाशी मिळताजुळता वाटतो. कदाचित हा केवळ योगायोग असावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *