नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह तमाम विरोधी पक्षांना मोदी लाटेने अक्षरशः वाहून नेलं होतं… पण आताच देशातील काही राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांवरून ही मोदी लाट ओसरली असल्याचं दिसून आलंय… देशातील ३ लोकसभा आणि ३२ विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा निम्म्याहून अधिक जागांवर पराभव झालाय… इतकंच नाही तर नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्येही भाजपची पीछेहाट झाली असून काँग्रेसने इथे दोन जागांवर विजय मिळवलाय. याच पार्श्वभूमीवर आता पुढील महिन्यात महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात निवडणुका होऊ घातल्यात. या निवडणुकांवरही या निकालांचा परिणाम दिसून येईल हे नक्कीच. तसंच या निकालांवरून अवघ्या चार महिन्यात मोदी लाट विरली असल्याचं चित्र स्पष्ट झालंय…

विविध राज्यांतील आमदार लोकसभेवर निवडून गेल्यामुळे देशातील आठ राज्यांत १३ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीतील मोदीलाटेचा प्रभाव पाहणारी ही निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीच्या निकालांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं. मोदी सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या कारभाराची पावती भाजपला मिळेल, असंही यावेळी बोललं जात होतं. मात्र, बहुतांश राज्यांत स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरल्याने भाजपला जोरदार फटका बसला आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यांच्या समाजवादी पक्षाने पुन्हा मुसंडी मारली आहे; तर काँग्रेसला भाजपशासित गुजरात, राजस्थानने अनपेक्षितरित्या मतांचा कौल दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत गुजरात आणि राजस्थानमध्ये एकही जागा न मिळवू शकलेल्या काँग्रेसने पोटनिवडणुकीत मुसंडी मारलीय. राजस्थानमध्ये चारपैकी ३ जागा जिंकत काँग्रेसने भाजपला जवळपास जोरदार धक्काच दिला आहे. तर गुजरातमध्येही काँग्रेसने दोन जागा खेचून आणल्या आहेत. याआधी गुजरात आणि राजस्थानमधील सर्व जागा भाजपच्या ताब्यात होत्या. तर दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये भाजपने आपलं खातं खोललंय… येथील बसीरहाट दक्षिण जागेवर भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला धोबीपछाड देत विजय मिळवलाय. या विजयासह पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपने प्रथमच खातं उघडलं आहे. तसंच वडोदरा, मेडक आणि मैनपुरी मतदारसंघातील लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल अपेक्षेप्रमाणे लागलेत. या जागा अनुक्रमे भाजप, तेलंगण राष्ट्र समिती आणि समाजवादी पक्षाने राखल्या.

चार राज्यांत पार पडलेल्या पोटनिवडणुकांचे हे निकाल

उत्तर प्रदेश

समाजवादी पक्ष – ९

भाजप – २

गुजरात

भाजप – ६

काँग्रेस – ३

राजस्थान

काँग्रेस – ३

भाजप – १

प. बंगाल

तृणमूल काँग्रेस – १

भाजप – १

 

‘खाप’चा क्रांतिकारी फतवा

’हम दो हमारे दो…,‘ असं म्हणत उत्तर प्रदेशातील खाप पंचायतीने कुटुंब नियोजनाचा फतवा काढला आहे. अलीकडच्या काळात या खाप पंचायतींच्या सदस्यांमध्ये आणि लोकांमध्ये होत असलेल्या जनजागृतीच्या कामाचं फलित म्हणजेच हा फतवा आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही… मुलींनी जिन्स पँट घालायची नाही, मोबाइल वापरायचा नाही, फास्ट फूड खायचं नाही, बलात्कार्यांना फाशी नको, असे अजब, चमत्कारिक आणि वादग्रस्त फतवे वेगवेगळ्या खाप पंचायतींनी याआधी काढले आहेत. खाप पंचायतींच्या या वादग्रस्त फतव्यांवर त्या त्या वेळी विविध स्तरांमधून तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. इतकंच नाही तर खाप पंचायतीवर बंदी घालण्याची मागणीही अनेकांनी केली आहे. मात्र भैंसवाल गावच्या खाप पंचायतीत एक क्रांतिकारी निर्णय झालाय. आपल्या हद्दीत येणार्या ४० गावांसाठी त्यांनी कुटुंब नियोजनाचा फतवा काढला आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यातून हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला असल्यामुळे या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलंय…

विवाह, स्त्री-स्वातंत्र्य, जात-पात या विषयांसंदर्भात प्रतिगामी मतं मांडणार्या, जाचक फतव्यांसाठी ओळखल्या जाणार्या खाप पंचायतीने लोकसंख्येला आळा घालण्यासाठी स्तुत्य, स्वागतार्ह भूमिका घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्यातील भैसवाल गावच्या खाप पंचायतीने गावकर्यांना दोनपेक्षा जास्त मुलं जन्माला न घालण्याची सक्त ताकीद दिली आहे.

मोठ्या कुटुंबामुळे गरिबी आणि मागासलेपणाच्या दुष्टचक्रातून सुटका होऊ शकत नाही. सर्व मुलांना शिक्षण देता येत नाही आणि त्यांचा विकासही खुंटतो. हे चित्र बदलण्यासाठी, दोनच मुलांना जन्म देण्याचा आदेश देण्यात आल्याचं खाप पंचायतीच्या एका सदस्याचं म्हणणं आहे. या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं असलं, तरी काहीजणांनी मात्र या आदेशाला विरोध केलाय. पंचायतीशी संबंधित काही सदस्यांनाही हा निर्णय पटलेला नसल्याचं समजतं. आता त्यांचं मतपरिवर्तन होतं का आणि इतर खाप पंचायतीही शामलीमधील या खाप पंचायतीचा आदर्श घेऊन काही क्रांतिकारी पावलं उचलतात का, हे पाहणंच महत्त्वाचं ठरणार आहे.

तसंच उत्तर प्रदेशसारख्या राज्यातील खाप पंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत महाराष्ट्रातील खाप पंचायती करतात का हेही पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *