राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवरच पुन्हा एकदा हिंदुराष्ट्राची आपली जुनी पिपाणी वाजवली आहे. हे हिंदू राष्ट्र आहे, याची री संघवाले सातत्याने ओढत असतात. खरंतर आता त्याचं अप्रुपही लोकांना वाटत नाहीये. पण तरीही संघाकडून हा खुंटा हलवून बळकट करण्याचा प्रयत्न काही थांबत नाहीये. मोहन भागवत यांनी याबाबतच विधान करून तोच प्रयत्न साकारला आहे. आता त्यावर प्रतिक्रिया उमटत रहातील. या प्रतिक्रिया उमटवत ठेवणं हीदेखील संघाचीच नीती. या देशात बहुसंख्य हिंदू धर्मिय रहातात ही वस्तुस्थिती आहे. यात कोणताही वाद नाही. पण बहुसंख्य हिंदू रहात असले तरी हे हिंदू राष्ट्र गणलं जात नाही, ही संघाची पोटदुखी आहे. आपल्या धर्माचा लोकांना गर्व व्हावा, भुकेऐवजी धर्म महत्त्वाचा वाटावा, धर्म म्हणून त्यांनी एक व्हावं हे संघाचं स्वप्न आहे. या स्वप्नातच गेली अनेक दशकं संघ वावरत आहे. मात्र बदलत्या काळात हे स्वप्न अधिकाधिक कठीण का होतंय याचीच तगमग वाढतेय. त्यातूनच पुन्हा पुन्हा स्वप्नांच्या मागे धावत पळताहेत ही मंडळी.

खरंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि पाकिस्तानही निर्माण झाला. ब्रिटिशांच्या आधी भारत वेगवेगळ्या आक्रमणाखाली गुलामीतच होता. बर्याच वर्षांनंतर या देशातील लोकांनी स्वातंत्र्य अनुभवलं. मात्र हा देश हिंदुस्थान झाला नाही तर भारतच राहिला आणि भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू झाला. जगातील सगळ्यात मोठा लोकशाही देश हा भारताचा लौकिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला छळणारी गोष्ट हीच ठरली. या देशाचा अंमल धर्माने चालावा हे, स्वप्न आज ना उद्या सत्यात आणायचं हा चंग बांधून संघ आणि त्यांच्याशी निगडित सर्व संस्था कार्यरत आहेत. आपलं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर संघ काम करतोय. संघाशी संबंधित विश्व हिंदू परिषद ही सगळ्यात मोठी संस्था. या संस्थेला आता पन्नास वर्षं पूर्ण होतायत. या निमित्ताने देशभर पुन्हा एकदा हिंदुत्वाचा गजर करण्याचा प्रयत्न होतो आहे. धर्मांतर बंदी आणि गोवंश हत्याबंदी या दोन मुद्यांवर आता रान माजवलं जाणार आहे. खरंतर हे दोन्ही मुद्दे घासून गुळगुळीत झाले आहेत. धर्मांतरं हा खरंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आपला मोठा विषय केलाहोता. ही धर्मांतरं म्हणजेकाय? तर आदिवासींना ख्रिश्चन धर्माची दीक्षा देणं. या विरोधात रान माजलं. मध्य प्रदेशात स्टेन ग्रॅहम आणि त्यांच्या मुलांना दारासिंग नावाच्या नराधमाने जिवंत जाळलं. मात्र फाशीची शिक्षा झालेल्या दारासिंगला माफी द्यावी अशी भूमिका स्टेन यांच्या पत्नीने घेतली. कोण योग्य धर्माने वागलं?

गोवंश बंदीची मागणीही अशीच न टिकणारी आहे. खरंतर गोहत्या बंदीचा कायदा आहे. मात्र बैलांचीही कत्तल होता कामा नये, ही मागणी आहे. बीफ हे मुसलमान धर्मियांचं अन्न आहे, यामुळेच हिंदुत्ववादी संघटनांचा या मागणीवर जोर आहे. मात्र केवळ मुस्लिमच नव्हे तर या देशातील मोठ्या प्रमाणात लोक बीफ खातात. ते स्वस्त असतं. त्यामुळे गरिबीशीही त्याचा संबंध आहे. या प्रश्नाला धार्मिकतेच्या चश्म्यातून पहाणं हा मूर्खपणा ठरतो. दुष्काळात तडफडणारी जनावरं जेव्हा शेतकरी बांधव विकायला काढतात तेव्हा ही गोरक्षा करणारी मंडळी कुठे असतात? या प्रश्नावर त्यांची काय उपाययोजना आहे?

असो, या देशात हिंदू बहुसंख्येने आहेत, मात्र ते धर्माने एकत्र येण्याऐवजी ते जातिजातित विभागले गेलेत हे वास्तव आहे. हे हिंदुराष्ट्र का होणार नाही याचं उत्तरही हेच आहे. धर्माच्या नावाने दंगली होतात पण त्यानंतर पुन्हा दंगलखोर आपल्या जातितच परतत असतो. म्हणूनच जातपात पाळू नका असं नुसतं म्हणून होत नाही आणि कर्मकांडांच्या कचाट्यात अडकलेला समाज त्यातून बाहेर आला तर तो धर्मच नाकारतो. त्यामुळे धर्मवाद्यांचे मनसुबे पूर्ण होणं हे कठीण झालंय. खरंतर आता भाजपचं पूर्ण ताकदीचं राज्य आहे. पण ही मतं हिंदुराष्ट्र निर्मितीसाठी मिळालेली नाहीत तर भ्रष्टाचारविरहित विकासाच्या मुद्यावर मिळालीत हे संघ आणि त्यांच्या संघटनांनी लक्षात ठेवायला हवंय. आता धार्मिक तुष्टीकरणाबाबतची कोणतीही आगळीक लोक सहन करणार नाहीत…

 

 

 

 

ते म्हणाले…

तू कर्णधारपद सोडणार आहेस का? हा प्रश्न तुम्ही मला २०११ मध्येही विचारला होता ना? थोडं थांबा अन् बघा. तुम्हाला लवकरच कळेल की, मी किती कणखर आहे अन् किती कमकुवत आहे ते. तसंही मी दुबळा असेन तर याची खबर तुम्हाला मिळेलच. आणि आयपीएलबद्दल मी काहीही बोलणार नाही. तो बीसीसीआयचा विषय आहे. मात्र आयपीएलवर जळू नका.

– महेंद्रसिंग धोनी, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *