आजकाल चार-पाच वर्षांचं मुलही व्हिडीओ चित्रण करू शकतं. आता तर चित्रण करण्याची सुविधा फोनमध्येही उपलब्ध असते. पण अर्धशतकापूर्वी व्हिडीओ कॅमेरा असणं हीच मोठी नावीन्यपूर्ण गोष्ट होती. अध्यक्ष डलासमध्ये येणार म्हणून त्या घटनेचं चित्रण करण्यासाठी एका हौशी गृहस्थाने महागडा व्हिडीओ कॅमेरा खरेदी केला आणि तो नेमका डिली (Dealy) प्लाझाच्या कॉर्नरवर योग्य अँगल साधून उभा होता. केनेडींची मोटार आल्यावर एकच जल्लोष झाला. हा गृहस्थ चित्रण करत होता आणि अघटित ते घडलं. गोळीबाराचे दोन आवाज झाले आणि केनेडीचं मस्तक डाव्या बाजूने, मागील भागात फुटलं. गोळी कवटीवर आदळल्याचा भीषण आवाज झाला. गाडी पुढे निघून गेली पण काही अंतर्यामी मनोबळाच्या जीवावर हे गृहस्थ आजूबाजूस कसं शोकमय वातावरण पसरलं आहे ते व्हिडीओ कॅमेर्यात पकडत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दुःखद घटनेचा साक्षीदार म्हणजे ही एकमेव फिल्म होती! गृहस्थ गर्दीपासून दूर गेले आणि कसं चित्रण झालं आहे ते पहायला फिल्म रिवाईंड केली. एखाद्या कसबी फोटोग्राफरने करावं तसं चित्रण झालं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही फिल्म वृत्तपत्रांच्या चालकांसमोर सादर केली जाणार होती. पण त्या ऐतिहासिक क्षणाचं महत्त्व ओळखून एका वृत्तपत्राने एक लाख डॉलर्स मोजून तो व्हिडीओ आणि त्याचे सर्व वितरण हक्क विकत घेतले. नमूदयोग्य मुद्दा हा की जर त्या माणसाने चित्रण केलं नसतं तर ही खुनाची घटना टिव्हीवर दाखवली जाणं शक्यच नव्हतं! केनेडीची हत्या झाली तेव्हा आपण काय करत होतो हे बहुतेकांना अजूनही आठवतं.

लिडीया सिंपसन ही मेक्सिकोमधील गौरवर्णीय स्त्री. ‘त्या’ दिवशी ही २० वर्षीय तरुणी, जी जॅकी केनेडीला आपला आदर्श मानायची, तिच्यासारखीच केशरचनादेखील करत असे, तिच्या आठवणीत तो दिवस म्हणजे उत्साहाने भारलेला आणि आनंदाने ओसंडून वाहणारा होता. डिली प्लाझाच्या जवळपास तर हजारो लोक जमा झाले होते. कारण त्या ठिकाणी रस्त्याला वळण असल्याने गाडी स्लो होणार हे निश्चित होतं. तिथे केनेडी पतीपत्नींचा चांगला, संग्राह्य असा फोटो काढता आला असता ही सर्वांची अटकळ होती. परेड लिडीयाच्या दृष्टीच्या कक्षेपलीकडे गेली. ती शेजारच्या स्टेशनरीच्या दुकानात दोन वह्या विकत घ्यायला गेली. त्यामुळे तिने ते दोन निर्दयी शॉटस् ऐकलेच नाहीत. वह्या घेऊन ती रस्त्यावर उतरली आणि तिला ताबडतोब जाणवलं की कोणती तरी दुर्घटना घडली आहे. ‘चहुकडे स्मशानशांतता पसरली होती. सगळ्या गाड्या स्तब्धपणे उभ्या होत्या. जणू भोवतालचा परिसर गोठूनच गेला होता. लोक आपापल्या कानांना ट्रान्झिस्टर्स लावून बातम्या ऐकत होते. आपापसांत हळू आवाजात कुजबुजत होते. मला कळेना. जगबुडी होणार आहे की आमच्या देशाविरुद्ध कोणी युद्ध पुकारलं आहे?’… सत्तर वर्षीय लिडीया सांगते. तो दिवस डलास शहराच्या, इतिहासामधला अत्यंत काळाकुट्ट आणि शरमिंदा करणारा होता.

डॉनल्ड पॅटन हा ‘त्या’ दिवशी शाळेत गेला होता. दहावी तुकडीतल्या या विद्यार्थ्याने शाळेच्या पी. ए. सिस्टीमवर अध्यक्षांची हत्या झाली आहे, ही बातमी ऐकली आणि तो अगदी सुन्नच झाला. नाही, हे शक्यच नाही! ऐकण्यात आपलीच काहीतरी चूक झाली असावी, असा त्याचा समज झाला. त्याने वर्गात आजूबाजूला पाहिलं. मुलं अतिशय गंभीर होती. काही मुली तर रडू लागल्या होत्या. पॅटन हा कृष्णवर्णीय माणूस आता ६६ वर्षांचा आहे. त्याने इतिहास कोळून प्यायला होता. एका म्युझियममध्ये हयातभर काम करून तो नुकताच निवृत्त झाला. त्याने जसा अॅलेक्स हेलीने त्याच्या Roots या अत्यंत गाजलेल्या कादंबरीत आपल्या पूर्वजांचा इतिहास शोधून काढला होता आणि ज्याच्यामुळे कुंट किंटे या आफ्रिकन माणसाला गुलाम म्हणून, साखळदंडांनी जखडून कसं अमेरिकेत आणलं गेलं आणि त्याला गुराहून हीनपणे वागवलं, तेच पॅटनने करायचं ठरवलं आणि त्याला धक्कादायक वस्तुस्थिती समजली. ज्या ठिकाणी केनेडीचा खून झाला, तिथून अर्ध्या किलोमीटरवर पॅटनच्या तीन पूर्वजांना झाडाला टांगून फाशी दिली गेली होती! पण त्या ठिकाणी त्या तीन अभागी जीवांचं स्मारक नाही. कोणतीही खूण नाही.

पॅटनचा गळा केनेडीबद्दल बोलताना, आज ५० वर्षांनंतरही दाटून येतो. ‘तो सुरेख दिसायचा. छान बोलायचा. डलासमध्ये वयोवृद्ध डेमोक्रॅटस् होते, पण त्यांच्या बोलण्यात अहंतेचा दर्प असायचा. त्यांची भाषणं म्हणजे कापूस थोडा – पिंजणं फार अशा थाटाची असायची. आणि मग केनेडी राजकीय क्षितिजावर उगवला. त्याचा बॉस्टनचा अॅक्सेंट मला प्रभावित करायचा. हा माणूस अन्याय दूर करेल असा आत्मविश्वास मला त्याच्याकडे पाहिल्यावर जाणवायचा. त्याचा खून झाला आणि मला प्रश्न पडला, आता आम्हा कृष्णवर्णियांचं भवितव्य काय, कोणतं ताट नियतीने आमच्यापुढे वाढून ठेवलं आहे? अलाबामा राज्यात निःशस्त्र काळ्या सत्याग्रहींवर शिकारी कुत्रे सोडण्यात आले होते. तिथे जॉर्ज वॉलेस हा कट्टर वर्णद्वेष्टी गर्व्हनर होता. त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार काय? अमेरिकेच्या इतिहासात आम्हा गरीब, पीडित, दुर्लक्षित जनतेला मदत करू शकणारा महापुरुष- लिंकननंतर हाच – अवतरला पण डलासच्या खुनी माथेफिरूने त्याला मारलं. आमचं सर्व विश्वच काही काळ उद्ध्वस्त झालं.’

रोझमेरी हिनोजोसा ही लॅटिनो अमेरिकन आहे. ग्वाँटमालासारख्या अतिशय गरीब देशातून ती नाना लटपटी करून शेवटी अमेरिकेत आली. ती धर्माने कॅथलिक, जॉन केनेडीसारखीच. त्यामुळे तिच्या मनाचा सांधा ताबडतोब जुळला. जेव्हा २००८ साली बराक ओबामा पहिल्याप्रथम ‘व्हाइट हाऊस’मधील ओव्हल रूममध्ये त्याच्या खुर्चीवर विराजमान झाला, तेव्हा प्रत्येक काळ्या अमेरिकन नागरिकाचा उर अभिमानाने भरून आला होता. नेमकी तशीच मनाची अवस्था रोझमेरीची १९६० साली झाली होती. केनेडी हा पहिला आणि आतापर्यंतचा एकमेव कॅथलिक धर्मीय अध्यक्ष. ही रोझमेरी आता शिक्षकीय व्यवसायामधून निवृत्त झाली आहे. तेव्हा ती १२ वर्षीय मुलगी होती. ‘आमची मधली सुट्टी आटपून मी वर्गात परतले, तेव्हा शिक्षकाने केनेडी हत्येची दुःखद वार्ता सांगितली. आमच्या वर्गात काही इतकी नतद्रष्ट कार्टी होती की त्यांनी त्या बातमीवर बाकं वाजवून आनंद व्यक्त केला’… अशी तिची आठवण आहे. त्या मुलांच्या घरी केनेडींचा तिरस्कार होत असणार. जशी खाण तशी माती.

‘त्यानंतर मात्र मला कुठे बाहेरगावी जाण्याची भीतीच वाटायची. मी डलासमध्ये रहाते म्हटल्याबरोबर ऐकणारे माझ्याकडे पाठ फिरवायचे. मला ओरडून सांगावंसं वाटे. एका अविचारी माणसाने केनेडींची हत्या केली पण मी तशी नाही. मी खुनी नाही आणि आज ५० वर्षांनंतरही काँग्रेसमध्ये ‘टी पार्टी’ या नावाने कार्यरत असलेला गट हा पक्का वर्णद्वेषीच आहे. हा गट फार मोठा नाही पण गहजब करण्यात, तिरस्काराने बरबटलेल्या जाहिराती झळकावण्यात हा पुढे आहे. सुदैवाने त्यांना जनमताचा आधार नाही. नपेक्षा ओबामा दोन वेळा निवडून आलाच नसता. आता डलास अंतर्बाह्य बदलत आहे. काळे लोक आणि लॅटिनोज् यांची संख्या वाढते आहे. मला खात्री आहे की, आम्ही आता जरी अल्पसंख्य असलो तरी केव्हातरी बहुसंख्य होऊच. मग आमच्या प्रगतीच्या गाड्याला खिळ लावणारे कस्पटाप्रमाणे उडून गेलेले असतील.’

केनेडीच्या हत्येचं गूढ अजूनही उलगडलेलं नाही, असं ३० टक्के अमेरिकन्सना वाटतं. ली हार्वे ऑस्वल्डला साथीदार होता असं कित्येकजण ठामपणे सांगतात. काही भाबड्या जीवांचा समज आहे की केनेडी ‘त्या दिवशी मेलाच नाही, त्याच्या मस्तकातल्या दोन्ही गोळ्या काढल्या गेल्या पण त्याची अवस्था ‘जिवंत-मृत’ (Vegetable) अशी झाली. अशा अध्यक्षांचं काय करायचं? याची घटनेत तरतुदच नव्हती. म्हणून त्याला एका निर्जन बेटावर हलवण्यात आलं. तिथे तो पाच वर्षं जगला. त्यानंतरच जॅकी केनेडीने अॅरिस्टॉटल ओनॉसिसशी दुसरी शादी केली.’ त्या थिअरीत काहीही तथ्य नाही. अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत देशात प्रसारमाध्यमं ही इतकी कार्यक्षम आहेत की असली घटना लपून रहाणं शक्यच नव्हतं. पण ज्यांना मृत्यू झाला हे सत्यच नाकारायचं असेल, त्यांच्यापुढे कोणतंही लॉजिक निष्प्रभच ठरेल. १९७७ साली मरण पावलेला अल्व्हिस प्रेस्ली आम्हाला काल अमुक ठिकाणी दिसला असं सांगणारे आहेतच. १९४५ साली विमान अपघातात नेताजी सुभाषचंद्र बोस मरण पावले नाहीत, यावर अजूनही विश्वास ठेवणारे सापडतातच ना!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *