माज्या सत्यभामा वैनीस,

धुरपदाचा साष्टांग दंडवत।

आज तुला लिहन्याचं कारण म्हंजे मी एका मेळाव्याला गेले. तिथं काय काय ऐकायला मिळालं ते तुला सांगावं असं वाटतंय. वैनी, आमच्या गावाजवळच येणेगुरला राष्ट्र सेवा दलाचा महिला मेळावा होता. आम्ही बचत गटाच्या महिला मेळाव्याला गेल्तो. आपल्या सावित्रीमायचा ३ जानेवारीला जन्मदिन, त्याच्यासाठी हा मेळावा घेतला होता. मेळाव्याला आजूबाजूच्या गावच्या अगदी पार उमरगा, नळदुर्गातून महिला आल्या होत्या. महिलांच्या सामाजिक परिस्थितीवर लोकांनी माहिती दिली. सोलापुरच्या निशाताई भोसले यांनी महिलांच्या व्रताची माहिती दिली. हरतालका, वडपौर्णिमा, वैभव लक्ष्मीचं व्रत आपुन महिला किती डोळं झाकून करतो ते त्यांनी सांगितलं. पार्वतीनं शंकर नवरा मिळावा म्हणून हरतालका केली. म्हंजी मनासारका नवरा मिळावा म्हणून हा उपास करतात. पन आपुन बाया तो लग्नानंतर म्हातारपनी बी करतो. सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून बाया वड पुजतात पन आपला नवरा कधी तसं करतो का? मार्गशीर्षात आपुन वैभवलक्ष्मीचं व्रत करतो पन त्या व्रतानं आपल्याला लक्ष्मी कंदी मिळाली का? आपल्या व्रताचं पुस्तक छापनारा मात्र तालेवार होता. याचा विचार करा असं त्यांनी सांगितलं.

पुष्पाताई क्षीरसागर यांनी बायांना समाजात कमी लेखतात ते सांगितलं. सावित्रीमाय आणि जोतिबांमुळेच आपुन शिकलो. पन आपले विचार आपुन चांगले नाई बनवले. पोरगा-पोरगीत आपुन भेद करतो हे चुकीचं आहे असं त्यांनी सांगितलं. भारती गोवंडे यांनी बचत गटाच्या महिला कशा काम करतात ते सांगितलं. गटाच्या महिला पानी, शिक्षण, आरोग्य यावर काम करतात. तिर्थाच्या महिलांनी गावात पान्याचा प्रश्न गावनकाशा काढून सोडवल्याचं सांगितलं. गंधोर्याच्या महिला हळदी कुंकवाला गावातल्या सगळ्या बायांना बोलावतात त्याची माहिती दिली.

कोल्हापुरच्या बाबा नदाफ यांनी पोरीला पोटात मारू नका असं कळकळीनं सांगितलं. पोराचा जन्म आपुन मोठा साजरा करतो पन पोरगी जन्मली तर कसं वागतो तसं करू नका सावित्री माय, जोतिबांचा आदर्श समोर ठेवून वागा असं ते म्हणाले. त्यांनी शिक्षणाचा पवाडाही छान म्हनला. सुभाष वारे सर म्हणाले, हळदीकुंकू कार्यक्रमाला तुमच्या गावातल्या विधवा महिलांना बोलवा, तुमच्या कार्यक्रमात येणार्या मुस्लीम महिलांचं पहिलं स्वागत करा.

सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. त्यांच्या घरातील बाई मोठ्या धीरानं संसार चालवते. बायकांमध्ये धीर असतो. त्या घर सांभाळतात. मुलांना वाढवतात. आता महिलांनाच पुढाकार घेऊन नवर्याला कर्जाच्या संकटातून भाएर काढावं लागणार आहे. आबा हंबीरे यांनी घरातल्या बाईनं बाईचा दुस्वास करायचं सोडून द्या, असं सांगितलं. बचत गटाच्या महिलांनी व्यवसाय करा. गावातली दारूबंदी करा असं त्यांनी सांगितलं. मेळाव्याच्या शेवटी पन्नालाला सुराणा बोलले. दुष्काळाच्या परिस्थितीचा विचार करा. सरकार रेशनसाठीचा पैसा आपल्या बँकेत जमा करणार पन तुम्ही सरकारला तसं करू देऊ नका. रेशन दुकान सुरू ठेवायला भाग पाडा असं त्यांनी ठासून सांगितलं. आपल्या शेताच्या बांध-बंदिस्तीसाठी रोजगार हमीतून काम करा. गुरांचा सांभाळ करा असं ते म्हणाले.

 

वैनी, त्यांनी राष्ट्र सेवा दल काय करतं त सांगितलं. आपुन जात, पात, धर्म यापासून दूर राहून सर्वांना समान वागवलं पाहिजे असं सांगितलं. गावात पाण्याची टंचाई आहे. टंचाई सार्यांनाच आहे. तिथं जातपात पाळू नका असं त्यांनी कळकळीनं सांगितलं. दुष्काळासंबंधीचा ठराव करून शासनाला पाठवायचा असं मेळाव्यात ठरलं आहे. अजून सांगू का मेळाव्यात आपलं घरच्या मुलींनी चांगली गाणी म्हणली. श्रीराम पोतदार सर आणि खंडूदादांनी संगीत साथ दिली होती. वैशाली शिंदे ताई आफ्रिकेला गेलत्या, त्यांनी तिथल्या आरोग्याची माहिती दिली.

असं काय काय समद्यांनी सांगितलं. वैनी त्या निजगून स्वामी, शिवाजी पोतदार, संतोष बुरंगे, प्रा. शरद गायकवाड सरांचं खरंच आभार! त्यांनी आमाला मेळाव्याला बोलावलं.

वैनी, आमी गटाच्या महिला गावात बैठक घेनार तुलाबी बोलवीन तवा ये बघ!

तुझी,

धुरपदा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *