भारत देवगावकर यांची ‘गारपीट’ ही दीर्घ कविता आयडिया प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलीय. ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी या दीर्घ कवितेला लिहिलेली ही प्रस्तावना… 

भारतात, महाराष्ट्रात दुष्काळ नवा नाही हे खरं असलं, तरी त्या त्या काळात समाजाने एकसंध उभं राहून माणसाने खेडी-शहरं यांना कवटाळून भक्कम आधार दिला. संसार पुन्हा उभा राहिला. शेतकरी समाजाने अपार कष्ट सोसून सकलांच्या अन्नाचा घास निर्माण केला. देश जगवला. स्वातंत्र्योत्तर काळात- खेडी, शेतीवाडी, पाणी, कर्ज इत्यादीसाठी शासनाने काम केलं नाही असं नाही, पुष्कळ केलं, पण दीर्घकालीन विचार म्हणजे तत्काळ व्हावं अशी धडपड, त्यासाठीचं जगभरचं तंत्रज्ञान-शास्त्र आणि ही सेवा आहे आणि आपलं कर्तव्यच आहे ही आपलेपणाची भावना घेऊन राज्यातले म्होरके कमी पडले. आपल्या सावलीपुरतंच आकाश पाहणारे अलीकडे तर खूप वाढले आणि स्वाहाकार, भ्रष्टाचार यात अवघा समाज भरडून निघाला. त्यात अडाणी, सोशिक, खेड्यातल्या माणसांना सर्वाधिक झळ पोहचली. त्यांनीच राज्य उभं केलं, परंतु वारंवार येणारे दुष्काळ-अपूर्ण पाणी योजना, गगनाला भिडलेला शेती उत्पादनाचा खर्च, शेतीमालाचे नाममात्र भाव आणि वाढलेला कुटुंब-परिवार या चक्रव्युहामध्ये तो आहे.

कोरडीचे दुष्काळ किती आले आणि खेडी, शेती, समाज उद्ध्वस्त झाला. त्याचा इतिहास, बारीकसारीक नोंदी, तपशील आहे. तो मी अनेकदा चाळतो. विचार करतो. भारत देवगावकर यांनी ‘गारपीट’ या दीर्घ कवितेत गारपिटीमुळे संपूर्ण वाताहत झाल्याचं एक वास्तव चित्रण उभं केलं. असं लिखाण क्वचित कुठे आहे आणि गारपिटीइतकं अंगावर येणारं-भयभीत करणारं फार कधी नव्हतं. मराठवाडा-खेडी-समाज विशेषतः दुर्बल समाज डोळ्यांदेखत या महिना-दोन महिन्यांच्या राक्षसी आक्रमणाने ओस केला. पश्चिम महाराष्ट्रातही आठ-दहा जिल्हे यात संपूर्ण भरडले गेले. पत्रकारितेत असल्याने आणि दुःखाशी नातं असल्याने त्यांना हे क्रमशः, इतिहासाच्या साक्षीने नावानिशी लिहावं वाटलं. ही दीर्घ कविता त्यांच्या अंतःकरणाची एक प्रतीति आहे. तराजू काट्याने या कवितेचं मूल्य ठरवायचं नाही. या संकटातल्या विस्तीर्ण जीवनाचं चित्र मोकळं करणं हे त्यांचं आत्मिक समाधान आहे आणि एअरकंडिशन-हवाईजहाजी नेते विशेषतः या ऐननिवडणुकीच्या काळात कसं वागतात-बोलतात आणि मुखवटे पांघरून करुणा दाखवतात याचं सोंग त्यांना अस्वस्थ करतं. म्हणून हे लिहिलंय. पुढारी पक्ष, यापेक्षाही ज्यांच्या हाती हे मुख्यतः आहे विशेषतः गावापासून-दिल्ली-मुंबईपर्यंतचे सार्वभौम अधिकारी. नियम अटी-इंग्रजांच्या वेळचे कायदे आणि थंडपणाने निर्णय घेत मेल्यावर औषध घेऊन येणारे हे लोक. भारतने फार रागाने नाही, पण हळूवार त्यांचीही बथ्थड चांगली दाखवली.

२०१२-१३ या वर्षात प्रचंड मोठा पाऊस पाण्याशिवायचा दुष्काळ. होतं नव्हतं ते नष्ट झालं. पुन्हा उभं राहणं कठीण-गेल्यावर्षी नको तेवढा चांगला पाऊस झाला. चार-पाच महिने. बँकांची कर्जं, पतसंस्था, आणखी खूपच थकलेलं कर्ज. चांगला पाऊस, विहिरी भरलेल्या, तलाव धरणं भरलेली, नदीनाले वाहते, थोडीफार शेती विकून-गहाण ठेवून-खाजगी मोठ्या व्याजाचं कर्ज काढून महाराष्ट्रभर रात्रंदिवस कष्ट करून शेतकरी, शेतमजूर ठाम उभा राहिला. भरमसाठ किमतीचं बियाणं-खतं-औषधी ठिबक इत्यादी. यंत्र, नष्ट झालेल्या फळबागा वाटेल त्या किमतीने पुन्हा उभ्या केल्या. दुःख गाडून असा उभा ठाकणारा हा फक्त बळीवंत शेतकरी समाजच आहे आणि मार्च-एप्रिलला रब्बीचं भरघोस आलेलं पीक फक्त घरात घ्यायचा अपरिमित आनंद-त्याचवेळी विक्राळ अवकाळी गारपीट. संपूर्ण नेस्तनाबूत करून टाकणारी-उघड्या डोळ्यांनी पाहावत नव्हती. इतका निसर्गाचा असा कोप मी कधीच पाहिला नाही. तोंडी आलेला घास मातीत फेकला गेला. निवडणुका त्याच काळात. सगळा हैदोस. ‘बोलाचीच कढी बोलाचाच भात’ असं भारतने कवितेत लिहिलं. लालफितीतून- नियमावलीतून लवकर न मिळणारा आणि

दोन हेक्टरने काय होणार? ज्यांना माहीत आहे-शेती संसार-देशाचा संसार उभा करायला मी कुठून कुठून पैसा आणला. प्रत्येक आपत्तीला सामोरा गेलो. आयुष्य वेचलं-आता हद्द झाली. अगदीच अशक्य आहे. अशा भावनाशील शेतकर्यांनी आत्महत्या केली. कुणाला संसार नको आहे, पण कोणीही आता मदत करणार नाही. आपल्याला नागवं करेल या गुंतागुंतीच्या कोलाहलात आत्महत्या खूप झाल्या; पण आत्महत्या न केलेले, जगणारा शेतीत नांगर-तिफण चालवणारा शेतकरी हासुद्धा मरणाच्या दारातच आहे आणि तसाच विच्छिन्न होऊन जगतो आहे. या ‘गारपीट’ काळात आणि त्या आधीच्या दुष्काळी वर्षात सगळ्याच वृत्तपत्रांनी-वृत्तवाहिन्यांनी त्यात सहभागी होऊन चिंतन करून विचारवंतानी आणि प्रत्यक्ष त्यात काम करताहेत त्यांनी भक्कम दीर्घकालीन उपाययोजना सांगितल्या. खूप चांगलं असं पुस्तकातही लिहून ठेवलं. मात्र हे वाचतं कोण? आणि ते वर्ष संपलं तर त्याची आठवणही राज्यकर्त्यांना नसते. अत्यंत अभ्यासपूर्ण यात काम केलेल्या

कृषितज्ज्ञांना-विचारवंतांना-सेवाभावी संस्थांना घेऊन शासनाने पुन्हापुन्हा त्यांच्या भौतिक गरजा आणि अर्थव्यवस्थेचं गांभीर्यानं प्रारूप-कायदे, नियम इत्यादी. प्रत्यक्षात आणावे लागतील. तात्पुरत्या मलमपट्टीने काहीच होणार नाही. फक्त आमदार-खासदार मंत्री यांनाच ते कळणं आणि त्यांचाच अधिकार आहे, अशा वेड्या समजुतीने आणि अहंकाराने आपण तिथेच आहोत.

भारत देवगावकर हे एक पत्रकार, नवे कवी परंतु या दुःखाशी नाळ, गुंतागुंत त्यांच्या आयुष्यात बांधलेली आहे. उघड्या डोळ्यांनी पाहतोय ते मला जमेल तेवढं साधेपणाने मी हे लिहितोय हीच त्यांची भावना आहे. वाचन न करणार्या

राज्यकर्त्यांसाठी याचा काय उपयोग? म्हणून लिहिणं, मोकळं होणं संवेदनशील माणूस थांबवत नाही. या भयानक-शेतकरी जीवनाचा-खेड्यांचा विस्कोट करणार्या ‘गारपीट’ या दीर्घ कवितेत त्याचा एक लहानसा इतिहास दस्तावेज-नोंदी तर झाल्या. कधीकाळी याही नोंदी शोधाव्या लागतात. या निमित्ताने भारत देवगावकर यांचं मनःपूर्वक अभिनंदन! कविता लिहा-वेगवेगळ्या राजकारण, समाजकारण आणि सामान्य माणसांच्या-शहरातल्या, खेड्यातल्या-दुःखाचे आणि सुखाचे असले तर तेही आनंदाने लिहा. एवढंच.

ना.धों. महानोर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *