गुजरातमधील वरिष्ठ गांधीवादी चुन्नीभाई वैद्य यांचं १९ डिसेंबर रोजी ९६ वर्षी वृद्धपकाळाने निधन झालं. आचार्य विनोबा भावे यांच्या आदेशानुसार क्रांतिकार्य करायचं असेल तर संस्था स्थापन करू नका अन्यथा सत्ता आणि धनावर अवलंबून राहावं लागेल असं ते मानत असल्याने त्यांनी कधीच संस्था स्थापन केली नाही. नैसर्गिक साधनसामग्रीवर अधिकार समाजाचा आहे, सरकारचा नाही हे सूत्र संपूर्ण देशाला त्यांनी दिलं. ‘गावाची जमीन गावाची नाही कुणा सरकारची’ या आंदोलनाचे ते प्रणेते राहिले. त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात आसाममधील जंगल-खेड्यांमधून केली. त्यांनी संपूर्ण जीवन गरीब आणि भूमिहिन लोकांच्या उद्धार आणि उन्नतीसाठी समर्पित केलं होतं. १२ वर्षं त्यांनी वाराणसी येथे सर्वोदयी साहित्य प्रकाशन सांभाळलं. असमिया, नगा, आणि मणिपुरी भाषेतील पुस्तकांचं त्यांनी प्रकाशन केलं. सन १९७४मध्ये ग्रामदान आंदोलनादरम्यान ते गुजरातमध्ये परत आले आणि जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनादरम्यान आणीबाणीच्यावेळी त्यांनी ‘भूमिपुत्र’ मासिकाचं संपादन केलं. त्यांनी खुलेआम सेन्सरशिप आणि फ्रिसेन्सशिप आदेशाचा विरोध केला. ७ महिने कारावास भोगला. अहमदाबाद येथील गुजरात लोकसमितीचे अध्यक्ष असताना त्यांनी रतनपूरमध्ये दारूची दुकानं बंद करण्यासाठी

राजस्थान सरकारवरती दबाव टाकला आणि त्यांना यश मिळालं. त्यांनी मद्यनिषेधनिती घोषित करण्यासाठी गुजरातमध्ये आंदोलनाचं नेतृत्व केलं. एम. एल. ए. पेन्शन लॉ निरस्त करण्यासाठी त्यांना सफलता मिळाली. ३५२पेक्षा जास्त गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावं यासाठी त्यांनी आंदोलन केलं. सहा वर्षं बनारसकाटा जिल्ह्यात बनारस आणि सीपू नदी यांच्या प्रवाहामुळे किनार्यावरती वसणार्या गावांच्या अधिकारासंदर्भात आंदोलन करून त्यांना अधिकार प्राप्त करून दिले. त्यांनी नद्यांवर बांध बांधून गावांना सिंचनाखाली आणण्यासाठी भूमिगत बांध बांधण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यामुळे बनारसकाटातील १७ गावांमधील २००० एकरपेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली आली.

१९९७मध्ये विविध संस्थांसोबत त्यांनी गुजरातमध्ये बहुराष्ट्रीय ‘कारगीर’ यांचा विरोध केला आणि पदयात्रेचं नेतृत्व केलं. याचे परिणामस्वरूप कारगीरला आपलं पाऊल पाठी घ्यावं लागलं. त्यांनी सफलतापूर्वक विरोध करून २०० ओला चारा भूमिसाठी गुजरात सरकारला नमवलं. १९९८मध्ये चुन्नीकाकांनी उमरगाव येथील मेगा फोर्ट प्रोजेक्टच्या विरोधात आंदोलनाचं नेतृत्व केलं. डांगोमध्ये ख्रिश्चनांवर होणार्या हिंसेचा त्यांनी विरोध केला आणि धर्म परिवर्तनासाठी कायद्याने कारवाई व्हावी याची मागणी केली.

सन २००० साली कच्छमध्ये आलेल्या भूकंपाच्या दरम्यान विविध गावांमध्ये ग्रामस्वराज्य संघाच्या माध्यमातून त्यांनी करोडो रुपये लोकांना मिळवून दिले. २००२ आणि २००८ मध्ये महात्मा गांधीद्वारा निर्मित नर्सरी ऑफ खादीची बिल्डिंग पाडण्याच्या विरोधात आंदोलन केलं. त्यांना यासाठी गुजरात सरकार अहमदाबाद म्युनिसिपाल्टी कॉर्पोरेशन आणि स्वार्थी बिल्डरांच्या विरोधात संघर्ष करावा लागला. शेवटी सुप्रीम कोर्टात ही केस त्यांनी जिंकली. नंतर या इमारतीला केंद्रीय सरकारने ‘नॅशनल हेरिटेज’ घोषित केलं. २००२मध्ये अहमदाबादमध्ये कर्फ्यू लावला गेला. तेव्हा त्यांनी १५०० लोकांची रॅली काढून शांतीचा संदेश दिला आणि लोकांच्या पुनर्वसनाचं खूप काम केलं. २५० घरं त्यांनी पुन्हा बनवली. शेकडोपेक्षा जास्त हातांना घरेलू रोजगार उपलब्ध करून दिला.

१९५०-७७चा काळ सारा महाराष्ट्र एका वेगळ्या उद्दिष्टाने भारावून गेला होता. एका वेगळ्या चळवळीने लोकांचं जीवनमान व्यापून टाकलं होतं. ज्यांच्याकडे प्रचंड जमिनी आहे त्यांनी त्यांच्याकडील जमीन ज्यांच्याकडे काहीच नाही अशांना दान करावी हा व्यापक आणि आगळा विचार आचार्य विनोबा भावे यांचा होता. तसंच एक वस्ती निर्माण करायची जी संपूर्णपणे स्वावलंबनावर आधारलेली असेल हा विनोबांचा हा विचार घेऊन चुन्नीकाकांनी गुजरातमध्ये तेथील गरीब शेतकर्यांना हक्कांची जमीन मिळवून देण्यासाठी सरकारशी दोन हात केले. म्हणूनच सर्वांनी त्यांना ‘आधुनिक विनोबा’ या नावाने संबोधलं.

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी घोषित केलेली देशातील पडिक जमीन शेतीसाठी आणि बागायतीसाठी वापरावी ही योजना कित्येक वर्षं लालफितीतच अडकली होती. नंतर अचानकपणे गुजरात सरकारने २००५मध्ये एक अध्यादेश काढला. गुजरातमधील सधन शेतकर्यांना आणि उद्योजकांना पडिक जमीन देण्याचा घाट घातला. चुन्नीकाकांनी त्यावेळी नरेंद्र मोदींच्या सरकारकडे विचारणा केली. त्यावेळी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी गुजरात सरकारला दिला. तब्बल ११ महिन्यांच्या जनजागृतीनंतर गुजरातमध्ये चुन्नीकाकांनी रेल रोको, रास्ता रोको केले आणि २००६ ला सरकारच्या महसूल विभागाने चुन्नीकाकांचं म्हणणं ऐकून २००८पर्यंत ७ हजार लोकांना २० हजार एकर जमीन देऊ केली.

वयाच्या ९६ वर्षी देखील प्राकृतिक संसाधन, जल, जंगल, जमीन, समुद्र, नदी, खनिज हे सरकारचं नसून त्यांच्यावर समाजाचा अधिकार आहे आणि यासाठी सरकारने सशक्त कायदा बनवावा यासाठीची त्यांची लढाई आजतागायत सुरू होती. गुजरातमध्ये अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणारा पर्याय कोण असेल तर ‘वन मॅन आर्मी’ असं चुन्नीभाई वैद्यांचं नाव नेहमीच घेतलं जाईल. चुन्नीभाईंनी अनेक पुस्तकं लिहिली त्यात असोसिएशन ऑफ गांधीः ‘फॅक्ट अॅन्ड फॉर्ल्सहूड’ या पुस्तकाचं ११ भाषेत अनुवाद झाले आहेत. या पुस्तकाची एक  लाखांपेक्षा जास्त विक्री झाली आहे.

ते नेहमीच तरुणांबाबत चिंतेत असायचे. चंगळवादी, भोगवादी संस्कृतीकडे वळणार्या तरुण पिढीला तसंच सामाजिक कार्यापासून दूर जात असणार्या तरुणांना आंदोलनामध्ये सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न उपस्थित करणं आवश्यक असल्याचा हा विचार ते आवर्जून मांडायचे. त्यांचं हे ध्येय पूर्णत्वास जायला हवं. सद्भावना संघ त्यांचं हे कार्य पुढे नेईल हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असं मत सद्भावना संघांचे संयोजक किशन गोरडिया यांनी व्यक्त केलं आहे.

 

वर्षा विद्या विलास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *