लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर सर्वच पराभूत पक्ष चांगलेच बिथरलेत. अशातच आता राज्यात लगेचच विधानसभा निवडणूक येऊ घातल्यात. या निवडणुकीत विजय संपादन करणं सर्वच पराभूत पक्षांसाठी आवश्यक होऊन बसलंय. यामुळेच आता हे सर्व पक्ष कामाला लागलेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष देखील याच प्रयत्नात आहेत. याच प्रयत्नातून मनसेने दादरच्या शिवाजी पार्कात इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘वायफाय’ची सोय केली. मात्र मनसेची ही सोय शिवसेनेने अडवून धरण्याचा प्रयत्न केला. यातूनच मग शिवाजी पार्ककरांना मोफत वायफाय उपलब्ध करून देण्याच्या श्रेयाचा वाद उभा राहिला. हा वाद आरोप-प्रत्यारोपांपर्यंत गेलाय. पण या वादामुळे आणि एकूणच वायफायच्या सुविधेमुळे आगामी विधानसभा निवडणूक जिंकता येईल का, हा खरा प्रश्न आहे… यातूनच मग आता मनसे-सेनेचा हा वायफाय वाद वायफळ आहे का, असा प्रश्नही उभा राहिलाय…

 

 

 

 

 

 

 

yuvraj उच्चभ्रूंना वायफायची गरज नाही!

माझ्यामते वायफाय सुरू करण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणं उपलब्ध होती. शिवाजी पार्कसारख्या भागात उच्चभ्रू लोक  राहतात. त्यांना वायफायची आवश्यकताच नाही. तसंच या सर्व सोयीसुविधा तरुणांना आर्कषित करण्यासाठी सुरू  आहेत. यामुळे हा वाद मला तरी वायफळच वाटतो.

 – युवराज चोपडे, विद्यार्थी

 

 

tejasनिव्वळ वायफळ वाद

निवडणुका जवळ आल्याने सर्वच पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करत स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातच ‘वायफाय’चा मुद्दा हा थेट तरुणांपर्यंत पोहोचवणारा आहे. म्हणूनच सेना-मनसेत श्रेयासाठी चढाओढ सुरू झालीय. मात्र आता तरुणही सजग झाल्यामुळे ते कोणत्याही आमिषांना बळी न पडता, स्वतःचं हित ओळखू शकतात. म्हणून हा वाद निव्वळ वायफळच आहे.

– तेजस दळवी, विद्यार्थी

 

 

nishad विकासाच्या मुद्यांवर वाद घालावा!

वायफाय कोणीही सुरू करू द्या. पण त्याचा नागरिकांना लाभ मिळाला पाहिजे. आता जो सेना-मनसेमध्ये वायफायवरून  वाद सुरू आहे, त्याबद्दल मी इतकंच म्हणेन की, असा वाद घालत बसण्यापेक्षा या दोन्ही पक्षांनी विकासाच्या कामांवर  वाद करावा. मुंबईत पाणी कपातीचा प्रश्न आहे त्या मुद्यावर वाद घालावा.

 – निषाद भुके, विद्यार्थी

 

 

aishwaryaजनतेला सोयी हव्यात वाद नाही…

जनतेला जर वायफायचा खरोखरच उपयोग होणार असेल तर मग त्यावर होणारा दोन्ही पक्षांतील वाद हा बिनकामाचा ठरू शकतो. कारण जनतेला केवळ त्यांच्या सोयीसुविधांशी घेणंदेणं असतं, त्या सोयींमागील होणार्या राजकारणाशी नाही.

– ऐश्वर्या जाधव, विद्यार्थिनी

 

 

shrutiवायफायचा वाद राजकारणासाठीच!

सेना-मनसे यांच्यात वाद होत असले तरी वायफाय सेवा सुरू झाली ही चांगली गोष्ट आहे. सेना- मनसेच्या वादातून  नागरिकांना चांगल्या गोष्टी उपलब्ध व्हाव्यात, असं मला वाटतं. पण हे सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तोंडावरच असे  निर्णय का घेतात? हे राजकारणी लोक राजकारणासाठी वायफायलादेखील सोडत नाहीत, याचंच आर्श्चय वाटतंय.

 – श्रुती फणसे, विद्यार्थिनी

 

 

dhanshreeसुरक्षेच्यादृष्टीने मोफत वायफाय सेवा धोक्याची

ज्या ठिकाणी वायफाय सेवा सुरू केली आहे, त्या ठिकाणी खरोखरच वायफाय सेवेची आवश्यकता होती का? हा खरा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे या मोफत सेवेचा गैरफायदा अतिरेकी तर घेणार नाहीत ना? हा सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न आहे. देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने ही मोफत सेवा धोक्याची आहे, असं मला वाटतं.

– धनश्री साठे, विद्यार्थिनी

 

 

संकलन – तुषार रुपनवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *