दिवसाची सुरुवातच अत्यंत विषण्ण करून सोडणारी ठरली. दिवसाची पहिली केस; एक १३ वर्षांचा मुलगा, अत्यंत आक्रमक आणि विध्वंसक. ‘कंडक्ट डिसॉर्डर’चे पंधरातले दहा निकष जुळताहेत! प्रचंड हिंसाचार, अविचारी-अविवेकी कृत्यं, प्राण्यांबद्दल इतकी अनास्था की त्यांना अमानुषपणे मारणं, स्वतःच्या फायद्यासाठी दुसर्यांना कुठल्याही हद्दीपर्यंत फसवणं ही या आजाराची प्रमुख वैशिष्ट्यं. त्याव्यतिरिक्त विविध हत्यारं वापरणं, जोर-जबरदस्ती करणं, वस्तुंची नासधूस करणं असे अनेक विध्वंसक पैलू ‘कंडक्ट डिसॉर्डर’ला असतात. समोर बसलेला मुलगा अत्यंत हौसेने मांजर-कावळे कसे कापले, कोणत्या माणसाला कसा त्रास दिला हे मला सांगत होता. त्याबद्दल त्याला कसलीही खंत नव्हती. सामाजिकदृष्ट्या हे कसं आणि किती चुकीचं आहे हे समजण्याची त्याची कुवत नव्हती म्हणूया अथवा ते सामाजिक भान, जजमेंट त्याला नव्हतं. तो गेल्यावर चक्क डोकं बाजूला काढून झोपावं असं वाटत होतं. त्याच्या मानसोपचारतज्ज्ञांशी फोनवर औषधांबद्दल बोलले, काही नोट्स काढल्या. पुढे कंडक्ट डिसॉर्डरचं रूपांतर अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसॉर्डरमध्ये होऊ शकतं, असा इशाराही मिळत होता. त्यापुढच्या सार्या दिवसाला एक नकारात्मक किनार चिकटली होती.

विचारचक्र सुरू होतं. ‘मी याला कापला, त्याला चिरला’ असं क्रूरपणे हसत सांगणारा तो तेरा वर्षांचा देह डोळ्यांसमोरून जात नव्हता. इतका कसा काय मेंदूत ‘केमिकल लोचा’ होतो की माणूस त्याचं माणूसपण विसरतो? इतका अघोरीपणा का एका मुलात? वैज्ञानिक, न्युरोलॉजिकल, मानसिक, सामाजिक कारणं माहीत असली तरी ती मला पुरेशी वाटत नव्हती. ‘कारणं’ समोर नसताना डिसॉर्डरचं लेबल लावता येतं, पण स्वतःचा दर्जा, स्वतःची जात, स्वतःचं लिंग, स्वतःचा वर्ण, स्वतःचा धर्म अशी कारणं जेव्हा या अत्याचार-हिंसाचाराच्यामागे असतात तेव्हा मात्र संस्कृती, परंपरा यांच्यावर अडकलेली विकृतीची जळमटं दिसतात. या क्रूरतेचा संबंध केवळ आजच्या जगाशी आहे का? पूर्वीपेक्षा माणूस अधिक पाशवी विचार करतो का? संख्याशास्त्राप्रमाणे त्याचं उत्तर ‘होय’ असं मिळत असलं तरी त्याचं मूळ हे अनेक वर्षांचं फलित आहे. ही हिंसा म्हणजे एक power struggle आहे. वर्चस्व, भीती, सत्ता स्थापन करण्यासाठीची चढाओढ. पुरोगामी म्हणवणार्या लोकांतही असलेला ‘मनुस्मृती’चा पगडा यातून सहज दिसून येतो. हुंडा-नरबळी-सतीसारख्या अमानुष रूढी जर पूर्वी होत्या आणि त्यांचं पालन राजरोसपणे व्हायचं तर आताचे होणारे महिलाविरोधी निर्घृण अत्याचार, दलितांवर होणारे अघोरी अन्याय हे त्याचंच गडद रूप आहे. ज्या घटनांचं केवळ वर्णन ऐकूनच आपल्या तोंडून ‘इ’त्कार उमटतात, मन ढवळून निघतं, तिथेच दुसरा एखादा माणूस म्हणवून घेणारा गट ते अमानवी कृत्य कोणत्याही टोचणीशिवाय करत असतो.

मला विव्हळणारी ‘निर्भया’ आठवली. शारीरिक प्रेमासारख्या आनंददायक म्हणवल्या जाणार्या क्रियेचं किती विद्रूप रूप! अशाप्रकारचा नीच हिंसाचार करण्याचा विचार कसा केला जातो? इच्छेविरुद्ध जोर जबरदस्तीने केलेला संभोग, त्यानंतर केलेली टोकाची हिंसा करण्यात त्या नराधमांना काहीच वाटलं नाही? नुकतंच झालेलं जवखेडे हत्याकांड! एका माणसाचे निष्ठूरपणे तुकडे कापताना, जिवंत जाळताना मनात काहीच चलबिचल होत नाही? भावना, मानवता, सृजनशीलता, अंतःकरण हे शब्द यांच्या गावीही नसतात का? मग अशा जनावरांना माणूस तरी कसं म्हणावं?

पुरुषीपणाचा अहंकार, धर्म-जातिचे वांझोटे अभिमान किती दिवस हे लोक कुरवाळत बसणार? या बेसवर कसं कोणी उच्च आणि नीच होईल? मी सवर्ण म्हणून जन्माला आले तर त्यात माझा काय मोठेपणा वा मी दलित म्हणून जन्माला आले तर त्यात कसला कमीपणा? मुळात अजूनही आपण वर्ण-जातभेद मानण्याइतके मागास का राहिलो? स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षं झाली तरी लग्न करताना पहिली जात का पाहिली जाते? एखाद्याच्या पात्रतेपेक्षा तो/ती अमुक जातिची आहे म्हणून सवलत का? स्त्री म्हणून मला ३३ टक्के आरक्षणासाठी वाट पहावी लागते, हा माझा गौरव आहे की अपमान? जातिभेदाच्या द्वेषाच्या आगीत खैरलांजी, जवखेडेसारखी गावं का जळत राहतात? यांची उत्तरं त्याभोवती घुटमळणार्या सोयीच्या राजकारणात आहेत!

त्याशिवाय सामाजिक मानसशास्त्रातली ‘इनग्रूप’ आणि ‘आऊटग्रूप’ची संज्ञा इथे खूप महत्त्वाची ठरते. ‘तो त्या जातितल्या लोकांचा प्रश्न आहे!’ किंवा ‘यात त्या बाईचीच चूक असणार!’ असली विधानं करताना ‘आपण त्या ठिकाणी जर असतो तर?’ हा महत्त्वाचा विचार करण्याची सृजनशीलता आपण कसे हरवून बसतो? निसर्गाने संवेदनशील होण्याची खूप मोठी आणि वेगळीच क्षमता माणसाला बहाल केली आहे. त्याचा वापर मर्यादित माणसंच करतात याचं वाईट वाटतं. सहन करणारी व्यक्ती काय मानसिक स्थितीत असेल, काय विचार करत असेल इतका साधा विचारही जर करता नसेल तर ते कसलं ‘माणूसपण?’ दुसर्याच्या त्रासात सुख मानणारी माणसं काय किंवा दुसर्याच्या दुःखाने काहीही फरक न पडणारी माणसं काय. त्यांना विकृतच (sadist) म्हटलं पाहिजे!

आज आलेल्या मुलाचा मानसिक आजार कदाचित बरा होईल किंवा कदाचित ती वैशिष्ट्यं कायमस्वरूपी तशीच राहतील. पण कोणताही मेंदूतला ‘केमिकल लोचा’ नसताना फक्त सामाजिक कीड लागलेला हा दुर्दैवी आजार कसा कमी होईल याचा सारासार विचार होणं महत्त्वाचं आहे. पहाटवारा अद्यापही योग्य दिशेने वाहत नाहीये, याचाच जीवाला घोर लागलाय!

प्रज्ञा माने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *