प्रा. पुष्पा भावे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवार ११ ऑक्टोबर रोजी साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने एका विशेष कार्यकमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी ३ ते ९ वाजेपर्यंत हा कार्यकम प्रभादेवीच्या पु.ल. देशपांडे अकादमी मध्ये होणार आहे. या निमित्ताने हा लेख…

२६ जून १९७५. सकाळी सहा वाजता आकाशवाणीवर इंदिरा गांधींचे शब्द आले. द प्रेसिडेंट हॅज डिक्लेअर्ड इमर्जन्सी. बट देअर इज नथिंग टू पॅनिक…

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची लोकसभेवरील निवडणूक अलाहबाद उच्च न्यायालयाने १२ जून १९७५ला अवैध ठरवली होती. म्हणून त्यांनी त्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली होती. मेसचं बिल वाढलं वगैरे कारणांनी गुजरातेत सुरू झालेलं विद्यार्थ्यांचं भ्रष्टाचारविरोधी नवनिर्माण आंदोलन देशभर पसरलं होतं. ‘कैसे बैठू किनारेपर, जब लहरों का निमंत्रण’ असं म्हणून जयप्रकाश नारायण यांनी बिहारमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व स्वीकारलं होतं. गुजरात विधानसभा कालावधी संपण्यापूर्वीच जनमताच्या रेट्यामुळे विसर्जित करावी लागली. बिहारमध्येही तशी मागणी जोर पकडू लागली. ती नाही मान्य करायची असं इंदिराजींनी वेळोवेळी जाहीर केलं होतं. तर ‘भ्रष्टाचाराची गंगोत्री दिल्लीतच आहे.’ असं म्हणून जेपींनी सरळ राजधानीवरच शरसंधान सुरू केलं होतं. इंदिराजींची निवडणूक अवैध ठरल्याने त्यांनी राजीनामा द्यावा असं मत जेपींनीही व्यक्त केल्याने चळवळीला जोर चढला. पण कुठल्याही परिस्थितीत सत्ता सोडायची नाही असं इंदिराजींनी ठरवलं होतं. २५ जूनच्या अंतर्गत आणीबाणी घोषणेची ती पार्श्वभूमी होती. केंद्र सरकारच्या विरोधात चळवळ करणार्या विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्या-कार्यकर्त्यांची अर्ध्या रात्री धरपकड करण्यात आली. त्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचू नयेत. म्हणून २५ जूनला रात्री बारा वाजता वर्तमानपत्रांवर सेन्सॉरशिप लादण्यात आली. त्या हुकूमशाही राजवटीविरुद्ध लोकसंघर्ष सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. काही नेते पोलिसांच्या हाती सापडू नये अशी खबरदारी घेऊन भूमिगत आंदोलन चालवत होते. मुंबईत महागाईविरोधात मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर यांचा लाटणं मोर्चा ऐनभरात आला होता. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक, पत्रकार आदींनी त्याला पाठिंबा दिला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य या लोकशाहीच्या मूलतत्त्वांवर घाला पडल्याने प्रत्यक्ष पक्षीय राजकारणात नसलेली मंडळीदेखील बेचैन झाली होती. दुर्गाताई भागवत यांनी विद्रोही सूर टिपेत लावला होता. मृणालताई भूमिगत झाल्या होत्या. रोज त्यांचा फोटो वर्तमानपत्रात येत असल्याने आणि त्यांची उंच अंगकाठी लपवणं अवघड असल्याने त्यांचं वेषांतर कसं बेमालूम घडवायचं यात नाट्यक्षेत्राशी घनिष्ट संबंध असलेल्या पुष्पाताई भावेंनी पुढाकार घेतला. कपडे बदलणं अवघड नव्हतं. पण चेहरा…? त्यासाठी केसांचा टोप बनवून घेण्याचं काम पुष्पाताईंनी केलं. मुंबईत त्यांना अगदी वेगळ्या प्रकारच्या कुटुंबात दोन-तीन दिवस वास्तव्यासाठी ठेवायचं. महत्त्वाच्या व्यक्ती-कार्यकर्त्यांच्या त्यांच्याशी भेटीही घडवायच्या. पण गुप्तपणे यासाठी राबणार्या चमूत पुष्पाताईही सहभागी झाल्या. पाच-सहा महिने ती जबाबदारी समर्थपणे पार पाडली. पोलिसांना आपल्यापर्यंत पोहोचता येऊ नये अशी सगळी खबरदारी घेत.

माझा पुष्पाताईंशी परिचय त्या ओघात झाला. मलाही लपूनछपून काम करावं लागायचं. अनेक गुप्त पत्रकांचे मसुदे छापणार्यांपर्यंत पोहोचवणं आणि छापलेले गठ्ठे महाराष्ट्रभर-देशभर पाठवणं या कामी त्यांची मोठी मदत व्हायची. आणीबाणीने अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेप केली. त्याविरुद्ध मान्यवर साहित्यिकांनीही काही केलं पाहिजे यासाठी पुष्पाताई प्रयत्नशील असायच्या. रुईया कॉलेजात मराठीच्या प्राध्यपिका असल्याने त्यांचा विद्यार्थ्यांशी संपर्क होताच. पार्ल्याच्या कॉलेजकट्ट्याशी निरोपानिरोपी चालायची. अँटिगनी हे दडपशाहीविरोधाचं नाटक सादर व्हावं, त्यात डॉ. श्रीराम लागूंनीही भूमिका करावी, असे अनेक उपक्रम चालले. महेश एलकुंचवार या थोर नाटककाराचा मुक्काम पुष्पाताईंकडे असायचा. नाटक, एकूण साहित्यक्षेत्र आणि राजकारण यावर अनेक मैफली रंगायच्या. मार्च १९७७मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. आणीबाणीविरुद्धचा लोकक्षोभ मतपेटीतून प्रकट झाला. समाजवादी, जनसंघ संघटना, काँग्रेस आणि चरणसिंह यांचा भारतीय क्रांतिदल यांचं विलिनीकरण होऊन जनता पार्टी अस्तित्वात आली. केंद्रात सत्तारूढही झाली. पार्टी कशी चालवायची, उभी करायची ही मोठी अवघड कसरत होती. मुंबई शहर पार्टीची जबाबदारी पुष्पाताईंवर सोपवावी असं आम्ही ठरवलं. महाराष्ट्रात सोशालिस्ट, जनसंघ आणि काँग्रेसमधून आलेले, असे तीन प्रवाह होते. सतत गटबाजीच्या कारवाया चालायच्या. संघवाले सुसंघटित होते. आमच्याबरोबर आलेले अनेक तरुण कार्यकर्ते, साहित्यिक, पत्रकार हे पक्षांतर्गत ओढाताणी आणि कटकटींना कंटाळले. पुष्पाताईंनी मला पत्र लिहिलं, ‘आणीबाणीविरुद्धचा लढा वेगळा. लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी असल्याने मी त्यात सामील झाले. पक्षकारण करणं हा माझा पिंड नव्हे. जेणू काम तेणू थाय’. त्यांनी पक्षसंघटनेतील पद सोडलं. आमची मोठी अडचण झाली तरी पुष्पाताईंचा निर्णय योग्य आहे असंच मी मानलं.

स्वतःची सहजप्रवृत्ती आणि मृणालताईंचा प्रभाव यामुळे विविध सामाजिक चळवळींमध्ये पुष्पाताई सतत क्रियाशील राहिल्या. सामाजिक कृतज्ञतानिधी या संघटनेच्या उभारणीत आणि संचालनात त्यांचा मोठा वाटा आहे. ठिकठिकाणी काम करणार्या परिवर्तनावादी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी गडचिरोलीतील लेखा-मेंढा, मराठवाड्यातील निलोती अशा आडगावीही त्या जात राहिल्या. आता त्यांनी सा. कृ. निच्या अध्यक्षपदाची धुरा उचलली आहे. गोरेगावातील केशव गोरे ट्रस्टच्या वतीने चालवले जाणारे अनेकविध उपक्रम, विशेषतः डॉ. य. दि. फडके संशोधन केंद्र, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अनुवाद सुविधा केंद्र यातही त्यांचा सहभाग आहे. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी एकटीने लढायची त्यांची जिद्द १९९६मध्ये घडलेल्या रमेश किणी प्रकरणात दिसून आली. रमेश किणीने भाड्याची जागा सोडावी यासाठी शिवसेनेच्या काही प्रबळ नेत्यांनी त्याच्यावर विलक्षण दडपण आणलं. शेवटी त्याचा त्यात मृत्यू झाला. त्याची बायको सामान्य बाई. त्या अन्यायाला समाजाच्या वेशीवर वाचा फोडावी, न्यायालयातही आवाज उठवावा यासाठी पुष्पाताई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या मूल्यनिष्ठेला, जिद्दीला आणि अथक प्रयत्नांना सलाम.

पन्नालाल सुराणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *