१०.

ऐन तारुण्यात माणसाला आपल्या वयाची फारशी फिकीर नसते, काळजी नसते. आपण जणू कायम याच वयात राहणार असल्याची हमी त्या वयाला असल्यागत त्यावेळी माणसाची सर्व वर्तणूक असते. मृत्यूचा तर विचार तारुण्याला सहसा शिवतही नाही. (शिवला तर ती तरुण व्यक्ती पुढच्या काळात कुणी तरी थोर लेखक, विचारवंत, संत, महात्मा वगैरे होते.) उलट आपण खूप म्हणजे खूपच जगणार आहोत, असं काही तरी वाटण्याचाच तो काळ असतो. पण पस्तिशीचा काळ येतो आणि आपल्यातून तारुण्य निसटतंय याची जाणीव व्हायला लागते. आपल्याला एक वय असतं ही गोष्ट माणसाला पस्तिशीत कळते. (या काळात माणसं आपलं वय मोजायला प्रारंभ करतात आणि त्याबद्दल स्वतःशी गंभीर व्हायला सुरुवात करतात आणि इतरांना एकदोन वर्षांनी – बर्याचदा नाजूक ठिकाणी – वय कमी सांगायलाही सुरुवात करतात.) आणि तिथंच माणसाचा स्वतःबद्दल गोंधळ सुरू होतो. आयुष्य ही निसटणारी, कधी तरी संपणारी गोष्ट आहे याची पहिलीवहिली दखल पस्तीस ते चाळीसचं वय घेतं. त्यातच मृत्यूची सुप्त जाणीव असते आणि आयुष्य आताच हातात पकडून ठेवलं पाहिजे, आपण अजूनही आयुष्य हातात पकडून ठेवू शकतो, पण आयुष्य हातात पकडून ठेवण्याची ही शेवटचीच संधी आहे, असं वाटण्याचा तो काळ असतो. म्हणूनच पस्तीसच्या पुढची माणसं (यांना प्रौढ या शब्दात बसवलं जातं.) त्या वयात तरुणांसारखं जगण्यावागण्याचा प्रयत्न करतात. तरुणांसारखे चाळे करू पाहतात. पोषाख, बोलणंवागणं, करमणुकी यांत तारुण्य आणण्याचा प्रयत्न करतात.

आपलं तारुण्य निसटतंय, आपलं मागचं जगणं संपलं याची जाणीव आणखीही दोन कारणांनी होते. एक तर माणसाच्या स्वतःच्या आईवडिलांमुळे आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या मुलांमुळे. ‘मोठं होणं’ हा एक माणसाचा गुणधर्म असतो न् त्या मोठं होण्याचे वेगवेगळे खेळ माणसाच्या आयुष्यात सतत चालू असतात. वयाच्या पंधराव्या वर्षाच्या आसपास माणसाला लैंगिक जाणिवा व्हायला लागतात, तेव्हा आपण लैंगिकदृष्ट्या भरभर मोठं व्हावं असं वाटत असतं. त्याला त्या अर्थाने मोठं होण्याची घाई होते. आपल्याला त्याबाबतीत मोठ्या माणसांसारखं वागता यायला हवं अशी इच्छा असते. विशीच्या वेळेस माणसाला लैंगिकदृष्ट्या मोठे झालोय असं स्पष्टपणे वाटतं.

विशीत पालकांकडूनही माणसाला तू आता मोठा झालास असा पहिला झटका दिला जातो. पण तो लैंगिक बाबतीत कमी आणि कष्ट करण्याच्या बाबतीत जास्त असतो. लैंगिक बाबतीत त्या वयात पालक माणसावर संयमाची बंधनं घालतात, पण कष्टाची तयारी करण्याच्या बाबतीत, आयुष्यात पाय रुतवण्याच्या बाबतीत तू आता मोठा झालास असं माणसाला ठळक सांगितलं जातं. त्यातलं लैंगिक मोठेपण माणसाला हवं असतं, पण कष्टाचं मोठेपण नको असतं.

मग पालकांकडून पंचविशीत माणसाला कष्टाच्या मोठेपणाचा दुसरा झटका दिला जातो. कष्ट आता अनिवार्यपणे केलेच पाहिजेत असं सांगितलं जातं. ते नकोच वाटले तरी माणूस अपरिहार्यपणे कष्टाला सामोरा जातो. लैंगिक मोठेपणाची कवाडं त्यावेळी पालकांकडून म्हणजेच समाजाकडून माणसासाठी अधिकृतपणे उघडली जातात. प्रचलित समाजमान्य मार्गांनी माणसाचा लैंगिक प्रवास सुरू व्हायला कुणी हरकत घेत नाही. ते माणसाला हवंसं वाटतं.

तिशीत माणसाला कष्ट आणि वयाच्या मोठेपणाचा तिसरा झटका दिला जातो. त्याच्याकडनं त्याच्या आयुष्याच्या स्थैर्याची अपेक्षी केली जाते. त्यावेळी हा मोठेपणा आपल्याला हवा की नको या संभ्रमात माणूस असतो.

पस्तिशीत मात्र माणसाला तो मोठा झाल्याचा चौथा आणि अंतिम झटका दिला जातो. तो अगदी उघडपणे फक्त वयाचाच मोठेपणा असतो. आता तो मोठा झाला, आता तो त्याचं त्याला हवं तसं जगायला मुखत्यार आहे असं म्हटलं जातं न् हा मोठेपणा मात्र माणसाला नकोसा वाटतो.

पस्तिशीच्या माणसाला पालक आणि समाज त्याच्या स्वतःच्या मर्जीवर सोडून देतो. त्याचं तो पाहील, आता त्याला सगळं कळतं असं म्हटलं जातं न् पालक त्या माणसावरचं लक्ष कमी करतात. एवढे दिवस त्याच्यावर असलेलं पालकत्वाचं आवरण हटवतात आणि स्वतः पालकच त्या माणसावर अवलंबून राहायला लागतात. आपल्या पाल्यावर अवलंबित्वाचा पालकांचा तो खर्या अर्थाने पहिला टप्पा असतो. (हे आपण भारतीय वातावरणातलं बोलतोय.)

इथंच थोडी गडबड होते. वयाच्या मोठेपणाचं ओझं चार टप्प्यांत माणसाच्या अंगावर येतं. त्यातला शेवटचा टप्पा खरोखरच शेवटचा असतो न् माणसाला त्यात मानसिक अनाथपण येतं. आता आपल्यावर कुणी लक्ष देणार नाही, आता आपल्या चुका कुणी काढणार नाही, झालेल्या चुका कुणी आता दुरुस्त करणार नाही, आता आपल्या चुका आपणच दुरुस्त करायच्या, ती आता आपल्या एकट्याची जबाबदारी, असं त्याच्या लक्षात येतं न् तो मनाने एकटा पडल्यागत होतो. ते एकटेपण त्याला नको वाटतं. एकटेपणा आणणारं ते वय आणि मोठेपणा नको वाटतो.

माणूस कष्टांवर जगत असला, तरी भावनांवरही जगतोच. (ते मानवी समूहांचं निसर्गात टिकून राहण्याचं मोठं बळ आहे.) आपण आयुष्यभर कुणाचं तरी पाल्य राहावं अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. त्यामागे माणसाच्या मनात सुप्तावस्थेत वसत असलेली आयुष्याबद्दलची अनिश्चितता, क्षणभंगुरता यांची भीती असते. आपण जगू शकू की नाही आणि आपण नीट जगू शकू की नाही असं त्या भीतीचं स्वरूप असतं आणि आपल्या जगण्याला इतर माणसं जास्त उपयोगी पडू शकतात हे त्याला कळालेलं असतं. त्यातही पालक जास्त. आपण त्यांचं अपत्य असल्याने तेच आपला सर्वाधिक जवळचा आधार असतील याची माणसाला खात्री वाटते. पण पस्तिशी येईयेईपर्यंत टप्प्याटप्प्याने पालक तो आधार काढून घ्यायला लागतात. त्या माणसाने त्याचं त्याचं उभं राहावं असं बघू लागतात. त्याने माणसाला आधारहीनतेची भावना येते. (आणि यातूनच त्याला लैंगिक अवांतर संबंधाची इच्छा होते- ते कसं ते आपण पुढे पाहू.)

पालकांच्या बाजूने आधारहीन होण्याचा तो काळ असतो. उलट पालकच पाल्याकडे आधारासाठी पाहू लागण्याचा तो स्पष्ट असा पहिला टप्पा असतो. त्या टप्प्याची प्राथमिक सुरुवात माणसाच्या विशीतच झालेली असते, पण पस्तिशी येईयेईपर्यंत त्या टप्प्याला अतिशय ठळक रूप येतं.

ज्यांनी आजवर आधार दिला, त्यांचीच आपल्याकडून आधाराची अपेक्षा आहे, याने माणसाला गडबडायला होतंच. त्याचवेळी दुसर्या बाजूला त्या माणसाला स्वतःची अपत्यं झालेली असतात. ती तर अतिशय उघडच त्या माणसावर अवलंबून असतात आणि त्याचाच आधार मागत असतात. माणूस पस्तिशीचा होईपर्यंत त्याच्या अपत्यांना अपत्यपणाचा नेमका आकार आलेला असतो. ती लहान असतानाच रांगतेपण संपलेलं असतं. आपल्याला अपत्यं झाली की माणसाला मोठेपण आल्यासारखं वाटतं. (ते वयाचं असतं, जबाबदार्यांचंही असतं न् ते मनातून नको वाटत असतं.) मग ती अपत्यं जसजशी मोठी व्हायला लागतील तसतशी ती आपण वयाने आणि जबाबदार्यांनी मोठं होतोय याची माणसाला आठवण देऊ लागतात. माणूस पस्तिशीचा होईपर्यंत त्याची अपत्यं आपल्या गरजा ठळकपणे नोंदवण्याइतकी मोठी झालेली असतात आणि माणसाच्या मनावरचं मोठेपणाचं ओझं त्यांनी वाढवलेलं असतं.

अपत्यं वाढत जाणं म्हणजे आपलं वय वाढत चालल्याची जाणीव होत राहणं. ती जाणीव म्हणजे आपण तारुण्यातून बाद होतोय, आपल्या स्वतःच्या बालिशपणातून-आणि त्यातल्या भाबडेपणातून, अजाणपणातून बाद होतोय याची ठळठळीत नोंद. जगण्याचा जाणकार झाल्यावर माणसाला आधीच्या अजाण असण्याचा मोह पडतो. प्रत्यक्ष अजाण असताना मात्र कधी एकदा आपण जाणकार होतोय, असा मोह असतो.

पस्तिशी हे वयाची जाणीव होण्याचं वय, तर ती जाणीव माणसाला नकोशी असते, पण एका बाजूला त्याचे पालक त्याला ती जाणीव करून देतात ठळक आणि दुसर्या बाजूला त्याची अपत्यं त्याला ती जाणीव करून देतात. पालक आणि अपत्यं जरी हवीशी असली आणि त्यांच्यात भावना गुंतलेल्या असल्या तरी माणसाला त्यांच्याकडून आपलं वय आपल्या अंगावर ढकललं जाणं नको असतं. हे लक्षात घ्या की, माणूस जसा आपल्या आयुष्याला घाबरलेला असतो, तसाच जबाबदार्यांनाही कायम घाबरलेलाच असतो. त्याला प्रत्यक्षात कसल्याही जबाबदार्या नको असतात. पण त्याला स्वतःच्या भुका भागवायच्या असतात आणि स्वतःच्या भुका भागवण्यासाठी इतरांची जबाबदारी अपरिहार्यपणे घ्यावीच लागते. ती मानवी वंशसातत्याच्या साखळीची सामाजिक गरज असते. त्याला आपल्या जगण्याच्या गरजा भागवण्यासाठी बायको, नवरा, मुलं यांची गरज असतेच.

तर हे जबाबदारी घ्यावी लागणं आणि ती नको असणं या दोन्ही दळ्यांमध्ये माणूस भरडला जातो न् त्यातच नेमक्या पस्तिशीच्या काळात आपलं लहान असणं संपलं ही जाणीव होऊन त्याला मानसिक अनाथपण येतं. तिथं माणूस बिनसतो आणि जगण्याचं आश्वासन मिळेल असा आधार शोधायला लागतो. (आणि अवांतर लैंगिकतेकडे वळतो.)

माणसाच्या या बिनसण्याचा एक परिणाम असाही होतो की, माणूस पस्तिशीच्या काळात जास्त चिडचिड करायला लागतो. इतरांवर खेकसायला लागतो – इतरांशी भांडायला लागतो. आणि त्याची त्यावेळी सर्वाधिक भांडणं जवळच्या माणसांशी व्हायला लागतात. जवळची माणसं ही त्यावेळी त्याचं सहज लक्ष्य असतात आणि त्यातही आपल्यावर अवलंबून असणार्यांवर लवकर राग निघतो. राग काढल्यावरही ही माणसं आपल्याशिवाय कुठे जाणार नाहीत अशी सुप्त भावना असते. त्यामुळे त्यांच्यासमोर रागाला सहजता येते. या रागाच्या मुळाशी खोल असते, माणसाला त्यावेळी होणारी वयाच्या मोठेपणाची ठळक जाणीव. आपल्या जगण्याबद्दलची भीती.

पस्तिशीच्या आसपासची माणसं बघा, ती आपल्या पालकांशी, आपल्या सनदशीर लैंगिक जोडीदाराशी, आपल्या अपत्यांशी भांडताना, खेकसताना दिसतात. नवराबायकोची भांडणं, नाराज्या या काळात वाढलेल्या दिसतात – बरेच संसारही नेमके याच काळात मोडतात. माणसं व्यभिचार म्हणवल्या जाणार्या गोष्टींकडे याच काळात जास्त वळतात. माणसं याच काळात व्यसनांकडे आणि अध्यात्माकडेही जास्त झुकतात.

आपल्यावर अवलंबून असलेल्यांवर आपल्या वयाच्या भीतीतून येणारा राग नवरा – बायको एकमेकांवर काढतात. त्यात नवर्याला वाटतं, बायको (कमवती नसेल तर) आपल्यावर पोटार्थी आणि लैंगिकार्थी अवलंबून आहे. बायकोला वाटतं, नवरा आपल्यावर कुटुंबार्थी आणि लैंगिकार्थी अवलंबून आहे. अवलंबून असलेल्याला हिडिसफिडिस करणं हा माणसाचा सार्वत्रिक गुणधर्म आहे आणि त्यातून माणूस रागाचं प्रदर्शन जरा जास्तच करतो. त्यातून मनं दुखावतात. दुखावलेली मनं नेहमी मनावर फुंकर घालणारे आधार शोधतात. (त्यातूनही व्यभिचार घडतो. व्यसनं किंवा अध्यात्मही शोधलं जातं. घरंही मोडतात सहसा. बायको कमवती असेल तर घरं जरा जास्त त्वरेने मोडतात. आणि समजा घरं नाही मोडली गेली तरी मनं तरी हमखास मोडतात आणि या वयात मोडली गेलेली मनं आयुष्यभर पुन्हा पहिल्यासारखी जुळत नाहीत, सांधली जात नाहीत. त्याच्या मोडण्याच्या खुणा आणि ठुसठुशी घेऊनच माणूस पुढचं आयुष्यभर जगतो. त्या अर्थाने पस्तिशीचं हे वळण जास्त धोकादायक असतं.)

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *