टीनएजर्सचं भावविश्व उलगडून दाखवणारी श्रुती आवटे या तरुण लेखिकेची ‘लॉग आउट’ ही कादंबरी मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. त्याबद्दल…

श्रुती आवटे या तरुण लेखिकेने आजच्या टीनएजर्सचं भावविश्व आपल्या ‘लॉग आउट’ या कादंबरीतून अतिशय चांगल्याप्रकारे रेखाटलं आहे. तिने अवघ्या १६व्या वर्षी ही कादंबरी लिहिल्यामुळे इतक्या लहान वयात लिहिली गेलेली ही पहिलीच कादंबरी आणि श्रुती पहिलीच लेखिका ठरली आहे आणि हेच या कादंबरीचं खास वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही. श्रुतीला नृत्य, संगीत, अभिनय आणि साहित्य या सगळ्याची आवड आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘फँड्री’ या मराठी चित्रपटात तिने छोटीशी भूमिकाही केली आहे.

श्रुतीच्या या कादंबरीत तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रवेश केलेली नायिका ‘जान्हवी’ची गोष्ट आहे. अवघ्या १४-१५ व्या वर्षात वयात आल्यानंतर मनाच्या भावविश्वात अनेक बदल होत जातात, ते बदल सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही स्वरूपाचे असतात. नकळत एकप्रकारचा एकटेपणा या वयातली मुलं अनुभवत असतात. आपल्याला कोणी समजून घेत नाही असा एक समज त्यांच्या मनात निर्माण होतो… आणि मग आपल्या घरच्यांपासून थोडंसं दूर होऊन, त्यांना मित्र-मैत्रिणी जवळचे वाटू लागतात… आणि ते लॉगिन होतात स्वतःच्याच स्वप्नांच्या जगात… इथे लॉगिन झाल्यानंतरचे अनुभव आणि त्यातून बदलत जाणारी मानसिकता याबद्दल श्रुतीने अतिशय पूरक लिहिलं आहे.

मुलांनी एखाद्या मुलीला कुणावरून तरी चिडवणं, आयटम है यांसारख्या कॉमेंट्स करणं, कुणाचं कुणाशी चक्कर आहे, लाइन मारणं वगैरे चर्चा, आयुष नावाचा मुलगा जान्हवीला हळूहळू आपल्या प्रेमात पडायला भाग पाडतो, त्याच्यामुळे तिची होणारी घालमेल, त्याने तिला जळवणं, आपल्यावर खरंच तिचं प्रेम आहे का हे चेक करण्यासाठी वापरलेले मार्ग, घरातली भांडणं सांगून सहानुभूती मिळवणं, फेसबुकवर मुलीच्या नावाने फेक अकाऊंट उघडून जान्हवीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, आपल्या मित्रांपासून लांब राहण्याचा सल्ला देणं, ती कुणा मुलाशी बोलत असेल तर त्याबद्दल विचारणं, बाहेर भेटण्यासाठीचं ब्लॅक मेलिंग आणि या सगळ्यातून अखंडपणे स्वतःशी संवाद साधणारी जान्हवी आपल्याला भेटते. जान्हवी एकीकडे हळूहळू आयुषमध्ये गुंतत गेली आहे आणि दुसरीकडे ती स्वतःलाच प्रश्न विचारते आहे, अस्वस्थ होते आहे. आयुषबद्दल वाटणारं आकर्षण आणि कुटुंबाबद्दलचं प्रेम या हिंदोळ्यावरचं तिचं मन हा संघर्ष यात येतो.

कादंबरीला ‘लॉग आउट’ हे शीर्षक अतिशय योग्य वाटतं. ही गोष्ट वर्तमान काळातली असल्यामुळे सोशल नेटवर्किंगशी येणारा नायिकेचा संबंध साहजिक आहे… आणि त्यातून लॉगिन, लॉग आउट हे आपल्याला friendly झालेले शब्द. कॉलेज जीवन, मित्र-मैत्रिणी, फेसबुकसारख्या Virtually जगातला वावर… त्यातून निर्माण होणारी व्याकुळता, मनाची तगमग, आशा-निराशेचे अनेक क्षण… मनाची घालमेल. त्या एकटेपणातून निर्माण होणारं कोणाबद्दलचं तरी आकर्षण… त्या आकर्षणात वाहवत गेलेलं कोवळं वय… आणि मग खर्या जगात येताना या स्वप्ननगरीमधून केलेलं ‘लॉग आउट’.

आपल्या या कादंबरीबद्दल श्रुती म्हणते, ‘लॉग आउट’साठी लॉगिन झाले ते साधारण दहावीच्याकाळात… दहावीच्या काळात मी प्रचंड अस्वस्थ होते. शारीरिक, मानसिक बदल होत होते, त्याचा तोल सांभाळणं कठीण जात होतं. मन एक सांगायचं, बुद्धी वेगळंच सांगायची. मनाला प्रेम, भिन्न लिंगी जोडीदार हवा असायचा. बुद्धी नको म्हणून सांगायची. सिनेमा बघून त्याचे वेगळेच परिणाम व्हायचे. या गोष्टी आपल्या आयुष्यात घडाव्यात असं वाटायचं. मोठी माणसं वेगळंच काही तरी बोलायची. हा माझा सगळा संघर्ष स्वतःशीच सुरू होता. मी जे पाहिलं, अनुभवलं त्यातूनच माझी जान्हवी उभी राहिली आहे. माझ्या आसपासचे, माझ्या वयाचे सगळेजणही त्याच फेजमधून जात होते. आपल्याला नेमकं काय हवंय, माणूस म्हणजे काय, प्रेमाचा शोध म्हणजे काय, या सगळ्यामधून झालेला संघर्ष मी मांडला आहे.’

यापुढेही तू अजून काही लिहिणार आहेस का या प्रश्नावर ती म्हणते, ‘कादंबरी लिहून झाली आणि मला प्रचंड समाधान मिळालं, सुख मिळाल्यासारखं जाणवलं. मला जे वाटत होतं ते लिहून मी मोकळी झाले होते. दुसरीकडे अजून काहीतरी सांगायचंय ही हुरहुर होती. हे लिखाण घरच्यांना आवडलं. काही मोजक्या मित्रमंडळींना दाखवलं. त्यांना आवडलं. मग घरच्यांनी ही कादंबरी प्रकाशित करूया असं ठरवलं; पण त्या प्रक्रियेत मी नव्हते. मला लिहायचं होतं ते लिहून मी मोकळी झाले आहे. आता कादंबरी प्रसिद्ध झाली आहे; पण आता यापुढे मी परत कादंबरीच लिहीन असं काही नाही. मला तीव्रतेने जे करावंसं वाटेल तेच मी करेन.’ एकूणच या teenager मुलांची मानसिकता, त्यांच्या अडचणी समजून घ्यायला आपल्या या कादंबरीची मदत होते. अशा अनेक गोष्टी आजूबाजूला घडत असतात त्यामुळे ती खरी वाटते. श्रुतीने तिच्या वयातली घालमेल अगदी आत्मीयतेने आणि मोकळेपणाने लिहिली आहे, त्याबद्दल तिचं मनःपूर्वक अभिनंदन! सर्वांनी आवर्जून वाचावी अशी ही कादंबरी आहे.

पुस्तकाचं नाव – लॉग आउट.

लेखिका – श्रुती आवटे.

प्रकाशक – मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस

मूल्य – रुपये १८०

 

अंजली दासखेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *