भारत देशाला वर्षानुवर्षांची सणांची परंपरा आहे. इथल्या रूढी चालीरिती यांनी लोकांना एकत्र बांधून ठेवलं आहे. प्रत्येक जाती धर्माचे लोक इथे एकत्र येऊन सण-उत्सव अगदी आनंदाने साजरे करतात. यंदाच्या वर्षात तर कितीतरी सणांची माळ अगदी सोईस्करपणे आठवडा अखेरीस आली आहे. त्यातच श्रावण महिना म्हणजे हा इतर सार्या महिन्यांचा राजाच… नागपंचमी, दहीकाला, नारळी पोर्णिमा, पोळा, गणेशोत्सव, रक्षाबंधन हे सारेच सण या श्रावण महिन्यातच येतात. या वर्षीचा रक्षाबंधनाचा सण तर सुस्त रविवारी आलेला… तरुणाईनेसुद्धा या सणाची तयारी अगदी जोशात केलेली. हुन्नरीने प्रत्येक सणांची माहिती घेण्याची तगमग आणि त्याचं संस्कृतीत असलेलं महत्त्व जाणून घेणारी ही पिढी खरंच विलक्षण आहे.

आजकाल सणांच्या शुभेच्छा देण्यासाठी पूर्वीसारखं केवळ फोनवर विसंबून राहावं लागत नाही तर सोशल मीडिया, व्हॉट्स अप, ट्विटरसारख्या माध्यमांचा वापर करत आता सर्वच सणांच्या शुभेच्छांचा वर्षाव केला जातो. इतकंच नाही तर हा शुभेच्छांचा वर्षाव त्या त्या सणांच्या कितीतरी दिवस अगोदरपासून करायला सुरुवात झालेली असते. अॅडव्हान्स जनरेशनच्या अॅडव्हान्स शुभेच्छा, असंच याचं वर्णन करता येईल. मात्र अशा आनंदी सणांमध्ये कधी कधी घडणार्या काही भयंकर गोष्टींमुळे कमालीची भीती जाणवते. सण साजरे केले जातात मोठ्या आंनदाने. मात्र त्या सणांची महती अंगीकारली जाताना दिसत नाही, ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल. उदाहरणच द्यायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच झालेल्या बहीण-भावाच्या पवित्र नात्याच्या सणाचं अर्थात रक्षाबंधनचं देता येईल. रक्षाबंधन हा सण सगळ्याच घरात साजरा केला जातो. बहिणीने भावाला राखी बांधण्याचा हा सोहळा खरंच वातावरण प्रसन्न करणारा असतो. पण हा सण साजरा करत असताना खरी भीती वाटते आज वाढत असलेल्या स्त्री भ्रूण हत्येच्या संख्येची… वंशाचा दिवा जन्मास यावा या हव्यासापोटी कितीतरी मुलींना गर्भात मारलं जातंय. स्त्रियांची होणारी कुचंबना, त्यांची वाढ आणि प्रगती रोखण्याचा हा जीवघेणा प्रकार अगदी गावापासून ते शहरापर्यंत बेकायदेशीरपणे सुरू आहे. अनेकदा तर आई होण्याची चाहूल लागताच गर्भित मातेला मानसिक तणाव सहन करावा लागतो. हे अगदी सुशिक्षित लोकांमध्येही पहायला मिळतं. मुलगाच झाला पाहिजे, असा मानसिक दबाव सततच गर्भवती मातेला सहन करावा लागतोय. मुलगा नसेल तर स्त्री भ्रूणहत्या नक्की हे जणू सूत्रच तयार झालं असावं असंच काहीसं चित्र आज पहायला मिळतंय. स्त्रीभ्रूण हत्येची संख्या दिवसेंदिवस अशीच वाढत राहिली तर देशातील स्त्री-पुरुष समानतेचा अधिकार हा केवळ कागदोपत्रीच राहील. पितृसत्ताक पद्धतही अजून तीव्र होईल. आईवडिलांनी गुप्तपणे केलेली अशाप्रकारची हत्या ही पुढे असमतोलाची परिस्थिती निर्माण करेल. हा विचार केवळ रक्षाबंधन सणापुरता मर्यादित नाही तर स्त्री जन्माला नाकारून आपण आई, मावशी, आत्या, काकी, बहीण, बायको या सर्वच नात्यांना धोक्यात आणतो आहोत, याचंही भान आणणारा आहे. तसंच यामुळे पुढच्या पिढीलासुद्धा कोणत्या आदर्श नात्याची ओळख करून देऊ हे सांगणंही कठीण आहे.

आई-बाप, आजी-आजोबा ही प्रामुख्याने जपलेली नाती आहेत. रक्षाबंधन सण हा भावनिकदृष्ट्या भाऊबहिणीमधलं नातं मांडतो. मात्र अनेकदा रक्षणाच्या नावाखाली अनेक निर्बंध मुलीवर लादले जातात. अजूनही महिलांना मानसिक स्वातंत्र्य असं मिळालेलंच नाही. कुठेही कधीही अत्याचाराला सामोर्या जाणार्या स्त्रिला अजूनही वाईट अनुभवच अधिक मिळताहेत. त्यांना मुक्तपणे जगण्याची अजूनही तितकीशी मुभा मिळत नाही. आजसुद्धा अनेक ठिकाणी मुली या मुलांप्रमाणे आईवडिलांचा सांभाळ करतात. तसंच त्या भावांनाही सांभाळतात. मात्र स्त्री भ्रूण हत्या आणि त्याबद्दलची शोकांतिका ही खरंतर आजच्या पिढीने जाणणं महत्त्वाचं आहे. त्याबद्दलची मानसिकता बदलण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करणार्या पिढीने आवाज उठवला पाहिजे. अनेक ठिकाणी लेक वाचवा आंदोलनं झाली… अनेक जनजागृतीचे संदेश शासनाने सर्व माध्यमांतून प्रसारित केलेत. मात्र तरीही या घटना थांबत नाहीत. उलट या पिढीने पुढाकार घेऊन स्त्री भ्रूणहत्येबद्दलची सामाजिक पातळीवर जागृत्ती करण्याची वेळ आली आहे. निव्वळ महिला दिन हा स्त्री मुक्ततेचा दिवस साजरा न करता प्रथम स्वतःच्या परिवारातील महिलांचा आदर आणि त्यांची मानसिकता समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांचं आरोग्य, त्यांची भीतीसुद्धा समजणं ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे.

हे प्रकार कसे रोखता येतील यासाठी विविध कल्पना आणि त्यांची अंमलबजावणी करणं महत्त्वाचं आहे. शासन कितीही उपक्रम आखेल पण तरीही प्रत्येक कुटुंबातील व्यक्तिची मानसिकता बदलणं आवश्यक आहे. आपल्या घरात जर असं काही घडल्याची माहिती जरी आज कळली तरी आपण किती हादरून जाऊ… म्हणूनच आता वेळ आली आहे ती स्त्री भ्रूण हत्याविरुद्ध आपल्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबातील लोकांना, आप्तेष्टांना जागरुक करण्याची… समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याची ही वेळ आहे. आयुष्यात जर एकतरी उत्कृष्ट काम करायचं असेल तर एका नव्या जन्माला येऊ पाहणार्या जीवास या पृथ्वीवर मुक्तपणे श्वास घेऊ देण्यास मदत करा…!

स्मिता बनकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *