ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे यांचं ‘प्रकाशफुले’ हे पुस्तक जे. के. मीडियातर्फे नुकतंच प्रकाशित करण्यात आलंय. सकारात्मक वृत्तीने जगणार्यांसाठी आयुष्य किती सुंदर आहे हे सांगणार्या सकारात्मक विचारांच्या लेखमांचा हा संग्रह आहे. यातलाच काही भाग…

 

काही माणसं जन्मतःच वेगळे गुण घेऊन जगात येतात. कुटुंबीयांच्या जीवनमूल्यांमुळे, संस्कारामुळे त्यांचे हे गुण आणखी विकास पावतात. अशी माणसं नशिबाने केलेल्या हल्ल्यांशी संघर्ष करत ताठ मानेने जगताना दिसतात, तेव्हा त्यांच्यातील आत्मतेज आपल्याला चकित करतं. प्रोत्साहित करतं. प्रेरणा देत. अरविंद प्रभू अशा व्यक्तिंपैकी एक! संस्कारी, सेवाभावी, प्रसन्नचित्त अशा कुटुंबात अरविंद जन्मला. आईवडील दोघेही डॉक्टर असल्याने दुसर्याची दुःखं जाणून घेऊन ती दूर करण्याचं मूल्य कुटुंबात जोपासलं गेलं होतं. अरविंदही नेहमी हसतमुख, दुसर्याला मदत करायला तत्पर, वाचनाची, खेळाची आवड असलेला मुलगा! आई डॉ. पुष्पाताई प्रभू यांचा दवाखाना आपण डॉक्टर होऊन पुढे चालवायचा आणि समाजकार्यात झोकून दिलेले वडील डॉ. रमेश प्रभू यांचं समाजकार्याचं व्रतही घ्यायचं हे अरविंदने ठरवलंच होतं.

त्याने एम.बी.बी.एस.ला प्रवेश घेतला. डॉक्टर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आणि मग ध्यानीमनी नसताना नियतीचा भयंकर आघात झाला. अरविंदच्या गाडीला अपघात झाला. धावपळ करून त्याला उत्तम इस्पितळात दाखल केलं गेलं. चार दिवस फार अनिश्चिततेचे होते. तो भानावर येई, परत

बेशुद्धावस्थेत जाई. आशा मालवणारा आणि आशा पालवणारा खेळ चालू होता. अपघात भयंकर होता. कमरेखालचं शरीर सुन्न झालं होतं. हाताच्या बोटांचं चलनवलन मर्यादित झालं होतं. अखेर अरविंद भानावर आला. आपल्या अपघाताची आणि संभाव्य परिणामांची त्याला कल्पना होती. सर्वात पहिल्यांदा त्याने आपल्या आईबाबांना सांगितलं, ‘तुम्ही काळजी करू नका. मी बिछान्याला खिळून पडून रहाणार नाही. माझ्या स्वावलंबी जगण्यासाठी सगळे प्रयत्न करीन.’ त्याच्या आईबाबांच्या मनात दुःख, भीती, चिंता असलेच! पण अरविंदच्या या दृढतेने ते त्यावेळी नक्कीच आश्वस्त झाले असतील. भाऊ, बहीण, आई, वडील इतर कुटुंबीय, स्नेही अरविंदच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले. त्याच्या हालचाल न होणार्या अवयवांमध्ये प्राण संचारावेत म्हणून प्रगत परदेशी वैद्यकतज्ज्ञांकडूनही उपचार करून घेतले. या दरम्यान अरविंदनेही निराशा, दुःख, वैफल्य यांच्याशी दोन हात केले.

आता आयुष्याची पुनर्रचना करणं हे पहिलं लक्ष्य होतं. चाकाची खुर्ची हेच फिरण्याचं साधन असेल हे जाणून अरविंदसाठी योग्य अशी चाकाची खुर्ची बनवली गेली. नियमित व्यायाम, औषधोपचार चालू ठेवून आता अरविंदची तल्लखबुद्धी, वाणी आणि लोकसंपर्क यांच्या साहाय्याने अर्थोत्पादनाच्या मार्गाविषयी आईवडिलांच्या सल्ल्याने, मदतीने सर्व कुटुंबीयांच्या पाठिंब्याने ऑरबिट केबल नेटवर्कचा व्यवसाय सुरू केला. इतर केबल व्यवसायधारकांशी स्नेह, सहकार्य, अडचणीच्यावेळी सल्लामसलत असं त्याने आपल्या स्वभावधर्मानुसार सुरू ठेवलं. त्यामुळे त्या सार्यांचं नेतृत्व, एकप्रकारे आपोआपच त्याच्याकडे चालून आलं.

पूर्वीची दंगामस्ती, लगोर्या, क्रिकेट, झाडावर चढणं, गिरीभ्रमण वगैरे आपण करू शकणार नाही हे शल्य कुठेतरी मनात उमटलंही असेल. पण त्याच्या प्रसन्न हसतमुख चेहर्यावर त्याचा मागमूस नव्हता. निराशा, भय, औदासिन्य सारं काही त्याने हद्दपार करून टाकलं. जे नाही त्याची खंत बाळगायची नाही ही सर्वात कठीण गोष्ट त्याने साध्य केली होती. आपल्या व्यवसायात त्याने मेहनतीने चांगला जम बसवला. अर्थार्जनाच्यादृष्टीने तो स्वावलंबी झाला. व्यवसायात संघर्ष होतेच, त्यांच्याशी सामना करत असताना २०१२ साली सरकारने डिजिटायझेशन अनिवार्य केलं. पण हे सारं फार घाईघाईने केलं. पाश्चात्य देशांमध्ये सात-आठ वर्षांच्या कालावधित हळूहळू टप्प्याटप्प्याने जे काम केलं गेलं ते इथे दोन-तीन वर्षांत करण्याची कसली निकड होती? या व्यवसायात देशभर लहान-मोठे साठ हजार केबल ऑपरेटर्स होते. त्यांच्यामार्फत पाच लाख लोकांना काम मिळालं होतं. रोजीरोजी मिळाली होती. त्यांचं अस्तित्व संपणार होतं. म्हणून या सार्यांना संघटित करून संघर्षाला सुरुवात केली. केबल उद्योग फार बलाढ्य आहे. दरवर्षी सुमारे पस्तीस हजार कोटींची उलाढाल होते. आपला चित्रपट उद्योग फार मोठा समजला जातो. त्याच्या पाचपटीने हा व्यवसाय मोठा आहे. हा एवढा व्यवसाय केवळ पाच-सात व्यक्तिंच्या हाती एकवटणार होता. व्यावसायिक एकाधिकारशाही आपल्यासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात घातक ठरते म्हणून मग अरविंदने लढा उभारला. त्याने नुकतीच सहा-सात राज्यांतील केबल ऑपरेटर्सची परिषद घेतली. त्यासाठी सलग पंधरा-वीस तास काम केलं. या सगळ्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याची तयारी सरकारने दाखवली हे अरविंदचं मोठं यश म्हणावं लागेल. चाकाच्या खुर्चीवर बसून शरीरसक्षम माणसांपेक्षा अधिक कर्तृत्व दाखवण्याची त्याची धमक, त्याची जिद्द, चिकाटी, परिश्रम, सारं काही शब्दांपलीकडचं म्हणता येईल.

दुसरीकडे त्याने समाजकार्य सुरू केलं. आपल्या देशात अपंगांची एकंदर स्थिती काय आहे? समाजाचा दृष्टिकोन कसा आहे? त्या दिशेने सरकार कोणती पावलं उचलत आहे? शारीरिक दुर्बलता असलेल्या व्यक्तिला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्याचं जगणं सर्वसामान्यसारखं होईल, स्वावलंबी होईल, त्यांना मानाने जगता येईल, यासाठी सर्व तर्हेच्या सोयी, सुविधा, साहाय्य करण्याची सरकारची तयारी हवी. याबाबतीतल्या योजना पूर्णत्वाला नेण्याची इच्छाशक्ती हवी, समाजाचा सक्रिय पाठिंबा वा सहकार्य हवं. हे घडत नसेल तर त्या दिशेने लोकांची संवेदनशीलता वाढवणं आणि जाणीव जागृती करणं हे आपलं उद्दिष्ट असेल असं त्याने ठरवलं. याच सुमारास अपंग विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून त्याची नियुक्ती झाली. रुग्णालं सरकारी कचेर्या, चित्रपट-नाट्यगृह, शिक्षणसंस्था, लिफ्ट,

पर्यटनस्थानं, देवालयं आणि मोठी सभागृहं या स्थानी चाकांची खुर्ची जाऊ शकेल अशा अपंग स्नेही सोयीसुविधा हव्यातच. त्याबद्दल एकंदरच आपल्याकडे

अनास्था आहे असं त्याच्या लक्षात आलं.

माधवी कुंटे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *