फेसबुकची भिंत चित्रविचित्र फोटोंनी रंगवायची किंवा वादग्रस्त मजकूर टाकून मोकळं व्हायचं? लाइक्स मिळवायच्या नादात काहीतरी ऑनलाइन चाळे करायचे हे नेटिझन्सना चांगलंच येतं. पण या पलीकडे जाऊन फेसबुक, व्हॉट्सअपचा वापर परिवर्तनाच्या लढ्यात होऊ शकतो हे जाणून सोशल मीडियात वावरणारे तसे मोजकेच असतात. फेसबुक असो अथवा व्हॉट्सअपची दुनिया तशी आभासी… पण या दुनियेत वावरणारे विचाराने एकत्र बांधले जातात आणि मग सुरू होतात समविचारी तरुणाईचे नवनवीन ग्रूप्स, या ग्रूप्समधून वेगवेगळ्या विषयांवर सोशल मीडियावर पेज तयार करून सकारात्मक चर्चा घडवली जाते. कविता रचणं जितकं सोपं तितकं वाचकांच्या गळी उतरवणं अवघड. सोशल मीडिया भारतात येण्याआधी कविता असो अथवा अन्य साहित्याची निर्मिती करताना त्या साहित्याचं डॉक्युमेंटेशन करावं लागे, म्हणजे कवितासंग्रह आणि अन्य साहित्य पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करूनच वाचकांपर्यंत पोहोचवला जाता असे. काही लेखक आणि कवींना आर्थिक परिस्थितीअभावी पुस्तक प्रसिद्ध करण्यात अडचणी येत होत्या. तर काही दर्जेदार कवी काळाच्या ओघात कवितांच्या वहीतच दफन झाले. पण देशात आधुनिकतेचे वारे गेल्या काही वर्षांपासून वेगाने वाहत आहेत. देशात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड वाढलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण वाढू लागलीय. दरम्यान ग्रामीण भागातील कवी, पत्रकार, लेखक, साहित्यिकांना खर्या अर्थाने सोशल मीडिया हे हक्काचं व्यासपीठ मिळालं. या व्यासपीठावर व्यक्त होणार्या अनेकांमधून मोजकेच प्रतिभावंत साहित्यिक आणि कलाकार ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलेत.

फेसबुकच्या माध्यमातून अमरावतीच्या निलेश कळसकर या तरुण मित्राने ‘कविता मनामनातील’ हे फेसबुक पेज तयार केलं होतं. या पेजवर दररोज शेकडो कविता पोस्ट केल्या जायच्या. यातील काही कविता स्वरचित तर काही संग्रहित असायच्या. वर्षभर या पेजवर कवितांचा पाऊस तर पडू लागला. शिवाय कवितेच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपर्यातील शेकडो परिवर्तनवादी तरुण-तरुणी सोशल मीडियावर एकत्र आले. त्यातच

राज्यात दलित अल्पसंख्याक, भटके, दीनदुबळ्यांवर होणार्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांनी सामाजिक पटलावर अस्वस्थतता निर्माण झाली. परिवर्तनाचा विचार घेऊन समाजात वावरणार्या तरुणांनी मग सोशल मीडियाला आपलं व्यासपीठ बनवत अन्याय-अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याबरोबरच झोपलेल्या बहुजनांना जागं करण्याची भूमिका पार पाडण्यास सुरुवात केली होती. गेल्या दोन वर्षांपासून फेसबुकवर राज्यातील तरुण परिवर्तनाचा जागर करत होते. यातील अनेकांनी कोणाला कधीच पाहिलं नव्हतं. सोशल मीडियाच्या आभासी जगातून परिवर्तनाचा विचार पेरण्याचं काम मात्र हे तरुण मोठ्या तळमळीने करत होते. मध्यंतरी

राज्यात घडलेल्या अत्याचारांच्या घटनांनी या तरुणांना पुरतं हादरवून टाकलं होतं. मात्र परिवर्तनाचा विचार या तरुणांनी मोठ्या नेटाने पुढे नेण्याचं काम सुरूच ठेवलं आहे.

‘कविता मनामनातील’ या फेसबुकवरील पेजवर पक्के दोस्त बनलेल्या तरुणांच्या एका गटाने व्हॉट्सअप या सोशल मीडियावर एक ग्रूप निर्माण केला आणि संवादाच्या कक्षा वाढवल्या. दररोज पोस्ट होणारे कवितासंग्रह आणि विविध सामाजिक विषयांवर या ग्रूपवर जोरदार चर्चासत्रं होऊ लागली. या चर्चासत्रांचा रोख तसा सकारात्मक बदलाच्या दिशेचा असायचा. दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून ‘कविता मनामनातील’ या फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या आभासी दुनियेतील तरुणांनी अचानक एकत्र येण्याचं ठरवलं. त्यानुसार ग्रूपवर झालेल्या चर्चेतून माथेरान हे ठिकाण निवडण्यात आलं. माथेरान या ठिकाणी भेटीचं आयोजन करण्याबरोबरच काव्यमैफील घेण्याचं निश्चित करण्यात आलं. माथेरान भेटीसाठी २० जणांची टीम तयार झाली होती. यामध्ये पत्रकार, इंजिनिअर, कवी, लेखक, विद्यार्थी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते यांचा समावेश होता. १३ डिसेंबर आणि १४ डिसेंबर या कालावधित सोशल मीडियातील तरुणांची पहिली भेट ठरली. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, बारामती, ठाणे, मुंबईसह आदी भागातील व्हर्च्युअल मंडळी १३ डिसेंबरला माथेरानमध्ये धडकले.

कविता मनामनातील टीम माथेरानमध्ये पोहोचल्यानंतर सर्वांनी

ज्या आत्मीयतेने एकमेकांना कवटाळलं ती आत्मीयता अत्युच्च आनंद देणारी ठरली. काव्यमैफील हॉटेल अलेक्झांडर प्रांगणात होणार होती. त्याची तयारी तिथे पोहोचल्यावर सगळ्यांनी जोरात सुरू केली. भाभा अणुशक्ती केंद्रात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या ज्येष्ठ सदस्या नंदा लोंढकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘कविता मनामनातील’ ग्रूपची काव्यमैफील सुरू झाली. या काव्यमैफिलीचं बहारदार प्रास्ताविक पत्रकार निकेश जिलठे यांनी सादर केलं. नंतर अहमदनगरचे पत्रकार सत्तार शेख यांनी कविता सादर केली. त्यांच्या या गंभीर कवितेने काव्यमैफिलीची सुरुवात झाली,

जित्या मानवाच्या

हरेक डोळ्यात

चढलाय गंज

नेणिवा मंद झाल्याचा

समाजात सध्या जाती-धर्माच्या नावावरून सुरू असलेल्या अतिरेकामुळे जिवंत माणसं कशी वागतायंत याचं गंभीर वर्णन त्यांनी आपल्या कवितेतून केल्याने तिथलं आल्हादायक वातावरण अचानक गंभीर झालं, तर मुंबईहून आलेल्या कवियत्री सुरेखा पैठणे-सोंडे यांनी आंदोलनं चळवळ भरकटल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांची काय अवस्था होते यावर भाष्य करत कार्यकर्त्यांनी आता कोणता मार्ग स्वीकारला पाहिजे यावर भाष्य केलं, त्या म्हणतात…

आंदोलने, चळवळी, उठाव, क्रांत्या तशा नवीन नाहीत मला

माझी बरीच आवर्तने याच परिघातून फिरतात

मी नाही घेत हातात मेणबत्त्या

क्षणांसाठी पेटणार्या

तसंच यावेळी आयआयटी मुंबई येथील सचिन सुशील यांनी कवी ग्रेस यांच्या शैलीत सादर केलेल्या कवितेने काव्यमैफिलीत रंगत आणली ते म्हणतात…

अत्तराचे मोती खण, तुझे नाजुकले मन

तुझ्या देहात कस्तुरी, दरवळे रानभर…

अत्तराचे मोती खण…

जीवा लागे अशी ओढ, तुझ्या पैंजनाची खोड

ज्यात चांदवे रुसवे, आत चंद्र माझा गोड.

तर दुसरीकडे एका कंपनीत मॅनेजर असलेले राहुल गायकवाड आपल्या कवितेत म्हणतात…

ज्याची त्याची

प्रवृत्ती ही

सात्विक की अघोरी!

म्हणूनच

सर्पांनी वेढून ही

केवडाच काय,

ही मोहरतेच

तुळस असो की रातराणी….!

त्यानंतर सत्तार शेख आपल्या कवितेत म्हणतात की,

उगीच का धगधगवताय

मने जित्या मढ्यांची

झालीय राखरांगोळी

मानवी मुंडक्यांची

सुमारे दोन तासांपेक्षा अधिक काळ काव्यमैफील चालली होती. या काव्यमैफिलीत नयना चित्ते, तुषार कांबळे, वर्षा डोळस, पुनम पगारे, शितल तांबे, सोनू सोना, रोहिणी सोंडे, प्रशांत, संदीप पाटील सह अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या. तसंच काव्यमैफिलीचं बहारदार सुत्रसंचालन करणार्या पत्रकार निकेश जिलठे यांनी नामवंत कवींच्या रचना सादर करत काव्यमैफिलीत रंगत आणली.

काव्यमैफिलीनंतर राज्यात सतत होणार्या जातीय अत्याचाराच्या घटना रोखण्यात सरकार का अपयशी ठरते? परिवर्तनाच्या चळवळीने आगामी काळात काय भूमिका घेतली पाहिजे? राज्यात सतत निर्माण होणारा दुष्काळ यावर मात करण्यासाठी दुष्काळग्रस्त भागात जलसंधारणाची कामं उभी करणं,

राज्यात अत्याचारांच्या घटनेत बळी पडलेल्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी कायदेविषयक चळवळ उभी केली जावी का? यासह अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली. या स्नेहभेटीत, काव्यमैफिलीत आणि चर्चासत्रात झालेल्या चर्चांवर राज्यव्यापी कामं उभी करण्याचा ठराव करण्यात आला. सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात संविधानात्मक लढा उभारून या लढ्यात बहुजन समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन एक नवी चळवळ उभी करण्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्याचं यावेळी निश्चित करण्यात आलं.

सत्तार शेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *