विसाव्या शतकामध्ये अनेक थोर व्यक्तिंनी या देशामध्ये असामान्य कामगिरी करून आपला स्वतःचा ठसा उमटवला, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे असामान्य कार्य केलं, ज्या परिस्थितीमध्ये कार्य करून जी समाजक्रांती केली तिला इतिहासात तोड नाही. बुद्धतत्त्वज्ञानाच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर त्यांनी मांडलेली लोकशाहीची संकल्पना वैशिष्ट्यपूर्ण आणि जगाने हेवा करावा अशी अविस्मरणीय होय. बाबासाहेबांनी लहानपणीच जातीयतेचे, अस्पृश्यतेचे, शिवाशिवीचे, विटाळाचे चटके सोसलेले होते. अस्पृश्य म्हणून वाट्याला आलेली हेटाळणी, अपमान, सततचा उघड उघड दिसणारा अन्याय, पक्षपाती वागणूक, छळवणूक यामुळे अस्पृश्यांना त्यांच्या गुलामगिरितून मुक्त करण्याचा दृढनिश्चय बाबासाहेबांनी केला. जगातील प्रतिष्ठित विद्यापीठांतून बाबासाहेबांनी मिळवलेल्या अनेक पदव्यादेखील हिंदू धर्माने त्यांच्यावर लावलेला अस्पृश्य जातिचा कलंक पुसू शकत नव्हत्या. समतेचा पुरस्कार करणारे भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा जोतिबा फुले बाबासाहेबांना गुरूस्थानी असल्यामुळे त्यांनी पददलितांच्या शोषणाविरोधात बंड केलं. कुत्र्यापेक्षाही हीन जीणं जगावं लागणार्या हीनदीन, पीडित, दलित, पददलित लोकांचा स्वाभिमान जागवून त्यांच्यामध्ये जगण्याची नवीन उर्मी निर्माण केली. विषमतेने पोखरलेल्या हिंदू धर्मात परिवर्तन घडवण्यासाठी, जातिंचं उच्चाटन करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी दलितांच्या मुक्तिसंग्रामाचं, मानवी हक्कांचं रणशिंग फुंकलं. मानवी हक्काचा पहिला लढा हा महाडच्या चवदार तळ्याचा मानवमुक्तिचा लढा उभारला. सनातनी हिंदू त्या तळ्यामध्ये मुसलमानांना, ख्रिश्चनांना, कुत्र्या-मांजरांना पाणी घेऊ देत असत परंतु त्याच हिंदू धर्मातील फक्त अस्पृश्य जातिच्या लोकांनाच त्या तळ्यातील पाणी पिण्यास, पाणी भरण्यास बंदी घालण्यात आलेली होती. किती ही विषमता! आणि ती ही स्वधर्मीयांमध्येच! का ती? कशासाठी? या जातिच्या उतरंडीमुळे, जातिपातीच्या, गुलामगिरीच्या विरोधात बाबासाहेबांनी महाडचा मुक्तिसंग्राम आयोजित केला. या मुक्तिसंग्रामामध्ये पददलितांच्याबरोबर लोकहितवादीचे नेते आणि सवर्ण ब्राह्मण नेतेदेखील सत्याग्रहाच्या अग्रभागी होते. महाड मुक्तिसंग्रामाने भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला खूप मोठी कलाटणीच मिळाली. पाण्याच्या घोटासाठी, दलितांच्या आत्मसन्मानासाठी, मानवी हक्कासाठी उभारलेला हा लढा दलितांना त्यांच्या अस्मितेची जाणीव करून देणारा लढा ठरला. गुलामाला गुलामीची जाणीव करून देण्यासाठी जी सामाजिक क्रांती या देशात झाली त्या क्रांतिची ही नांदीच म्हणावी लागेल.

या मुक्तिसंग्रामाबरोबरच महाडच्या दुसर्या एका अलौकिक लढ्याने, संग्रामाने महाड हे शहर आणि तो दिवस अजरामर ठरला. तो दिवस होता २५ डिसेंबर १९२७. हिंदू धर्म ग्रंथ मनुस्मृतिचं याच दिवशी दहन करण्यात आलं. मनूने लिहिलेल्या ग्रंथाला हिंदू धर्माची आचारसंहिता समजून ब्राह्मणांनी ‘मनुस्मृति’ला ग्रंथ म्हणून घोषित केलं. त्या मनुस्मृतिमध्येच माणसाला पशुतुल्य समजलं जायचं. या ग्रंथानेच समाजाचं चार वर्णांत विघटन केलं. समाजामध्ये समानतेऐवजी विषमतेचं विष पेरलं, स्त्रियांचे समानतेचे हक्क हिरावून घेतले. अंधश्रद्धा, सनातनी रूढी-परंपरा इत्यादीला खतपाणी घालण्याचं आणि विषमता रुजवण्याचं क्रूर कर्म केलं. शूद्र जातिचा उपमर्द करून, त्यांना प्रगतिपासून वंचित ठेवून त्यांचं आत्मबल नाहीसं करून, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक गुलामगिरी कायम करणारा मनुस्मृती हा धर्मग्रंथ विषमता प्रस्थापित करणारा होता आणि त्यामुळे हा ग्रंथ जाळण्याच्याच लायकीचा आहे असा ठराव महाडच्या परिषदेमध्ये ठरला. बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी हा ठराव मांडला, पा. ना. राजभोज आणि थोरातणी त्याला अनुमोदन दिलं आणि एका साधुच्याहस्ते त्या दुष्ट धर्मग्रंथाची जाहीर होळी करण्यात आली. मनुस्मृतिचं दहन हे समतेच्या संघर्षातील एक ऐतिहासिक पाऊल ठरलं. मनुस्मृतिच्या या दहनाने हिंदू सनातनी धर्ममार्तंडांना तर प्रचंड हादरा बसला. पददलितांमध्ये या घटनेने नवचैतन्य निर्माण झालं. त्यांच्यामध्ये एक प्रकारचा जोश निर्माण होऊन त्यांच्यात निर्माण झालेली ऊर्जा, त्यांचं तेज, त्यांची जागृती, स्वावलंबन हे सर्व पाहून हिंदू धर्मपंडितांनाही घाम फुटला. अस्पृश्यांना सामाजिक गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केल्यामुळे दलितांचं आत्मबल वाढलं. डॉ. आंबेडकरांवर त्यांची अढळ श्रद्धा बसली. अस्पृश्यांना एक खंबीर नेतृत्व मिळालं. या मानवमुक्तिच्या लढ्यामुळेच बाबासाहेबांची कीर्ती संपूर्ण भारतात पसरली. बाबासाहेब इथेच न थांबता अस्पृश्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झगडतच राहिले. परिवर्तनासाठी कर्मठ हिंदुंबरोबर लढे देतच राहिले. परंतु हिंदू धर्मातील धर्मवेड्यांचं, सनातन्यांचं, कर्मठ ब्राह्मणांचं परिवर्तन होईना, हिंदू धर्मात सुधारणा होईना तेव्हा नाईलाजाने १९३५ साली येवले मुक्कामी बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली. ‘मी हिंदू म्हणून जन्मलो परंतु मरताना मी हिंदू म्हणून मरणार नाही!’ या भीमगर्जनेने संपूर्ण देश हादरला! जगातील सर्व धर्मपंडितांनी बाबासाहेबांना आमिष दाखवून आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. आपलाच धर्म आंबेडकरांनी स्वीकारावा म्हणून वेगवेगळ्या धर्माचे लोक बाबासाहेबांना भेटू लागले. बाबासाहेबांनी मात्र जगातील सर्व धर्मांचा अभ्यास केलेला होता. डॉ. बाबासाहेब हे स्वतः ज्ञानी, प्रचंड बुद्धिवादी असल्यामुळे भारतामध्येच उगम पावलेला बुद्ध धर्म त्यांनी स्वतः स्वीकारला आणि नंतर आपल्या पाच लाख अनुयायांना बुद्ध धर्माची दीक्षा दिली. न भूतो न भविष्यती अशी थोर सामाजिक आणि धार्मिक क्रांती केली. सम्राट अशोकानंतर फक्त डॉ. बाबासाहेबांनीच धम्म क्रांतिचं चक्र फिरवलं. या देशात पहिल्यांदाच अशी रक्तहीन क्रांती झाली. या देशामध्ये धर्मांतराचा एवढा मोठा सोहळा यापूर्वी कधीच झालेला नव्हता. जगामध्ये प्रथम अमेरिकन आणि नंतर फ्रेंच राज्यक्रांत्या झाल्या. त्या सत्तेसाठी झाल्या परंतु एकाचवेळी पाच लाख लोकांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश करून क्रांतिकारी धर्मांतर घडवून आणण्याची ताकद फक्त बाबासाहेबांमध्येच होती, हे निर्विवाद सत्य आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांना युगपुरुष म्हणून संबोधलं जातं. फ्रेंच क्रांतिमध्ये राज्यकर्त्या राजाच्या विरोधामध्ये लोकांनी उठाव करून, बंड पुकारून राजाची राजवट उलथून टाकली आणि त्या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचं राज्य प्रस्थापित करून एक मोठी क्रांती केली. बाबासाहेबांनीही या देशाला बौद्ध धर्मातील समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर आधारलेली लोकशाही प्रदान केली. निरनिराळ्या जाती-पंथाचे, प्रदेशांचे, निरनिराळ्या भाषा बोलणारे, धर्माचे लोक भारतात गुण्यागोविंदाने एकत्र नांदताना जगाला पाहायला मिळतात. धर्म ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे. राष्ट्र आणि धर्म या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. राष्ट्राची उभारणी ही सार्वजनिक नीतिच्या आधारावर उभारलेली असावी. आज भाजप भारताला हिंदू राष्ट्र करू पाहत आहे, ते शक्य नाही. धर्म हा माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नसतो! ‘माणसाची जी वैयक्तिक, सामाजिक नीती आहे त्यालाच धम्म संबोधले जाते’, असं बाबासाहेब म्हणतात. पुढे ते असंही म्हणतात की, ‘व्यक्तिचा विकास हेच खरे ध्येय आहे व ते असावयास पाहिजे. त्यासाठी सहानुभूती, समता, स्वातंत्र्य या मूल्यांची आवश्यकता असते. व ती ज्या धर्मात असेल तोच धर्म श्रेष्ठ आहे.’ १६व्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या झंझावाती, घणाघाती भाषणांमध्ये त्यांनी फक्त व्यक्तिविकासावर जोर दिलेला होता. सामूहिक हिताच्यादृष्टीने राज्याचा विकास आणि नंतर देशाचा विकास या गोष्टीच जनते पुढे मांडून भाजपला सत्तेवर आणलं. नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या नावावर मतं मागितलेली नव्हती आणि मागितली असती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालीही नसती. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये अगदी शेवटच्या माणसाचा विकास हाच देशाचा विकास ज्यामध्ये प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, अन्न, वस्त्र, निवार्याची सोय असेल अशा आशययुक्त भाषणांनी लोक भारावून गेले आणि भाजपाच्या हाती सत्ता देऊन नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून त्यांनी स्वीकारलं. परंतु भाजपसत्तेला पुरतं एक वर्षही झालं नाही तोच त्यांच्या अन्य हिंदू संघटनांमधून धार्मिक अराजक माजवण्याचे संकेत मिळत आहेत. भारत हा लोकशाहीवादी देश आहे इथे सर्वांना समान न्याय, समता आणि स्वातंत्र्य आहे. राज्यघटनेच्या कलम २५ ते २८ मध्ये वैयक्तिक धर्माविषयीचे अधिकार नमूद केलेले आहेत. प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीप्रमाणे धर्म स्वीकारता येतो, त्याचा प्रचार-प्रसारही करण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं असताना आज हिंदुत्ववादी संघटना ‘घर वापसी’ या गोंडस नावाखाली धर्मांतरं घडवून आणत आहेत. या हिंदुत्ववाद्यांनी यापूर्वी असं अभियान का राबवलं नाही? यांना आताच हा ‘घर वापसी’चा पुळका का आलाय? ८०० वर्षं गप्प का राहिले? जी लोक ‘घर वापसी’ करत आहेत त्यांना यापूर्वी घरचा रस्ता दिसत नव्हता का? आजच आणि तेही भाजपाच्या राजसत्तेमध्येच त्यांच्या आताच्या मुसलमानी, ख्रिश्चन धर्मांचा त्यांना वीट का आला? तो धर्म चांगला नाही याची उपरती त्यांना आताचा का व्हावी? आणि त्यांना आजच हिंदू धर्माचा उमाळा का यावा? पहिल्या धर्मापेक्षा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे हे त्या धर्मांतर करणार्या लोकांना यापूर्वी का नाही समजलं? वरील प्रश्नांची उत्तरं हिंदुत्ववादी संघटनांकडे नाहीत. त्यांच्याकडे फक्त आज बहुमत आहे आणि याच जोरावर ते आज ‘घर वापसी’ या नावाखाली धर्मांतरं घडवून आणत आहेत, तर दुसर्या बाजूला भाजपचेच लोकप्रतिनिधी नको ती वायफळ मुक्ताफळं उधळून नरेंद्र मोदींना अडचणीत आणू पहात आहेत. सहकार्यांना मोदींनी राजीनाम्याची धमकी दिलेली असतानाही त्यांचा उपद्रव असाच सुरू राहिल्यास त्यांचा राजीनामा अटळ आहे! मग मोदींनी निवडणुकीपूर्वी जनतेला त्यांच्या संकल्पनेतला दाखवलेला व्यक्तिविकास, देशविकास होणं कठीण होईल. अशा या हिंदुत्ववादामुळेच देश अधोगतीच्या, अराजकतेच्या गर्तेत गेल्याशिवाय राहणार नाही. ‘अच्छे दिन’ पाहण्याऐवजी ‘बुरे दिन’ पाहण्याची वेळ देशबांधवांवर येऊ नये ही अपेक्षा!

डॉ. हरिष अहिरे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *