स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने पुरेशी मानवनिर्मित संकटं पाहिली आहेत. पहिली फाळणी, मग चीनची चढाई नंतर मुंबई आणि दिल्लीवर अतिरेकी हल्ले. परंतु आता आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या धोक्यापुढे ही संकटं फिकी वाटतात. हा धोका आहे स्वतःला कट्टर देशभक्त म्हणवणार्या देशांतर्गत ताकदींकडून.

स्वतःला हिंदुत्वाचा आणि हिंदू संस्कृतीचा तारणहार समजणार्या दिनानाथ बात्रा यांच्याबद्दल मी बोलतो आहे. ८५ वर्षीय बात्रा हे ‘शिक्षा बचाओ आंदोलन समिती’चे संस्थापक आहेत. ते एका शाळेचे मुख्याध्यापक होते. या उत्साही लढवय्याच्या नावावर बर्याच यशस्वी मोहिमा आहेत. पेंग्विनच्या Wendy Doniger लिखित The Hindus : An Alternative History या पुस्तकाचा लगदा करायला लावण्याचं श्रेय यांचंच! Aleph या लेखिकेने On Hinduism हा आपला प्रबंध त्यामुळे अर्ध्यातच सोडला. बात्रा यांच्या धमक्यांमुळेच ओरिएंट ब्लॅक स्वॉन प्रकाशनाला मेघ कुमार यांच्या Communalism And Sexual Violence Ahmedabad Since 1969 या पुस्तकाचा संपूर्ण पुनःआलेख घेणं भाग पडलं.

आता तर बात्रा यांनी सर्वात मोठा विजय मिळवला आहे. गुजरातच्या शालेय पाठ्यपुस्तक मंडळाने त्यांच्या नऊ पुस्तकांना नुकतीच मान्यता दिली आहे. पुन्हा अंधयुगात प्रवेश करण्याचा निर्णय आता आपण स्वेच्छेने घेतला आहे. उजेड, प्रयोगासिद्ध ज्ञानाचा लखलखाट, इतिहास, भूगोल, शास्त्रीय अनुमानं आणि तंत्रज्ञान या सर्वांवर आपण आता प्रत्यक्ष बहिष्कार जाहीर केला आहे.

अज्ञान आणि अंधश्रद्धा या मानवजातिच्या सर्वात महाभयंकर शत्रुंच्या विरोधात आपल्याला कबीर, लल्ला, बसवण्णा, ज्ञानेश्वर अशा महानसंतांनी आणि वैदिक काळापासूनच्या कित्येकांनी सावध केलं आहे. स्वतःला तारणहार म्हणणारे हे लोक खरं तर कृतक तारणहार आहेत. आम्ही आपल्या प्राचीन ग्रंथांचा आदर करत आहोत असा दावा ते करतात. परंतु प्रत्यक्षात ते आपल्या प्राचीन ठेव्यावर घोर अन्याय करत आहेत. आपलं तत्त्वज्ञान सांगणारी उपनिषदं वा तत्सम टीका ग्रंथातून, पाणीनीच्या व्याकरणातून, वात्सायनाच्या कामसूत्रातून, आयुर्वेदावरील ग्रंथातून आणि आपल्या अजोड, कल्पक संस्कृत साहित्यातून ओसंडून वाहणारी अद्वितीय वैचारिक पारदर्शकता, निरीक्षणक्षमता आणि व्यवच्छेदकता यांचा हा घोर उपमर्द आहे. या थोर परंपरेला समांतर अशी भेदभाव, जादूटोणा, भोंदू बाबा-बुवा आणि कुडमुड्या वैदूंची परंपरा पण इथे होती. आपण जातिव्यवस्थेला जन्म दिला, जी आजपर्यंत आपल्या देशाला ग्रासत आहे हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

भारतीय विज्ञान, इतिहास आणि संस्कृतीचं बात्रा यांचं आकलन नेहमीच्या परिचयाचं आहे. जगातलं पहिलं विमान भारतात उडालं असं रामायणात लिहिलं आहे. रामाच्या त्या विमानाचं नाव पुष्पक होतं. भारतातील साधुंनी हजारो वर्षांपूर्वी लावलेले तंत्रज्ञानाचे शोध आणि शास्त्रीय संशोधन पाश्चात्यांनी चक्क चोरलं. Stem cell संबंधी संशोधनाचा उल्लेख सर्व प्रथम महाभारतात आढळतो. गाईची सेवा केल्याने संतान प्राप्ती होते. भारताच्या नकाशाचं पुनर्रेखाटन करून त्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, बांग्लादेश, तिबेट, म्यानमार आणि श्रीलंका यांचा समावेश केला पाहिजे. अशी बरीच विधानं त्या आकलनात मोडतात.

सुदैवाने भारतातील बर्याच इतिहासकारांनी, विचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी या असत्य विधानाचा तीव्र निषेध केला आहे. परंतु खूप अस्वस्थ करणारी बाब ही आहे की, गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधानपदावर असलेल्या नरेंद्र मोदींनी या बात्रांच्या पुस्तकांची भलामण केली आहे. तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंग, नव्या दमाचे एम. जे. अकबर प्रभृती याबद्दल एक अवाक्षरही काढत नाहीत. आणीबाणीत शूरपणा दाखवणारे आणि सतत आवाज काढणारे अरूण शौरीही गप्प कसे? ही अत्यंत काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. वेगवेगळ्या रूपामध्ये सेन्सॉरशिप कार्यरत असल्याची ही लक्षणं आहेत. एखाद्याला वगळणं त्याचा अनुल्लेख करणं हा पण सेन्सॉरशिपचाच एक प्रकार आहे. तसंच एखादा केवळ आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. म्हणून त्याची एखाद्या पदावर नेमणूक करणं ही एक प्रकारची वशिलेबाजीच म्हणावी लागेल. सत्तेवर येऊन अवघे दोन महिने होत नाही तोच निष्णात निवडसमितीने केलेली गोपाल सुब्रमण्यम्सारख्या एका आदरणीय सुप्रीम कोर्टच्या न्यायाध्याधीशाची नेमणूक केंद्र सरकार रद्द करू पहात आहे. सध्याच्या सरकारला लोकसभेत काय किंवा न्यायालयात काय त्यांचीच री ओढणारे प्रतिध्वनी उमटायला हवे आहेत.

गुजरातमध्ये तसंच अन्यत्र देशभर आपणा सर्वांचा शिक्षणाच्या सर्वंकष भलेपणावर भरवसा आहे. जीवनाचा दर्जा उंचावणारं आणि आपल्याला रोजीरोटी देणारं शिक्षणच आहे, असं आपण सर्व मानतो. ही दुःखाची बाब आहे की बात्रांचं हे तत्त्वज्ञान मोदी सरकारच्याच विकास कार्यक्रमाला खो घालतं. सत्य, प्रामाणिकपणा आणि नैतिकता हा कुठल्याही शिक्षणाचा पाया असतो. मग ते शिक्षण अर्थशास्त्राचं असो वा इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान आदी विषयांचं असो. देशापुढील प्रश्न फार मोठे आहेत. वानगीदाखल तीन-चार प्रश्नांचा उल्लेख करतो. एक आहे गरीब कुटुंबातील लहान मुलांचं कुपोषण. ज्याचं वर्णन युनायटेड नेशन्सच्या कमिटीने ‘जणू सामूहिक हत्याकांड’ असं केलं आहे. क्षयग्रस्तांचा मोठा प्रश्न आहे. लाखो तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. सव्वाशे कोटी लोकांचं पोट भरण्यासाठी आपल्याला दुसर्या अधिक उत्पादक हरितक्रांतिची गरज आहे.

तुम्हाला जर उत्तमोत्तम शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ निर्माण करायचे असतील आणि त्यांच्याकडून नवनवीन कल्पक उपायांची अपेक्षा असेल तर त्यांना धादांत असत्य आणि कपोलकल्पित गोष्टींचा खुराक देऊन चालणार नाही. खोटा इतिहास शिकण्याचा विज्ञानावर काय परिणाम होतो? तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाची पार्श्वभूमी आणि त्यावर आजवर झालेल्या संशोधनाची माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या कामाची सुरुवात कुठून करणार? त्याहूनही गंभीर अशी आणखी एक बाब आहे. या सरकारची विकासाची कल्पना दोन गृहीत तत्त्वांवर आधारित आहे. अनिर्बंध, मोकाट, खुली बाजारनीती हा त्यांचा आदर्श आहे. त्यांना अणुशक्तिविरोधी चळवळ अथवा हरितशांती (Greenpeace) चळवळ दाबून टाकायच्या आहेत. ‘एक तर तुम्ही आमच्याबरोबर आहात अन्यथा तुम्ही आमच्या विरोधात आहात’ जॉर्ज बुश यांचा हा मार्ग आपण अनुसरत आहोत म्हणून बुशसाहेब खूश असतील. दुसरी खंत ही की, संपूर्ण मानवजातिला भेडसावणार्या ‘हवामान बदलाच्या’ प्रश्नाकडे याक्षणी आपण कटाक्षाने दुर्लक्ष करत आहोत. आता आशा करूया की लवकरात लवकर आपण या प्रश्नाविषयी जागरुक होऊन त्यावर काम सुरू करू.

केवळ संशोधन नव्हे तर नवनवं तंत्रज्ञान वापरात आणून आपल्या प्रश्नांची उकल करण्याची आज भारताला गरज आहे. जसे की कमी खर्चिक आणि अपव्यय टाळणार्या पर्यायी उर्जास्रोतांचा शोध आणि वापर. सर्वप्रथम सूक्ष्म अन्वेषण इथे महत्त्वपूर्ण आहे. कार्बन ट्रेडिंगसारखे फसवे तोडगे, नेहमीच्या गावगप्पा आणि बात्रा यांच्या आदर्शाचं पालन यांच्या मागे लागलो तर नक्कीच या उपखंडाचे मोठाले भाग पाण्याखाली जातील, तर इतर भाग भीषण दुष्काळाने त्रस्त होतील. विकसित देशांवर विसंबून राहण्यात काही तथ्य नाही.

आपण या आव्हानांना पुरे पडणार का? बात्रांच्या भंकसवर पोसलेल्या पिढ्या हे आव्हान स्वीकारू शकणार नाहीत.

(स्वैरानुवाद ः प्रभा पुरोहित)

सौजन्य ः हिंदुस्थान टाइम्स

किरण नगरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *