परवा आम्ही मैत्रिणी दोन दिवसांच्या सहलीला गेलो होतो. आमचं जाण्याचं ठिकाण सोलापुरजवळ होतं. पावसाचे दिवस पण पाऊस नव्हता. मात्र पठारी प्रदेश असल्यामुळे हवेत गारठा होता. जोराचा वाराही सुटला होता. मुंबईच्या लोकांना तर असल्या गारठ्याची सवयच नसते. त्यातून ज्येष्ठ नागरिकांना तर फारच थंडी वाजते. रात्री जेवणं आटपून रात्रभर गुडूप मस्त झोप लागली. सकाळी उठून गरमागरम कॉफीचा आस्वाद घेतला. सगळीकडे सोलर इलेक्ट्रिसिटीचा प्रबंध केला होता. पण त्या गारठ्यात गिझरचं पाणी कितपत गरम असेल अशी शंका आली. काहींनी तशा गारठ्यात भराभरा स्नानं उरकली. एका मैत्रिणीला विचारलं, ‘पाणी कितपत गरम आहे?’ ती म्हणाली, ‘काटा मोडण्याइतपत आहे.’ किती वर्षांनी हा शब्दप्रयोग कानावर पडला. सध्या पाण्याचे दोनच प्रकार कानावर येतात, गरम आणि गार. क्वचित कोमट, थंड हे शब्द ऐकू येतात.

काटा मोडणं यातील काटा आणि मोडणं या दोन्ही शब्दांच्या एकत्रिकरणाने वा या वाक्प्रचाराने थंडीत अंगावर घेण्याइतकं पाण्याचं तापमान आहे असं सूचित केलं जातं. थंडीत गारठ्याने अंगावर काटा किंवा शहारा येतो तो कमी करण्याइतपत पाणी म्हणजे काटा मोडणारं पाणी. हा काटा भिन्न भिन्न रूपात आपल्या भाषेत येतो आणि भाषेची अर्थवाहकता वाढवतो आणि अर्थच्छटाही व्यक्त करतो. काही माणसं काट्यासारखी दुसर्यांना सलत असतात यालाच काट्यासारखं सलणं म्हणतात. त्या माणसांच्या मनात दुसर्या माणसांबद्दल द्वेष वा असूया निर्माण झालेली असते.

काही वेळा एखाद्या साध्या गोष्टीकडे, किरकोळ आजाराकडे वा घटनेकडे दुर्लक्ष केलं, तर तो बळावण्याची शक्यता असते. तो बरा करण्यासाठी खूप पैसा, वेळ आणि शक्ती खर्च करावी लागते, यालाच काट्याचा नायटा होणं म्हणतात. वेळीच काटा उपटून टाकणं गरजेचं असतं. म्हणजेच त्रासदायक शत्रुला वेळीच नामोहरम करावं लागतं, यालाच काटा काढणं म्हणतात.

काटेकाळजी करणं, कोणतीही कृती करताना अगदी नेमकेपणानं करणं. कोणतीही इजा होणार नाही अशी दक्षता घेणं. म्हातारीने अगदी काटेकाळजीने नातवाला वाढवलं. काळजी घेणारी वा जबाबदारी पेलणारी व्यक्ती याप्रमाणे वागत असेल तर हा वाक्प्रचार वापरला जातो. महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोशात लोकमान्य टिळकांच्या एका लेखातील उदाहरण या वाक्प्रचारासाठी दिलं आहे. नवीन गव्हर्नर हे काट्याकाळजीने आणि निःपक्षपाती बुद्धीने आपलं काम करतील. विलायतेहून जेव्हा नवीन गव्हर्नरची नियुक्ती केली जात असे तेव्हा त्याच्याबद्दलची माहिती ‘केसरी’तून दिली जात असे.

काट्यावाचून गुलाब नाही असं म्हटलं जातं. गुलाबाचं फूल आकर्षक, मोहक आणि सुगंधीही असतं. पण त्याच्या देठाला काटे असल्यामुळे ते तोडताना काळजी घ्यावी लागते. कोणतीही चांगली बाब मिळवण्यासाठी त्रास सहन करावाच लागतो. जणू काट्यांची तटबंदीच पार करावी लागते.

पूर्वीच्या काळी मुलींची लग्नं लहानपणीच होत असत. त्यांना नीट समजही आलेली नसे. सासरी मुलींचा छळ करायचा हा जणू अलिखित नियमच होता. (आज परिस्थिती थोडीशी बदलली असली तरी मुलींच्या छळाच्या बातम्या वृत्तपत्रांत येतच असतात.) त्यामुळेच मुलींना माहेरची ओढ लागत असे. सासरी जातानाचा रस्ता त्यामुळेच माहेरवाशिणींच्या पायाला बोचत असे. म्हणूनच तो त्रासदायक वाटतो. उलट माहेरचा रस्ता बोचत नाही, टोचत नाही, मारुततुल्यवेगाने माहेरी पोचवतो. माहेरच्या वाटेवरचे दगडधोंडेही गोंडस दिसू लागतात. रस्ते कापसासारखे मऊशार भासतात. सासरी जाता कुचकुच काटे। माहेरी जाता हरीख (आनंद) वाटे।।

पंढरीच्या विठूमाऊलीला भेटण्यासाठी उन्हातान्हातून जाणारा रस्ताही वारकर्यांना अडचणीचा, थकवणारा वाटत नाही. पांडुरंगाची भेट होणार असल्यामुळे यात्रेतील शारीरिक आणि मानसिक ताण जाणवत नाही. पंढरीच्या वाटे। वाभळीचे काटे। सखा विठ्ठल भेटे। पांडुरंग।।

एखादी व्यक्ती काटेकोर आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच ती व्यक्ती काम अतिशय व्यवस्थित आणि वेळेवर करते. कोर म्हणजे कड. काटा लागणार नाही म्हणजेच काटा आणि कड सांभाळून काम करणं. काटा काढणं. हा बहुधा पायातच रुततो. रुतलेला काटा काढून टाकावा लागतो. तो काढला नाही तर त्याचं कुरूप होतं. काटा खोलवर रुतून बसला की तो काढण्यासाठी तशाच टोकदार वस्तुचा उपयोग करावा लागतो. एक त्रासदायक बाब काढून टाकण्यासाठी तशाच त्रासदायक वस्तुचं किंवा व्यक्तिचं साहाय्य घ्यावं लागतं.

निसर्गातही निवडुंग, बोरी, बाभळी, काटेसावर आणि अन्य वनस्पतींना काटे आहेत. साहजिकच वाङ्मयातही ते उमटतातच. काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी। मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे।। हे जितेंद्र अभिषेकींचं ‘हे बंध रेशमाचे’ या नाटकातील गीत. गीतातूनही काटा आणि फूल ही भिन्न रूपंही टोचण्याचं काम करतात. फूल आपलं नित्यधर्म सोडत नाही पण मनःस्थिती ठीक नसलेल्या व्यक्तिला फुलही काट्यासारखं रुतू लागतं. भा.रा. तांबे त्यांच्या ‘कुणी कोडे माझे उकलील का?’ या कवितेत म्हणतात, ‘काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या उरी कोमल का?’ प्रियकर-प्रेयसीच्या परस्परांत समरस होऊन जाण्यामुळे एकाच्या पायात रुतलेला काटा दुसर्याच्या उरात घुसून तितकीच वेदना निर्माण करतो. प्रीतीचं बंधन असंच विलक्षण असतं. असं हे काटेपुराण सांगावं तितकं थोडंच. पायात रुतलेला काटा असह्य होतोच. भीतीने तर अंगावर काटा उभा राहतो, हा वाक्प्रचार तर नेहमीच वापरला जातो.

पण या काट्यांकडे पाहणारं कवीमन काय म्हणतं ते पहा…

लवलव हिरवी गार पालवी। काट्यांची वर मोहक जाळी।

घमघम करिती लोलक पिवळे। फांदी तर काळोखी काळी।।

झाडावरचे बाभळीचे काटे इंदिरा संतांना मोहक जाळीसारखे दिसतात.

असा हा काटा. वेगवेगळ्या क्रियापदांबरोबर येणारा काटा राग, प्रेम, भीती, जपणूक वगैरे भिन्नभिन्न भाव व्यक्त करत साहित्यात ठाण मांडून बसलेला दिसतो.

 

वासंती फडके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *