आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचं व्यक्तिमत्त्व रमेश दिघे यांनी ‘आम आणि खास’ या ‘अक्षर प्रकाशन’ तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात उलगडून दाखवलं आहे. या पुस्तकातील काही भाग…

हरियाणातील हिसार जिल्ह्यामधील सिवानी हे एक छोटं गाव. त्या गावातील ‘हिसार कॅम्पस स्कूल’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे एक शिक्षक कोणाची तरी वाट पाहत वर्गाच्या दारात अस्वस्थपणे उभे होते. त्याचं कारणही तसंच होतं. त्या दिवशी वादस्पर्धा होती आणि वक्तृत्वात वाकबगार असलेला तो विद्यार्थी अजून आलेला नव्हता. तेवढ्यात शाळेच्या आवारात कर्कश ब्रेक दाबत स्कूटर थांबल्याचा आवाज झाला. वडिलांच्या पाठीमागे बसलेल्या त्याने पटकन उडी मारली. अंगाभोवती शाल लपेटून वर्गाच्या दिशेने येणार्या त्याला पाहून सर्व विद्यार्थ्यांनी एका स्वरात गलका केला, ‘गुरुजी, अरविंदा आला!’ गुरुजींच्या चिंताग्रस्त चेहर्यावर एकदम हास्य फुललं. ते म्हणाले, ‘ये, अरविंदा ये. मला तुझीच काळजी होती. आज स्पर्धा. त्यात तुला ताप आल्याचं समजलं. मी म्हटलं, तू नाही आलास तर स्पर्धेचं काय होणार?’ तेव्हा आजारी अरविंदाला स्कूटरवरून शाळेत सोडायला आलेले त्याचे वडील आपल्या गळ्याभोवतीचा मफलर नीट करत म्हणाले, ‘व्वा! नाही कसं? स्पर्धा म्हटली की आमचा अरविंदा येणारच! मीच त्याला नेहमी बजावत असतो, कोणत्याही स्पर्धेत कधी मागे राहायचं नाही.’

राजधानी दिल्लीतील सेक्स-ड्रग रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी धाडी घालण्यास नकार देणार्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्री केजरीवाल यांची मागणी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी फेटाळून लावल्यावर केजरीवाल यांनी त्यांच्या सहकारी मंत्र्यांसह दिल्लीतील रेलभवनजवळ २० जानेवारी २०१४ रोजी केलेल्या बेमुदत धरणं आंदोलनात रात्री रस्त्यावर मुक्काम केला. तेव्हा अंगात ताप असूनही, दिल्लीतल्या कडाक्याच्या थंडीत -४० सें. ग्रे. तापमानात ते रस्त्यावरच झोपले, तेव्हा दिल्लीतील जनसामान्यांना केजरीवाल यांच्या काटकपणाचं कौतुक वाटलं. पण स्वतः अरविंद केजरीवालांना त्याचं काहीच वाटलं नाही.

‘आपचा नाहक ताप’ अशी कोटी करत या घटनेची खिल्ली उडवणार्यांना मुख्यमंत्रिपदावर असलेल्या व्यक्तिने असं रस्त्यावर बसण्यासाठी त्याच्यापाशी किती असामान्य धैर्य असावं लागतं याची किंचितशीही कल्पना नसावी. केजरीवाल यांच्यात ही जिद्द जोपासली गेली त्या शाळेतील प्रसंगातून. ही जिद्द आणि गळ्याभोवतीचा मफलर यांचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळालाय. या दोनच गोष्टी नाहीत तर अशा अनेक गुणांचे संस्कार त्यांच्यावर कुटुंबातून झालेत.

अरविंद केजरीवाल या ‘आम आदमी’चा जन्म १९ ऑगस्ट १९६८ रोजी हरियाणातील हिसार जिल्ह्यातील सिवानी गावी झाला. कृष्णाष्टमीला जन्म झाल्याने बालपणी त्यांना ‘कृष्णा’ या नावाने संबोधलं जायचं. तेव्हा कोणाला कल्पना होती की भल्याभल्यांची कृष्णकृत्यं बाहेर काढून ‘विनाशाय दुष्कृताम्’ ही उक्ती खरी ठरवत हा ‘अरविंद’ ‘कमळ’वाल्यांनाच मेटाकुटीला आणेल! गोविंदराम आणि गीतादेवी या दाम्पत्याचा हा मुलगा. दिल्लीतील बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून शिक्षण घेतलेले वडील वीज अभियंता असल्याने बदलीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागायचं. यामुळे हिसार, सोनपत, मथुरा या उत्तर भारतातील गावांमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं.

घरातील वातावरण शिक्षणाला पोषक असल्याने त्यांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला घरातून प्रोत्साहन मिळायचं. वाचायला पुस्तकं आणून दिली जायची. समोर असलेल्या वस्तुंचं आपला मुलगा हुबेहूब चित्र काढतो हे समजल्यावर वडिलांनी त्यांना ड्रॉइंगची वही, पेन्सिल, आणि रंग आणून दिले. अकरा वर्षांचा अरविंद चित्रांच्या वेगवेगळ्या आकारांमध्ये रंगत गेला. या मुलाची अभ्यासाची पद्धत काही वेगळीच होती. आदल्या दिवशी वर्गात शिकवलेल्या धड्याखालच्या प्रश्नांची उत्तरं हा अरविंद सकाळी आंघोळ करताना पुन्हा पुन्हा आठवायचा; म्हणून त्याला आंघोळीला वेळ लागायचा. शेवटी भावंडं बाथरूमचा दरवाजा खटखटायची, तेव्हा कुठे हा भानावर यायचा!

रोजचा शाळेचा अभ्यास करून झाल्यावर क्रिकेट-फुटबॉल यांसारख्या मैदानी खेळांपेक्षा बुद्धिबळातच हा मुलगा जास्त रमायचा. रंजना आणि मनोज ही त्याची दोन भावंडं. यापैकी रंजना या डॉक्टर आहेत तर मनोज सॉफ्टवेअर इंजिनिअर. शाळेत एक हुशार विद्यार्थी म्हणून ख्याती मिळवलेल्या अरविंद यांनीसुद्धा डॉक्टर व्हावं असा घरच्यांचा आग्रह होता. पण अरविंद यांचा कल इंजिनिअरिंगकडे होता. आपल्या आवडीनुसार अरविंद यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी खरगपूर आयआयटीत प्रवेश घेतला. इतर ठिकाणांपेक्षा इथलं वातावरण वेगळं होतं. इथे देशातली परिस्थिती, भ्रष्टाचार, व्यवस्था-परिवर्तन इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर खुलेपणाने चर्चा व्हायच्या. याच सुमारास आधी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून आणि नंतर पंतप्रधान या नात्याने विश्वनाथ प्रताप सिंग यांनी रिलायन्सच्या गैरव्यवहारांना अटकाव केला होता. उत्तर प्रदेशात एका प्रकल्पासाठी अनिल अंबानी यांनी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादन केली होती. त्याला

व्हि.पीं.नी आव्हान दिलं होतं. परंतु दुर्दैवाने त्या काळात हा आजच्यासारखा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकला नाही. परंतु व्हि.पीं.चा साधेपणा आणि रिलायन्ससारख्या बड्या उद्योगसमूहाला जाहीर आव्हान देण्याची वृत्ती यांचा अरविंद यांच्यावर कॉलेज जीवनात मोठा प्रभाव होता.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांनी हिंदी नाट्यविभागाचं अध्यक्षपद स्वीकारलं. या काळात ते तेथील नेहरू हॉलमध्ये राहत होते. कॉलेजात असताना ते झोपडवस्तीतील मुलांना शिकवण्यासाठी जात असत. ही समाज-शिक्षणाची गोडी त्यांच्या मनात त्यांच्या शाळेतील शिक्षिका चोप्रा मॅडम यांच्यामुळे निर्माण झाली होती. अरविंद दहावीत असताना या चोप्रा मॅडम त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करायच्या. त्यांचा सामाजिक दृष्टिकोन या प्रेरणादायी संवादांमधूनच निर्माण होत गेला. खर्या अर्थाने सामाजिक काम करण्याची संधी त्यांना महाविद्यालयीन जीवनात मिळाली. झोपडवस्तीत प्रत्यक्ष वास्तव्य केल्याशिवाय आपल्याला या वस्तीच्या समस्या समजणार नाहीत, असा विचार करून ते तीन महिने स्वेच्छेने झोपडपट्टीमध्येच राहिले. एका बर्यापैकी मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचा मोठा झालेल्या या तरुणासाठी हा अनुभव निश्चितच एखाद्या सहलीसारखा नव्हता.

रमेश दिघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *