बॉलिवूडमध्ये आमिर खान, सलमान खान आणि शाहरुख खान या तीन खान मंडळींचा दबदबा आहे. या तिघांचेही चित्रपट म्हटले की ते बॉक्स ऑफिसवर हिट होणारच असंच मानलं जातं. या तिघांपैकीही आमिर खानचे चित्रपट म्हटले की, ते सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे अथवा सामाजिक संदेश देणारे असतात. कारण आमिर चित्रपट निवडताना त्या चित्रपटाच्या विषयावरूनच तो चित्रपट निवडतो असं म्हटलं जातं. तसंच आपल्या भूमिकेचा सगळ्यात जास्त अभ्यास करणारा आणि त्या भूमिकेवर मेहनत घेणारा अभिनेता अशीही आमिरची ओळख आहे. भूमिकेसाठी कितीही कष्ट करावे लागले तरी तो तयार असतो. आपली भूमिका अधिकाधिक चांगली कशाप्रकारे करता येईल यासाठी तो प्रयत्नशील असतो. त्यामुळेच आमिरला परफेक्शनिस्ट असंच म्हटलं जातं. आमिर त्याचे चित्रपट निवडण्यामध्ये खूप चोखंदळ आहे. त्यामुळे इतर कलाकारांच्या तुलनेत त्याच्या चित्रपटांची संख्या ही खूप कमी असते. एका चित्रपटाचं जोपर्यंत पूर्ण काम होत नाही, तोपर्यंत तो दुसर्या चित्रपटाच्या कामाला लागत नाही. इतर कलाकारांप्रमाणे एकावेळी अनेक प्रोजेक्टस्वर काम करणं त्याला आवडत नाही. त्यामुळे अनेक कलाकारांचे वर्षभरात तीन-चार चित्रपट येतात. पण आमिरचा चित्रपट खूप कालावधिनंतर येतो. त्यामुळेच २००९मध्ये ‘थ्री इडियट’सारखा सुपरहिट चित्रपट दिल्यावर त्याचा ‘धूम३’ हा पुढील चित्रपट यायला चार वर्षं लागली होती आणि आतादेखील ‘धूम३’ या चित्रपटाच्या एक वर्षानंतर ‘पीके’ हा चित्रपट प्रदर्शित झालाय. त्यामुळे आमिरच्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच लागलेली असते.

आमिरच्या ‘पीके’ या चित्रपटाची चर्चा तर गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. पण आमिरच्या या चित्रपटाची चर्चा चांगल्या कारणांसाठी न होता नकारात्मक कारणासाठी अधिक झाली. ‘पीके’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाच्या पहिल्या लूकची सगळेच वाट पाहत होते. पण या चित्रपटाचा पहिला लूक येताच लोकांच्या भुवया उंचावल्या. कारण या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आमिर खान नग्नावस्थेत दिसत होता. केवळ त्यात एक ट्रान्झिस्टर होता. आमिरसारख्या अभिनेत्याने अशाप्रकारचं फोटोसेशन केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तसंच आमिरच्या या पोस्टरचा अनेक संघटनांकडूनही विरोधही करण्यात आला. पण या कोणत्याही विरोधांना आमिरने भीक घातली नाही. याउलट पुढच्या पोस्टरमध्ये तर ट्रान्झिस्टरही नसणार असं सांगून त्याने या पोस्टरबाबत आणखीनच खळबळ माजवून दिली. आमिर खानला त्याच्या चित्रपटाची प्रसिद्धी कशाप्रकारे करायची असते याचं गणित चांगलंच जमतं. त्यामुळे या सगळ्याचा चित्रपटाच्या पब्लिसिटीला फायदा होणार याची त्याला चांगली कल्पना होती. आमिरने ट्रान्झिस्टरही नसणार असं म्हटल्यावर चित्रपटाचं दुसरं पोस्टर ज्यादिवशी रिलीज होणार होतं, त्यादिवशी सगळेच सोशल नेटवर्किंगवर डोळे लावून बसले होते. पण या पोस्टरमध्ये ट्रान्झिस्टर नसलेला पण कपडे घातलेला आमिर प्रेक्षकांना पाहिला मिळाला.

आमिर नेहमीच आपल्या भूमिकेत काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करत असतो. ‘पीके’ या चित्रपटात तो ज्याप्रकारे सगळीकडे पाहतो हे खूपच वेगळं आहे. कान ताठ करून आणि डोळे मोठे करून संवाद म्हणणारा आमिर नक्कीच प्रेक्षकांचं मन जिंकतो. तसंच या चित्रपटातील आमिरच्या व्यक्तिरेखेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात आमिरने भोजपुरी संवाद म्हटले आहेत. यासाठी आमिरने खास भोजपुरी भाषा शिकली होती. तसंच या चित्रपटाच्या पहिल्या लूकनंतर त्याने ट्विटरवर त्याचे ट्वीट भोजपुरी भाषेत टाकायला सुरुवात केली होती. त्यामुळे आमिर आता भोजपुरी भाषा बोलण्यात एक्सपर्ट झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. तसंच ‘पीके’ या चित्रपटातील आमिरची संवाद म्हणण्याची स्टाईल त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा खूपच वेगळी आहे. त्यामुळेच या चित्रपटातील आमिरच्या प्रत्येक डायलॉगला प्रेक्षकांच्या टाळ्या मिळत आहेत. त्यामुळे या चित्रपटातून पुन्हा एकदा आमिरने आपण सुपरस्टार असल्याचं सिद्ध केलं आहे.

‘पीके’ या चित्रपटात आमिर खान असल्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. पण त्याचसोबत हा चित्रपट राजकुमार हिरानीचा असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाकडून अधिक अपेक्षा होत्या. राजकुमार हिरानीने आतापर्यंत ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘थ्री इडियट’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. आमिर आणि हिरानीच्या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक चांगला चित्रपट दिलाय. ‘पीके’ या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही चांगली पावती दिलीय. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काहीच दिवसांत या चित्रपटाने कोटीची उड्डाणं करायला सुरुवात केलीय.

‘पीके’ हा चित्रपट पाहताना आमिरच्या अभिनयात प्रेक्षक समरस होतो. हा चित्रपट पाहिल्यावर आमिरला परफेक्शनिस्ट का म्हटलं जातं याचं नक्कीच उत्तर मिळतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *