अभिनेता अथवा अभिनेत्री बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेकजण चित्रपटसृष्टीत येतात. पण या चित्रपटसृष्टीत काम मिळवणं आणि काम मिळालंच तर आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं हे खूपच कठीण असतं. कलाकारांना एकदा का या झगमगत्या दुनियेची, त्यातून मिळणार्या प्रसिद्धीची ऌचटक लागली तर मग त्यातून त्यांना बाहेर पडणं अशक्य असतं. कलावंतांना अशा वातावरणाची जणू नशाच चढलेली असते. त्यामुळे काही ना काही करून या इंडस्ट्रीत आपली पावलं मजबूत केली पाहिजेत यासाठी ते प्रयत्न करत असतात. काहीवेळा तर त्यासाठी ते कोणताही मार्ग अवलंबायला तयार असतात.

चित्रपटात झळकायला मिळावं, एखादा छोटासा तरी रोल करायला मिळावा यासाठी अनेक नवोदित कलाकार प्रॉडक्शन हाऊसेसच्या चकरा मारत असतात. आपलं घरदार सोडून केवळ अभिनयाच्या वेडापायी मुंबईत निघून आलेले आणि नंतर हताश होऊन इथेच छोटीमोठी कामं करणारे कलाकार तर ढिगाने या मुंबापुरीत आपल्याला पहायला मिळतात. काहीजण या क्षेत्रात आपल्याला काही मिळणार नाही याची कल्पना आल्यामुळे आपला दुसरा मार्ग निवडतात तर काहीजण या निराशेतून आत्महत्या करतात. शंभर वेळा इंडस्ट्रीतील लोकांच्या हातापाया पडून एखाद् दुसरं काम पदरी पाडणारेदेखील अनेकजण असतात. एकदा काम मिळालं तर आपलं बस्तान कायमचं बसेल असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे ते धडपडत असतात. पण फिल्मी दुनिया त्यांना दुरून जितकी चांगली दिसत असते, त्याचं ग्लॅमर जितकं त्यांना आकर्षित करत असतं, मात्र जवळ गेल्यावर हे सगळं मिळवणं किती अवघड आहे याची त्यांना कल्पना येते.

गेल्या काही वर्षांपर्यंत चित्रपट हे केवळ एकच माध्यम होतं. पण गेल्या १०-१५ वर्षांत छोट्या पडद्याने आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आणि तेव्हापासूनच या छोट्या पडद्यावर डेली सोपचं प्रचंड फॅड आलं. छोट्या पडद्यावर अधिकाधिक वाहिन्या आणि मालिका असल्यामुळे हौशी कलाकारांच्या आशा अधिक पल्लवित झाल्या. पण या सगळ्या कलाकारांना काम मिळतंच असं काही नाही आणि मिळालंच तर त्यांची ती प्रसिद्धी ठरावीक काळासाठीच असते. या मालिका सुरू असताना या मालिकांत अभिनय करणारे कलाकार हे प्रेक्षकांचे जीव की प्राण असतात. पण हे कलाकार प्रेक्षकांमध्ये ते साकारत असलेल्या व्यक्तिरेखांमुळे अधिक लोकप्रिय असतात. प्रेक्षक त्या कलाकारांवर एक कलाकार म्हणून नव्हे तर ती व्यक्तिरेखा म्हणून अधिक प्रेम करत असतात आणि त्यामुळेच ती मालिका संपल्यानंतर ते कलाकार कुठे जातात, त्यांचं काय होतं याबद्दल प्रेक्षकांना काहीच पर्वा नसते. त्यामुळे छोट्या पडद्यावर अथवा चित्रपटांत चांगल्या भूमिका केल्यानंतर अपयश आल्यास ते पचवणं सोपं नसतं.

२००० साली गाजलेल्या ‘कहानी घर घर की’ या मालिकेतील छोट्याशा श्रुतीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ही श्रुती म्हणजेच श्वेता प्रसाद बासू… श्वेताला लहानपणापासूनच अभिनयाची चांगली समज होती आणि यामुळेच तिला ‘मकडी’ या तिच्या पहिल्याच चित्रपटात दुहेरी भूमिका साकारायला मिळाली. या चित्रपटातील तिच्या दोन्ही भूमिका खूपच ताकदीच्या होत्या. तिने त्या उत्कृष्टपणे साकारल्यादेखील होत्या. ‘मकडी’ या चित्रपटात शबाना आझमीसारख्या कसलेल्या अभिनेत्रीसमोर तिने दमदार अभिनय केला आणि प्रेक्षकांची दाद मिळवली होती. इतकंच नाही तर या चित्रपटासाठी श्वेताला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. त्यानंतर ‘इक्बाल’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिने समीक्षकांची आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पण त्यानंतर श्वेता प्रसाद हे नाव तितकंसं चर्चेत राहिलं नाही. मध्यंतरीच्या काळात ती दाक्षिणात्य आणि बंगाली चित्रपटांत काम करत होती. पण बॉलिवूड आणि छोट्या पडद्यापासून दूर असल्यामुळे ती प्रसारमाध्यमांत झळकत नव्हती. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी श्वेता अचानकच चर्चेत आली… मात्र ही चर्चा श्वेतासाठी आणि एकूणच सिनेसृष्टीसाठी चांगली नव्हती… झगमगत्या दुनियेची एक गडद काळी बाजू दाखवणारी ही चर्चा होती… श्वेता प्रसाद बासू या अभिनेत्रीला वेश्याव्यवसाय करताना रंगेहाथ पकडल्याची बातमी बे्रक झाली… आणि बालकलाकार ते अभिनेत्री असा अभिनयाचा टप्पा गाठलेली श्वेता पुन्हा चर्चेत आली आहे.

हैदराबाद इथल्या एका हॉटेलमध्ये श्वेताला वेश्याव्यवसाय करताना रंगेहाथ पकडण्यात आलं. पण तिला वेश्याव्यवसाय करताना पकडण्यात येण्याची तिची ही काही पहिली वेळ नव्हती. एका तेलगू वाहिनीने काही महिन्यांपूर्वी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये तिला आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आलं होतं. एका चांगल्या अभिनेत्रीचा हा प्रवास खरोखरच धक्कादायक आहे. आज, अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली अभिनेत्री वेश्याव्यवसायाच्या धंद्यात कशाप्रकारे ओढली गेली याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. श्वेताने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटलं आहे की, तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे ती वेश्याव्यवसायाकडे ओढली गेली. चित्रपटांमधून पुरेसा पैसा मिळत नसल्याने घर चालवण्यासाठी तिने हा मार्ग निवडला. तिचं असंही म्हणणं आहे की तिला काही लोकांनी या धंद्यात यायला भरीस घातलं. तसंच केवळ तीच नव्हे तर आपल्या आर्थिक समस्यांमुळे या धंद्यात आतापर्यंत अनेक अभिनेत्री ओढल्या गेलेल्या आहेत. श्वेताने दिलेल्या या खळबळजनक माहितीमुळे या झगमगत्या दुनियेची एक काळी बाजू पुन्हा एकदा लोकांच्या समोर आलीय.

चित्रपटात तसंच मालिकांमध्ये होत असलेल्या कास्टिंग काऊचविषयी आपण अनेक वर्ष ऐकत आलो आहोत. काम मिळण्यासाठी आलेल्या कलाकारांचं लैंगिक शोषण झाल्याच्या अनेक घटनाही आजवर आपल्यासमोर आलेल्या आहेत. पण श्वेताच्या या प्रकरणामुळे फिल्म इंडस्ट्रीची एक वेगळीच बाजू आपल्यासमोर आली आहे. खरं तर आतापर्यंत अनेक मॉडेल्स्ना वेश्याव्यवसाय करताना पोलिसांनी पकडलं आहे. पण त्यापैकी कोणाचंच नाव पोलिसांनी जाहीर केलं नव्हतं. त्यामुळे अशाप्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांत कमी प्रमाणात आल्या. श्वेता ही बॉलिवूडची पहिलीच अभिनेत्री आहे जिचं नाव पोलिसांनी अशा प्रकरणात जाहीर केलंय. हैदराबाद पोलिसांनी या कारवाईमध्ये तिच्यासाठी एजंट म्हणून काम करणार्या टॉलिवूडचा साहाय्यक दिग्दर्शक बालू यालाही पकडलं आहे. मात्र अशा प्रकरणात श्वेताचं नाव थेट मीडियात जाहीर करणं चित्रपटसृष्टीतील अनेकांना पटलेलं नाहीय. श्वेताचं नाव पोलिसांनी मीडियाला सांगितलं पण पोलिसांनी तिच्यासोबत जो ग्राहक होता, त्याचं नाव कुणालाच सांगितलेलं नाहीय. पोलिसांनी टाकलेल्या या धाडीत अनेक प्रसिद्ध व्यावसायिक सापडले होते असं केवळ म्हटलं गेलंय. त्यांची नावं प्रसारमाध्यमांत का देण्यात आली नाहीत असा सवाल चित्रपटसृष्टीतील लोक करत आहेत. अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने यासंदर्भात ट्वीट केलं आहे की, श्वेता वेश्याव्यवसाय केल्यामुळे बातम्यांमध्ये तसंच सुधारगृहात आहे. पण तिच्या हायप्रोफाइल ग्राहकाला तुरुंगवास का नाही? तसंच आदितीप्रमाणेच दिग्दर्शक हंसल मेहता यांनीदेखील ट्वीट केलं आहे की, श्वेताचे फोटो पोस्ट करण्याऐवजी तिच्या श्रीमंत ग्राहकांचे फोटो पोस्ट करावेत. एवढंच नाही तर श्वेता एक चांगली अभिनेत्री असल्याने मेहता यांनी तिला एक चित्रपटही ऑफर केला आहे. इंडस्ट्रीतील लोकांप्रमाणेच अनेक लोकांनीदेखील श्वेताचं नाव प्रसारमाध्यमांमधून दाखवलं जाणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

वेश्याव्यवसाय करताना पकडल्या गेलेल्या बाईची माहिती नेहमी गुप्त ठेवली जाते. तिला या काळ्या दुनियेतून बाहेर काढून तिचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जातो. असं असताना श्वेताचं नाव पोलिसांनी प्रसारमाध्यमांत का दिलं असा प्रश्न आता लोकांकडून विचारण्यात येत आहे. इंडस्ट्रीतील अनेकजण यासाठीच श्वेताच्या पाठीमागे आता खंबीरपणे उभे राहिले आहेत. ‘कहानी घर घर की’मध्ये श्वेताच्या वडिलांची भूमिका साकारलेल्या किरण करमरकरने म्हटलंय की, ‘ती मला माझ्या मुलीसारखी आहे आणि ती या सगळ्यातून बाहेर येवो एवढीच माझी इच्छा आहे.’ तसंच याच मालिकेत तिच्या आईची भूमिका साकारणारी साक्षी तन्वरदेखील तिच्या पाठीशी उभी राहिली आहे. तिच्यामते, श्वेताबरोबर पकडण्यात आलेल्या ग्राहकांची नावंही पोलिसांनी मीडियाला सांगणं गरजेचं होतं. जेणेकरून समाजासमोर त्यांचा खरा चेहरा येईल. अभिनेता उपेन पटेलनेही श्वेता यातून बाहेर पडून आपलं आयुष्य नव्याने सुरू करेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

ग्राहकाचं नाव न देता केवळ श्वेताचं नाव प्रसारमाध्यमांत का देण्यात आलं असं फिल्म इंडस्ट्रीतील अनेकजणांचं म्हणणं असून अनेकजण तिला पाठिंबा देत आहेत. पण बॉलिवूडसाठी हे सारं नवीन असलं तरी दाक्षिणात्य अभिनेत्रींसाठी हा प्रकार अजिबातच नवीन नाहीय. आतापर्यंत अशाप्रकारच्या सेक्स रॅकेटमध्ये अनेक दाक्षिणात्य अभिनेत्रींना पकडण्यात आलं आहे आणि श्वेतानेदेखील पोलिसांना दिलेल्या जबानीत अनेक अभिनेत्री यात गुंतल्या असल्याचं म्हटलं आहे. टॉलिवूड अभिनेत्री भुवनेश्वरी हिला चेन्नई येथे सेक्स रॅकेट चालवत असताना दोनदा पकडण्यात आलं आहे. तर ऐश अन्सारी या बी ग्रेड अभिनेत्रीवर ऌग्राहकांना परदेशी मॉडेल पुरवण्याचा आरोप आहे. टॉलिवूड अभिनेत्री सायरा बानू, यमुना, ज्योती, श्रवणी, किन्नरा यांना वेश्याव्यवसाय करताना अटक करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर ‘लाईफ की तो लग गई’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बंगाली अभिनेत्री मिष्टी मुखर्जी हिला तर मुंबई पोलिसांनी वेश्याव्यवसाय करताना रंगेहाथ पकडलं होतं.

कोणतीही स्त्री आपल्या इच्छेने देहव्यवसाय करत नाही. तिच्या आजूबाजूला असलेली परिस्थिती तिला हे करण्यासाठी भाग पाडते. त्यामुळे श्वेताच्या आयुष्यात अशा नक्कीच काही घटना घडल्या असतील त्यामुळेच ती या व्यवसायाकडे वळली गेली. त्यामुळेच पोलिसांनी श्वेताचं नाव जाहीर न करता तिला सुधारण्याची संधी देण्याची गरज असल्याचं मत आता सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. पण श्वेताची ही पहिलीच वेळ नाहीय. तिला या अगोदर देण्यात आलेल्या संधीचा तिने योग्य वापर केलेला नाही. आता तरी तिने या धंद्यातून बाहेर येऊन आपल्या अभिनयावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. फिल्म इंडस्ट्रीने तिला दिलेल्या पाठिंब्यावर तिने आपला भूतकाळ विसरून आपल्या अभिनयाच्या जोरावर आपलं उज्ज्वल भविष्य निर्माण करावं, अशाच प्रतिक्रिया आता तिच्या चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील मान्यवरांकडून व्यक्त होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *