मुंबई लोकल, वीकेण्डला तुडुंब भरलेले मॉल्स किंवा गर्दीच्या ठिकाणी सध्या १०० पैकी किमान दोन-चार जण तरी डोळ्यांवर गॉगल लावलेले दिसतील, ऑक्टोबर हीटमुळे नाही तर Conjunctivitis मुळे!

सध्या Conjunctivitis चं प्रमाण वाढलेलं दिसत आहे… हॉस्पिटलची OPD असो किंवा मित्रांचे फोन्स… डोळे लाल झालेत, डोळे आलेत (?) च्या तक्रारीने मागील १५-२० दिवसांपासून जोर धरला आहे. सुट्टीच्या दिवशी लोअर परेलच्या मॉलमध्ये गेलो होतो, तिथे ट्रायल रूमच्या बाहेर उभ्या असलेल्या सिक्युरिटी गार्डचेही डोळे लाल. डोळ्यांवर गॉगल नव्हता म्हणून पटकन दिसले लाल डोळे. तो बिनधास्तपणे दुखणारे डोळे चोळत होता आणि त्याच हाताने ट्रायलचे कपडे ट्रायल करणार्याला देत होता अथवा पुन्हा हँगरवर लटकवत होता, अर्थातच इन्फेक्शन सुरळीतपणे ट्रान्सफर होत असणार.

ट्रायलच्या रांगेत ताटकळत उभं असताना त्याला सहज विचारलं,

‘भावा, डोळे आलेत सुट्टी नाही घेतली का? त्यात आज दसरा, घरी तेवढाच आराम.’

तो म्हणाला, ‘नाही साहेब, सुट्टी घेतली तर पैसे कट होतात, परवडत नाही!’

डोळे आले म्हणून (?) लहानपणी शाळेला बुट्टी मारावी लागायची, त्यात आपल्यामुळे इतरांना तो आजर होऊ नये हीसुद्धा शिक्षकांची अन् पालकांची भावना.

चूक त्या सिक्युरिटी गार्डची नाहीच, त्याच्या पोटा-पाण्याचा प्रश्न असल्याने बुट्टी मारायची सोयच नाही.

आणि सगळ्यात महत्त्वाचं सुट्टी घेता येत नाही कारण Paid leave किंवा Medical leave हे प्रकार फक्त गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, प्रायव्हेटमध्ये अशा हक्काच्या सुट्ट्या कुठे?

प्रायव्हेटायझेशनमध्ये अशा कोलॅटरल डॅमेजेसकडे कोणी बघणार (!) आहे की नाही? किमान गर्दीच्या ठिकाणावरून आलेल्या इन्फेक्शनमुळे सो कॉल्ड उच्चवर्गीयांचे डोळे लाल झाल्यावर तरी! तेच मॅटर्निटी लीव्हबाबतीत बोलता येईल, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तीन महिन्यांची पेड मॅटर्निटी लीव्ह असते, सोबत आता पुरुषांनासुद्धा १५ दिवस पेड लीव्ह मिळते… अशा तरतुदी प्रायव्हेटमध्ये शक्यच नाहीत, त्यासोबतच कामाचे वाढते तास, त्यामागे मिळणारा तुटपुंजा पगार, कॉस्ट कटिंगमुळे मिळणार्या सुमार सुविधा, रिसेशनमध्ये नोकरी जाईल का याची भीती… या अन् अशा अनेक कारणांमुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणार्या कर्मचार्यांमध्ये तणाव आणि मानसिक आजारांचं प्रमाण वाढलं तर नवल वाटायला नको.

चकचकीत इंडस्ट्रीज्, SEZ अन् आता बाहेरील देश आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट करणार, ते खरंच आपला विचार करतील का? इथल्या स्थानिक मध्यमवर्गीय चाकरमान्यांना बाहेरून येणार्या कंपनीज् न्याय देतील का? बाहेरच्या देशांतून येणार्या इंडस्ट्रीज् आपल्या देशात स्वतःचा फायदा करण्यासाठी येतात, त्यांच्याकडून इथल्या कष्टकरी जनतेने हे आपला विकास करतील अशी अपेक्षा ठेवणं तरी योग्य होईल का? की फक्त ‘अच्छे दिन अच्छे दिन’ म्हणत स्वतःला अन् स्वतःच्या आरोग्याला इग्नोर करायचं?

Conjunctivitis चे प्रकार ः

मुख्यत्वे याचे तीन प्रकार पडतात

१. बॅक्टेरिअल

२. व्हायरल

३. अॅलर्जिक

Conjunctivitis होण्याची कारणं ः

आजारी व्यक्तिसोबत संपर्क ः जसं की आजारी व्यक्तिने वापरलेल्या टॉवेल्स, कपडे, ब्लँकेट, इत्यादी वस्तुंशी संपर्क

– हवेमार्फत किंवा पाण्यामार्फत

इन्फेक्शनचा प्रादुर्भाव होण्याची कारणं

– अस्वच्छता

– उष्ण वातावरण

Conjunctivitisची लक्षणं

– डोळे लाल होणं

– डोळ्याची जळजळ

– डोळ्यामध्ये कचरा गेल्यासारखी जाणीव

– उजेडाकडे पाहताना त्रास होणं

– डोळ्यांतून पाणी आणि घूम निघणं

– रात्री झोपताना पापण्या एकमेकांना चिकटणं

– डोळ्यांतील घूममुळे धूसर दिसणं

– क्वचित डोळ्यांसमोर रंगीत छटा दिसणं

ट्रीटमेंट ः

– डॉक्टरकडे त्वरित जाऊन संबंधित आयड्रॉप आणि औषधं घेणं

आधी घ्यायची काळजीः

– स्वच्छ पाणी आणि साबणाने हात धुवावेत

– सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेले हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करता येऊ शकतो

– आजारी व्यक्तिने वापरलेले टॉवेल्स, हातरुमाल, ब्लँकेट्स, चादरी, उशीच्या खोळी न वापरणं, त्या वस्तू पुन्हा वापरताना गरम पाण्यामध्ये धुवून वापरणं

– तसंच आजारी व्यक्तिने वापरलेली डोळ्यांची सौंदर्यप्रसाधनं न वापरणं

– साथीच्या ठिकाणच्या स्विमिंग पूलचा वापर टाळणं

आजरपणात घ्यायची काळजीः

– डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषधं

– डोळे स्वच्छ पाण्याने धुणं

– डोळे न चोळणं

– गॉगलचा वापर करणं

– आयड्रॉपचा वापर केल्यानंतर हात स्वच्छ धुणं

– एक डोळा आला असल्यास त्याच्या संपर्कात येणार्या वस्तुंचा स्पर्श दुसर्या डोळ्याला होणार नाही याची काळजी घेणं

Conjunctivitis या आजाराचं प्रमाण तो झाल्यानंतर दोन ते तीन दिवस जास्त असतं. त्यानंतर साधारणतः हा सात ते आठ दिवसात कमी होतो.

स्वच्छता आणि योग्य काळजी आजाराला दूर ठेवू शकते.

स्वतःकडे लक्ष द्या, आरोग्याकडे लक्ष द्या, मजेत जगा, आनंदी राहा.

आरोग्य परमा लाभा!

डॉ. रेवत कनिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *