जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षाकरता जाहीर केलेलं घोषवाक्य आहे ‘Small Bite, Big Threat’ म्हणजेच डासांसारख्या किटकांच्या दंशाने झालेले जीवाला धोका निर्माण करणारे आजार आणि याचाच प्रत्यय सध्या येतोय. आजमितीस मुंबई शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ‘मुंबईत डेंग्यूचा कहर’ ही केवळ ‘एक बातमी’ मला काय त्याचं? हा विचार न करता, एक सुजाण आणि सुशिक्षित नागरिक म्हणून मला काय करता येईल? हा विचार केल्यास निश्चितच संपूर्ण मुंबईचं आरोग्यमान सुधारण्यास मदत होईल.

‘कलमनामा’च्या संपादकांकडून डेंग्यूबद्दल लिहिण्याचं पत्र मिळालं तेव्हा निव्वळ एक प्राध्यापक आणि महानगरपालिकेतील ‘पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्रा’ची विभागप्रमुख म्हणूनच नव्हे तर नुकताच मला स्वतःला ‘डेंग्यू’ होऊन गेल्याने ‘स्वानुभव’ गाठीशी असलेली एक मुंबईकर म्हणून या आजाराबद्दल मला असलेली माहिती आपल्यासमोर मांडत आहे.

लक्षणं

थंडी वाजून येणार्या तापामध्ये डेंग्यूचाही समावेश होतो. अगदी मलेरियासारखी हुडहुडी भरत नाही पण थंडी वाजते. अंग दुखतं म्हणूनच डेंग्यूला ‘ब्रेक बोन फीव्हर’ म्हणतात.

डोकंदुखणं, डोळ्यांच्या मागे दुखणं, कधीकधी लालसर रॅशदेखील दिसू शकतो आणि प्रचंड थकवा जाणवतो. १०३-१०४०c पर्यंत ताप जातो आणि काही तासांनी आपोआप खाली येतो. तापाचा कालावधी कधी ३-४ ते ५ दिवसांपर्यंतदेखील असतो.

‘डेंग्यूचं वेगळेपण’

इतर तापात एकदा ताप गेला की काळजी नसते. डेंग्यूच्याबाबतीत मात्र ताप उतरल्यानंतरही पूर्ण बरं वाटेपर्यंत विश्रांती आणि शरीरातील पाणी आणि क्षार यांचं संतुलन म्हणजेच Hydration) राखण्याची गरज असते.

डेंग्यू या आजाराकरता कारणीभूत ठरणार्या व्हायरसचे ४ Strains आजपर्यंत लक्षात आलेले आहेत, त्यातील प्रत्येक तर्हेच्या व्हायरसमुळे झालेल्या डेंग्यूमुळे त्या तर्हेच्या तापापासून प्रतिकारशक्ती मिळते मात्र दुसर्या डेंग्यूच्या व्हायरसमुळे जर पुन्हा Infection झालं तर आपल्या शरीरातील पेशी इतर पेशींच्या विरुद्ध काम करून ‘Platelet’ या पेशींची संख्या घटते आणि ‘डेंग्यू हेमरेजिक शॉक सिंड्रोम’ होऊ शकतो. त्याचबरोबर इतर अवयव म्हणजे मुख्यत्वे फुप्फुसं, लिव्हर आणि किडनी निकामी झाली तर Multi Organ Failure झाल्याने जीवाला धोका संभवतो आणि म्हणूनच जे ‘कीटक’ डेंग्यू पसरवतात, त्यांचं उच्चाटन हा प्रतिबंधनात्मक प्रभावी उपाय आहे.

डेंग्यूच्या व्हायरसमुळे ग्रासलेला डास एका रुग्णाला चावल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनाही चावला आणि त्यांची प्रतिकारकशक्ती खालावलेली असेल तर त्यांनाही डेंग्यू होतो.

पर्यावरण आणि डेंग्यू

यावर्षी आपण मुंबईत एकाच घरात अनेक लोकांना डेंग्यू झाल्याचं वाचलं आणि त्यातील कितीतरीजणांच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी डासांच्या ‘अळ्या’ सापडल्या. डेंग्यूचे डास हे दिवसाउजेडी चावत असल्याने घराबाहेर, कामाच्या ठिकाणच्या परिसरातही साठलेल्या पाण्याचा निचरा केलेला आहे का नाही हे पहाणं गरजेचं आहे.

मुंबईतील काही घरं ही कित्येक दिवस बंद असतात अशा घरातील कमोडच्या भांड्यात असलेलं पाणी हे डेंग्यू डासांची पैदास करण्यास पुरेसं असतं. तेव्हा ‘सोसायटी’तल्या बंद असलेल्या घरांमध्ये आठवड्यातून निदान एकदातरी ‘कमोड’मधील पाणी फ्लश करून टाकता येईल किंवा त्यात डास होऊ नयेत म्हणून उपलब्ध असलेली काही जंतूनाशक औषधं टाकून ठेवता येतील अशी सोय करण्याची आवश्यकता आहे आणि याकरता सोसायटीने काही नियमावली आणि लोकजागृती केली तर खचितच त्याचा उपयोग होईल.

इतर पाणी साठवण्याच्या जागा म्हणजे एअर कंडिशनरचे ट्रे, झाडाच्या कुंडीच्या खाली पाणी गळून जाऊ नये म्हणून ठेवलेली बशी, एकावर एक बादल्या रचून ठेवताना आत राहिलेलं पाणी आणि ‘येईल उपयोगास’ म्हणून वळचणीला ठेवलेल्या वस्तू तसंच माळ्यावरीला जागेत साठून आणि साठवून राहिलेलं पाणी डासांनाच नव्हे तर बुरशीलाही आमंत्रण देऊ करतं.

आपण जिथे राहतो, काम करतो त्या जागेची सतर्कतेने केलेली ‘स्वच्छता’ ही कोणत्याही संघाच्या आवाहनामुळे असेल, आरोग्यखात्याने केलेल्या जनजागरणामुळे असेल की मुंबईतील डबेवाल्यांमार्फत आलेल्या संदेशामुळे असेल ती मनापासून होऊ द्या.

जागतिक आकडेवारी पाहिली तर डेंग्यूवर काही दशकं संशोधन झालं आहे आणि त्यावर Vaccine तयार करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. १९५० आणि १९६० साली एशिया-पॅसिफिक खंडात झालेल्या डेंग्यूच्या प्रादुर्भावामुळे १९६४मध्ये बँकॉक इथे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं होतं. १९९५ साली जागतिक पातळीवर प्रतिबंधतात्मक उपायांवर सूत्री तयार करण्यात आली. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डेंग्यू हा प्रामुख्याने ‘मानवनिर्मित’ आजार आहे. मुंबईसारख्या शहरात कोणतंही नियोजन न करता जेव्हा लोक ‘नशीब आजमावण्याकरता’ नव्याने येतात, तेव्हा त्यांची अन्न-वस्त्रांची तर सोय होते, परंतु निवार्याकरता लागणार्या मूलभूत सुविधांची सोय काही एका दिवसात होऊ शकत नाही. मग पाण्याची सोय अनेकदा महापालिकेच्या जलवाहिन्या फोडून केली जाते आणि तेव्हाच त्या जलवाहिनीच्या बाजूला जमतं वाहिलेल्या पाण्याचं तळं आणि अशाच ठिकाणी डासांची पैदास होऊ शकते. मात्र अशा गोष्टींकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. तसंच दिवसातून एकदाच येणारं पाणी साठवल्यावर, घनकचर्याचा निचरा करण्याचं विसरल्यावर डासांना आयतं घर आपणच निर्माण करतो आणि म्हणूनच डेंग्यूवर मात करायची असेल तर केवळ आरोग्यखात्यानेच नव्हे तर जगातील प्रत्येक शहरातील प्रत्येक नागरिकाने सतर्क होऊन काही तत्त्वं पाळली पाहिजेत. कारण डेंग्यूचे वाहक केवळ मुंबईतच नव्हे तर नाशिकात आणि विदेशातही आहेत. डेंग्यूची पहिली साथ Philippines मध्ये १९५३मध्ये तर Thailand मध्ये १९५८ साली आली. भारतात १९६३मध्ये DHF म्हणजे Dengue Hemorrhagic Fever चा प्रादुर्भाव लक्षात आला.

डेंग्यूचा विषाणू

Genus Flavivirus मधील ५०mm आकाराचा Single Strand RNA असलेला हा विषाणू चार तर्हेच्या Serotype मध्ये आहे. DEN-1, DEN-2 DEN-3, DEN- 4. एका तर्हेचं Infection हे त्या प्रकारच्या Serotype बद्दल कायमची प्रतिकारशक्ती देतं परंतु पुन्हा दुसर्या Serotype ने Infection झाल्यास जास्त त्रासदायक डेंग्यू होऊ शकतो.

डेंग्यूचे वाहक Aedes aegypti हे आफ्रिकेतल्या जंगलात उगम असलेले डास आहेत. दुसर्या तर्हेचे म्हणजेच Aedes albopictus हे डास बोटीतून जुन्या टायर्सची वाहतूक करताना जगात इतरत्र पसरले.

डॉक्टर्सना डेंग्यू का?

डेंग्यूचा प्रसार हा डेंग्यूच्या रुग्णाला चावलेल्या डासामार्फत होत असल्याने हॉस्पिटल्स, शाळा, धार्मिक ठिकाणं, करमणुकीची ठिकाणं जिथे आपण दिवसा अधिक काळ व्यतीत करतो, तिथे झालेला दिसतो. रुग्णसेवा करणार्या निवासी डॉक्टर आणि कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी डास असतील तर Risk कित्येक पटींनी वाढते. याचं कारण डेंग्यूचा डास हा एकाच माणसाला चावून थांबत नाही तर तो एकावेळी अनेकांना चावतो.

पर्यावरणातील बदल आणि ३५० ते ४००ष् तापमान हे डेंग्यूला पोषक आहे. २०ष् वाढलेल्या उष्णतेमुळे डासांनादेखील Dehydration होऊन त्यांचं माणसाला चावण्याचं प्रमाण वाढलं आहे.

ताप आल्यास काय कराल?

१. ताप आल्यास प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. घरी असलेल्या रुग्णांनी आवश्यक विश्रांती घेणं गरजेचं.

पुरेसं पाणी असलेले पदार्थ उदाहरणार्थ, भाताची पेज, ताक, फळांचा घरी काढलेला रस (Canned Juice नव्हे), OR Solution, दूध घ्यावं मात्र कॉफी टाळावी.

२. ताप खाली आणण्याकरता ओल्या कापडाने अंग पुसून घ्यावं (Tepid Spring -कोमट पाणी वापरावं, गार पाणी वापरू नये). पाण्यात कपडा भिजवून पूर्ण अंग पुसून घ्यावं.

३. ताप खाली आणण्याकरता डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे औषधांचा वापर करावा. मात्र Aspirin आणि NSAID अजिबात वापरू नयेत.

४. इतर आजार उदाहरणार्थ, डायबेटिस असेल तर Blood Sugar देखील तपासून योग्य प्रमाणात औषध आणि Hydration राखणं गरजेचं आहे.

५. लघवीचा रंग डार्क दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना कळवणं गरजेचं आहे.

प्रतिबंधन डेंग्यूचं – (IVM)

Integrated Vector Management Approach

जबाबदारी आणि सहभाग लोकवस्त्यांचा अर्थात समाजाचा

(Community participation)

जिथे डासांची पैदास होते आणि त्यांच्या लपून बसण्याच्या जागा असतात त्याजागी आपण स्वतः, शाळेत जाणार्या मुलांपासून ते घरातील आजी-आजोबांपर्यंत सर्वांनीच ‘डास निर्मूलन मोहीम’ हातात घेण्यास काहीच हरकत नाही. त्याकरता आवश्यक असलेलं आरोग्यशिक्षण ‘कलमनामा’सारख्या साप्ताहिकातून तसंच इतर माध्यमांतून निश्चितच करता येईल.

आपल्या परिसरातील पाणी साठून राहणार्या आणि पाणी साठवण्याच्या जागांचं निरीक्षण करून ‘डासांच्या अळ्या’ शोधण्याचं काम सध्या पालिकेतर्फे करण्यात येतं आणि मग दंड आकारण्यात येतो. पण यात आपण आरोग्यखात्यातील ‘काही हजार’ कर्मचार्यांवर ‘काही कोटी’ माणसांची जबाबदारी टाकतो. प्रश्न आपल्या स्वतःच्या आरोग्याचा असल्याने केवळ इतरांना दोषी न ठरवता आपण स्वतः ही जबाबदारी स्वीकारली तर मुंबई Clean-up करायला पुढच्या साथीची वाट बघावी लागणार नाही.

आपल्या सणांना किंवा सणाच्याआधी आपण साफसफाई करतोच. त्याऐवजी किंवा त्याचबरोबर डासांची पैदास रोखण्याचे प्रयत्न जोडल्यास अशक्य ते शक्य होईल आणि मग जे नागरिक स्वतः ही काळजी घेतील ते आरोग्यरक्षकच बनतील. तसंच त्यांना स्वतःलादेखील कोणताही Insurance न वापरता आपल्या कुटुंबाचं रक्षण केल्याचं समाधान निश्चित मिळेल.

परदेशातदेखील असे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. ‘Together Picket-Indonesia दर २५ ते ५० घरांमागे एका घरातील मुख्य स्त्रिला ‘प्रमुख’ म्हणून निवडलं जातं. या ‘Dasa Wisma’ ला एक ‘Source Reduction Kit’ दिलं जातं. त्यात एक पुस्तिका आणि एक Flashlight असतो की ज्याने काळोख्या जागेतील डासांच्या अळ्या शोधता येतात. एका घरातील लोक इतर नऊ घरांत हा शोध घेतात दर आठवड्याला आणि अशा तर्हेने एका घराची दर १० आठवड्यांनी हे काम करण्याची पाळी येते. ते फॉर्म भरून या अळ्या सापडल्या तर नष्ट करण्यासाठी योग्य उपायांकरता आरोग्यखात्याला बोलवतात कारण एका डासाची अंडी उष्ण तापमानात तशीच रहातात आणि पाण्याशी संपर्क आल्यावर अळ्या वाढतात.

सामाजिक चळवळ

मुंबईचं आरोग्यमान उंचावण्याकरता पर्यावरण, आरोग्य, बांधकाम खातं अशा पालिकेच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमांबरोबर नागरिकांचा सजग, सतर्क सहभागही अत्यंत जरुरीचा आहे.

लोकांचं आरोग्य ही महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहेच आणि ती उत्तम तर्हेने पार पाडण्याकरता विशेषतः साथीच्या रोगांना आळा घालण्याकरता Public Works आणि Building sector, पाणीखातं, शिक्षण, अर्थात लोकशिक्षण आणि पर्यावरण खातं यांनी पाण्याचा योग्य निचरा, स्वच्छ पाण्याचा साठा, सांडपाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था, पर्यावरणास उपयुक्त झाडांची लागवड असे कार्यक्रम हाती घेऊन संघटित कार्य केल्यास मुंबईला तसंच

राज्याला आपल्या संघटित प्रयत्नांनीडासांची संख्या नक्कीच घटवता येईल आणि आपलं आरोग्यमान सुधारल्याचा आनंद मिळेल.

(लेखिका केईएम रुग्णालयाच्या चेस्ट मेडिसिन विभाग आणि पर्यावरण प्रदुषण संशोधन केंद्राच्या प्रमुख आहेत.) दूरध्वनी ०२२-२४१३२२९६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *