मुंबई महानगर पालिका किंवा बीएमसी हा नुसता शब्द जरी कानी पडला तरी लोकांच्या डोळ्यांसमोर बीएमसी हॉस्पिटलमध्ये लागलेल्या लांबचलांब रांगा उभ्या राहतात…, बीएमसीच्या शाळेचं नाव काढलं की, आठवतात ते अवघी चार- पाच मुलं असलेले वर्ग आणि रिकामी बाकं… इतकंच नाही तर बीएमसीच्या शाळेत शिकतो, असं नुसतं मुलांनी म्हटलं तरी त्यांच्याकडे पाहणार्यांची नाकं मुरडतात… महानगर पालिकेच्या शाळांबाबत सामान्यपणे लोकांची असलेली ही प्रतिमा आहे. खरं तर एकूण पालिकेच्या कारभाराबद्दल लोकांमध्ये कमालीची नाराजी आहे… त्यातच शाळांबद्दलच्या या दृष्टिकोनामुळे आता तर या पालिकेच्या शाळांना अखेरची घरघर लागलीय… पालिका शाळांच्या या अवस्थेलानेमकं कोण जबाबदार आहे? पालिका अधिकारी की आपण… तर या प्रश्नाचं उत्तर दोघंही जबाबदार आहेत, असंच आहे.

महानगर पालिकांबद्दल लोकांच्या अशा नकारात्मक दृष्टिकोनामुळेच आज पालिकेच्या शाळांची दुरावस्था झालीय… त्या बंद पडण्याच्या मार्गाला लागलेल्या आहेत. मात्र आता मुंबई महानगर पालिकेने या शाळा जगवण्यासाठी आणि या

शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कंबर कसलीय… खाजगी शाळांचं सर्वत्र पेव फुटलेलं असतानाच पालिका शाळांकडेही विद्यार्थी, पालकांना आकर्षित करण्यासाठी पालिकेने अभिनव योजना राबवण्याचे प्रयत्नही सुरू केलेत… शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव देण्याचा प्रयत्न आता पालिका शाळांमधून होऊ लागलाय… मुंबई महानगर पालिकेने यासाठीचं पहिलं पाऊल टाकलंय ते ग्रँटरोडच्या महानगर पालिकेच्या शाळेत… महानगर पालिकेने पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना कलासंपन्न करण्यासाठी भाषा विकास प्रकल्प रेकॉर्डिंग स्टुडिओची निर्मिती केलीय. महानगर पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी उभारलेल्या या स्टुडिओचा नुकताच उद्घाटन समारंभ पार पडला. या समारंभाला मुंबई महानगर पालिकेचे महापौर सुनील प्रभू, शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार, ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन चंद्रकात देसाई, ‘कलमनामा’चे संपादक युवराज मोहिते, शिक्षणाधिकारी शांभवी जोगी आणि ज्यांच्यामुळे या स्टुडिओ उभारणीला गती मिळाली ते शिक्षण उपायुक्त सुनील धामणे असे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचं उद्घाटन महापौर सुनिल प्रभु यांच्या हस्ते झालं.

पालिकेच्या या स्टुडिओची एक कहाणी आहे. काही वर्षांपूर्वी पालिकेकडून उभारण्यात आलेला हा स्टुडिओ वापरात न आल्यामुळे पूर्णपणे कोसळण्याच्या स्थितीत होता. अशातच पालिकेच्या वरिष्ठांनी या स्टुडिओला एक तर बंद करा अथवा तो दुरुस्त करून कार्यरत करा, असा निर्वाणीचा आदेश काढला… या आदेशाचं पालन करत शिक्षण उपायुक्त सुनील धामणे यांनी हा बंद पडलेला स्टुडिओ पुन्हा सुरू करण्याचा निर्धार केला… मात्र तेव्हा त्यांच्याकडे संगीतक्षेत्रातील आणि स्टुडिओच्या कामामध्ये जाणकार असणारी व्यक्तिच नव्हती… अशातच पालिका शाळेतच संगीत शिक्षक असलेल्या चारूहास दळवी यांच्याविषयी धामणे यांना माहिती मिळाली… संगीतासाठी अविरत झटणारे दळवीसर यांनादेखील जेव्हा स्टुडिओची बातमी कळली तेव्हा त्यांनीही धामणे यांची भेट घेतली… आणि लागलीच या अभूतपूर्व स्टुडिओच्या उभारणीच्या कामाला सुरुवात केली… तब्बल तीन वर्षांच्या अथक मेहनतीनंतर अखेर मुंबई महानगर पालिकेच्या शाळांसाठीचा हा मरणासन्न झालेला स्टुडिओ पुन्हा एकदा जिवंत झाला…. शिक्षण उपायुक्त सुनील धामणे आणि संगीत शिक्षक, अभ्यासक चारूहास दळवी यांच्या प्रयत्नांमुळेच आता पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना संगीताचाही अभ्यास करता येणार आहे. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयत्न म्हणूनच खूप स्तुत्य आहे…

‘स्टुडिओ म्हणजे ज्या ठिकाणी ताल, सूर, वाद्य या संगीतातील गोष्टी जिथे समजतात असं ठिकाण…’ या चारूहास दळवी यांच्या वाद्यातून आणि संगीतातून प्रेरणा घेऊन आता महानगर पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संगीताचे धडे गिरवू लागले आहेत.

या स्टुडिओच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. कलाकार म्हणजे काय? हे समजावून सांगताना त्यांनी कलाकाराचं महत्त्व आपल्या खास शैलीत सांगितलं. पालिकेच्या शाळांचं स्वरूप बदलण्यासाठी कायमस्वरूपी प्रयत्न करायचे आहेत, असंही त्यांनी सांगितलं. ‘कलमनामा’चे संपादक युवराज मोहिते यांनीदेखील पालिका शाळांमधील आपला अनुभव सांगितला… ‘मीही महानगर पालिकेच्या शाळेतून शिकलो आणि आज मी ज्या ठिकाणी येऊन पोचलो आहे ते केवळ या शाळेतून घेतलेल्या अनुभवामुळेच…’, अशा शब्दांत युवराज मोहिते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं…

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नितिन चंद्रकात देसाई यांनी आपल्या जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी मुलांना कला, कलाकार यांच्याबद्दल मार्गदर्शनही केलं…

अशाप्रकारे मुंबई महानगर पालिकेने विर्द्यार्थ्यांसाठी केलेला हा प्रयत्न लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणू शकतो आणि महानगर पालिकेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या स्पर्धात्मक युगात वाव मिळवून देऊ शकतो, हे निश्चित…

विशाल पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *