पंधरा- वीस घरांची वस्ती… स्पीकरवर गाणं सुरू होतं. ’आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकर्यांच्या हक्कासाठी लावू पणाला प्राण…‘ गावातील आणि परिसरातील माणसं त्या आवाजाच्या दिशेने निघालेली… रस्त्यावर चिखल झालेला… कसरत करत गाड्या निघालेल्या… हळूहळू मांडव भरला… कार्यक्रम सुरू झाला. त्या वस्तीवर पहिल्यांदाच एवढ्या गाड्या आणि माणसं आलेली… शेतकरी चळवळीत लढणार्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देणार्या नगुबाई माळी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्या स्मृती पुरस्कार प्रदानाचा तो कार्यक्रम होता. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला. हौसाताईंच्या आजवरच्या खडतर आणि संघर्षमय वाटचालीला पुरस्कार देऊन सलाम करण्यात आला. स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवास भोगलेल्या क्रांतिकावीरांगणा हौसाताई आजही शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी कार्यकर्त्यांसोबत लढत आहेत. यासाठीच त्यांचा सन्मान करण्यात आला. मात्र या कार्यक्रमात त्यांनी भाषणातून व्यक्त केलेली खंत सर्वांनाच अस्वस्थ करून गेली…

सांगली जिल्ह्यातील वांगी मुक्कामी शेतकरी चळवळीत काम करणार्या नगुबाई माळी या कार्यकर्त्या… सत्यशोधक चळवळीत वाढलेल्या. लहानपणापासून महात्मा फुले यांच्या ‘शेतकर्यांचा आसूड’ ग्रंथाचा अभ्यास केलेल्या. सासरी आल्यावर त्यांनी शेतकरी चळवळीत भाग घेतला. परिसरातील गोरगरीब कष्टकर्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत केली. शेतकरी चळवळीचा वारसा त्यांनी जोपासला. कधी कटू प्रसंग समोर आले पण घेतला वसा त्यांनी कधी सोडला नाही. शेतकरी चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी बळ उभं केलं. स्वतःच्या मुलाला परशुरामला चळवळीत पाठवलं. तो पूर्णवेळ कार्यकर्ता बनला. रात्री अपरात्री त्याच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना आनंदाने भाजीभाकरी करून खायला दिली… महाराष्ट्राभर प्रसिद्ध असलेले अनेक कार्यकर्ते परशुरामच्या चंद्रमोळ्या झोपडीत मुक्काम करून गेले आहेत. अशा या शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचं प्रेरणास्थान असलेल्या नगुबाईंच्या नावे हा पुरस्कार होता…

कार्यक्रमातील हौसाताईंचं रांगड्या शैलीतील भाषण सर्वांनाच अंतर्मुख करून गेलं. त्या म्हणाल्या, ’आम्ही जीव धोक्यात घालून लढलो. आमाला सुराज्य आणायचं हूतं पण सुराज्य आलं न्हाय. आज गरिबाला कुणी वाली उरला न्हाय. राज्यकर्ते पैसेवाल्यांच्या हातातील बाहुलं बनल्याती. त्यांना गरिबांचं कसलंही देणंघेणं न्हाय. काहीजण म्हणत्याती आमी शेतकर्याची पोरं हाय पण ही शेतकर्याची पोरंच कुर्हाडीचा दांडा गोतास काळ झाल्याती. आमच्या येळची काँग्रेस महात्मा गांधींची हूती पण आताची येगळी हाय. शेतकरी आत्महत्या करतूया. बारकी पोरं भाकरी मिळना म्हणून उपाशी मरायला लागल्याती. कुपोषणानं बारकी मुलं मेली. भांडवलदारांचं बंगलं आकाशाला भिडाया लागल्याती. गरिबाच्या झोपडीतील चूल पेटना झालीया. आमचा लढा कशासाठी हुता? गोरं इंग्रज जावं आन् काळ इंग्रज रहावं म्हणून आमी लढलो नव्हतो. पुढार्यांचं घोटाळं बघण्याची येळ आमच्यावर आलीय. घोटाळं करणारं पुढारी राजरोस कसं फिरत्याती. तुरुंगात का जाईनाती? आमी तरुणपणात लढाईत हुतो. आजचा तरुण का पेटत न्हाई? का लढत न्हाय? गरिबांना नाडणार्यांना आता गाडलं पायजे. हौसाताई आजबी रस्त्यावर यायला तयार हाय लढायला. कोण कोण येनार बोला…?’

यावेळी हौसाताईंनी क्रांतिगीतं म्हणत स्वातंत्र्य चळवळीतील मंतरलेले दिवस सर्वांसमोर उभे केले. पत्री सरकारची लढाई, रणसंग्रामातील अविस्मरणीय प्रसंग उपस्थितांना सांगितले. त्या बोलत होत्या आणि प्रसंग डोळ्यांसमोरून सरकत होते. इतक्या ओघवत्या शैलीत त्यांनी स्वातंत्र्याची कथा सांगितली. त्यांनी राज्यकर्त्यांच्या विरोधात रस्त्यावर येऊन लढण्याचा केलेला निर्धार सर्वांनाच प्रेरणा देऊन गेला. हौसाताईंनी उपस्थित केलेले प्रश्न प्रत्येकाला अस्वस्थ करणारे होते.

स्वातंत्र्यासाठी लढलेल्या हौसाताई पाटील शोषणविरहित समाजाच्या निर्मितीसाठी पुन्हा लढ्यात उतरल्या. गरिबांच्या हक्कांसाठी त्यांनी संघर्षाचा निर्धार केला. त्या आणि त्यांचे जीवनसाथी क्रांतिवीर भगवानराव (बप्पा) पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. खानापूर तालुक्याच्या दुष्काळी भागात शेतकर्यांच्या प्रश्नावर लढे उभारले. कष्टकरी जनतेसोबत सुखःदुखात राहिले. शेतकरी कामगार पक्षाचं तत्त्वज्ञान प्रमाण मानून व्यवस्थेच्या विरोधात लढत राहिले. चिपळूण-विजापूर रस्त्यावर असलेलं हणमंतवाडिये हे गाव शेतकरी चळवळीचं उर्जाकेंद्र बनलं. आज पतीच्या पश्चातही हौसाताई शेतकर्यांच्या सोबत लढ्यात कार्यरत आहेत. या वयातही तरुणाला लाजवेल असा उत्साह आंदोलनादरम्यान त्यांच्यात दिसून येतो. आजही विटा-आटपाडी भागात ट्रॅफिक जाम झालं आणि घोषणा ऐकू आल्या की समजायचं हौसाक्का प्रशासनाला जाब विचारायला मोर्चा घेऊन निघाली आहे. या क्रांतिवीरांगणेने आजवर अनेक लढ्यांचं नेतृत्व केलंय. सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागात उभ्या राहिलेल्या जनलढ्यात त्यांचा सहभाग आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय.

कार्यक्रमाचं प्रास्तविक करताना परशुराम गहिवरला. तो म्हणाला, ‘माझ्या आईचं आयुष्य कष्टात गेलं. तिने मला शेतकर्यांच्या हक्कासाठी लढण्याचा मंत्र दिला. चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांची ती आई होती.‘ पुरस्कार वितरण सभारंभासाठी ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबुराव गुरव, उपायुक्त संजीवकुमार कदम, संपतराव पवार उपस्थित होते. सत्याचा अखंड गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम संपला आणि स्पीकरवर गाणं सुरू झालं… ‘धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं…’

संपत मोरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *