माझ्या छोट्या पडद्यावरच्या कारकिर्दीला आता जवळजवळ आठ-नऊ वर्षं झाली आहेत. ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेद्वारे मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेनंतर मी ‘केसर’, ‘काव्यांजली’, ‘कर्म अपना अपना’, ‘कसम से’, ‘कस्तुरी’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आणि विशेष म्हणजे या सगळ्याच मालिका बालाजी टेलिफिल्म्सच्या आहेत. बालाजी या प्रॉडक्शन हाऊससोबत काम करायला मिळावं अशी अनेक कलाकारांची इच्छा असते. त्यासाठी अनेक कलाकार प्रयत्न करत असतात आणि मी तर आतायर्पंत सगळ्याच मालिका बालाजीसोबतच केल्यामुळे मी खूपच भाग्यवान आहे असं मी समजतो. या मालिकांप्रमाणे मी ‘सर्व्हायव्हल इंडिया’, ‘झलक दिखला जा’, ‘नच बलिये’ यांसारख्या रिअॅलिटी शोज्मध्येही भाग घेतला आहे. मी गेली दोन-तीन वर्षं केवळ रिअॅलिटी शोज्च करत होतो. पण एखादी चांगली मालिका करावी असं मला नेहमीच वाटत होतं. त्याचवेळी मला ‘ये है मोहब्बते’ या मालिकेची ऑफर मिळाली.

‘कस्तुरी’ या मालिकेनंतर ‘ये है मोहब्बते’ ही माझी पहिलीच डेलीसोप मालिका आहे. या मालिकेची संकल्पना मला खूपच आवडली होती. कारण या मालिकेची संकल्पना इतर डेलीसोप मालिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. तसंच या मालिकेत मला ऑफर करण्यात आलेली भूमिका मी आतापर्यंत साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळी होती. त्यामुळे माझ्या कमबॅकसाठी ही भूमिका खूपच चांगली असल्याने मी ही मालिका करण्याचं ठरवलं. आणि मुख्य म्हणजे हीदेखील मालिका बालाजी टेलिफिल्म्सची असल्यामुळे मी माझ्या घरी पुन्हा परतत आहे असंच मला वाटत होतं. त्यामुळेच मी लगेचच या मालिकेची ऑफर स्वीकारली. ‘ये है मोहब्बते’ या मालिकेत मी रमण ही भूमिका साकारत आहे. रमण हा खूप शांत, गंभीर आहे. तो नेहमी आपल्याच विचारांमध्ये गुंतलेला असतो. खर्या आयुष्यात मात्र मी खूप गंभीर नाहीये. मला इतरांबरोबर मजामस्ती करायला, मस्करी करायला आवडते. त्यामुळे रमणपेक्षा मी माझ्या खर्या आयुष्यात खूपच वेगळा आहे. त्यामुळे स्वतःच्या खर्या आयुष्यातील स्वभावापेक्षा खूपच वेगळा असणारा रमण साकारायला मला खूप मजा येतेय. या मालिकेत दिव्यांका त्रिपाठी माझ्यासोबत प्रमुख भूमिकेत आहे. दिव्यांका ही खूप चांगली अभिनेत्री असल्याने तिच्याकडून खूप काही शिकता येतं. दिव्यांका आणि माझं कपल प्रेक्षकांना खूप आवडतं असं मला प्रेक्षक आवर्जून सांगतात. आमची खर्या आयुष्यातली केमिस्ट्री खूप चांगली असल्याने प्रेक्षकांना तीच केमिस्ट्री मालिकेत पहायला मिळतेय. मालिकेच्या सुरुवातीला केवळ माझ्या मुलीमुळे इशिता आणि मी लग्न करतो असं दाखवण्यात आलं होतं. पण आता हळूहळू आमच्या दोघांच्यात प्रेम निर्माण होत आहे. प्रेक्षकांना आमच्या दोघांमध्ये जी भांडणं होतात ती अधिक आवडतात. खरं तर आमची ही भांडणं ही प्रेमाची भांडणं असतात. या भांडणांतूनच आता आम्ही एकमेकांवर प्रेम करायला लागलो आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना आमची ही नोकझोक खूप आवडते.

‘ये है मोहब्बते’ या मालिकेला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं आहे. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालाय. या मालिकेसाठी मला अनेक अॅवॉर्डदेखील मिळाले आहेत. तसंच प्रेक्षकांनादेखील माझी रमण ही व्यक्तिरेखा खूप आवडत आहे. त्यामुळे माझा डेलीसोपमधील कमबॅक यशस्वी ठरला असंच मी म्हणेन. मालिकेच्या सुरुवातीला माझं आणि इशिताचं पटत नाही असं दाखवण्यात आलं होतं. त्यावेळीदेखील मी माझ्या ठिकाणी योग्य आहे, मी काहीही चुकीचं वागत नाही असं सांगणारे अनेक फॅन्स मला भेटत होते.

‘ये है मोहब्बते’ या मालिकेने खूपच कमी वेळात मला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवून दिलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ‘ये है मोहब्बते’ या मालिकेवर आणि रमणवर नेहमी असंच प्रेम करावं, असंच मी त्यांना सांगेन.

करण पटेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *