सासवडमधील अखिल भारतीय साहित्य संमेलन वादाचं सूप वाजवत पार पडलं. अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न केलाआणि ते टीकेचेधनी झाले. आपण पुरोगामी आहोत, काही झालं तरी विचारांशी बांधील आहोत, आपल्या समताधिष्ठित जाणिवा तीव्र आहेत, असं म्हणवणारी माणसं वेळ येताच कशी कच खातात याचा यानिमित्ताने पुन्हा एकदा साक्षात्कार झाला. त्यानंतर त्यांना आपली भूमिका पटवून देण्यासाठी बराच द्राविडी प्राणायाम करावा लागला, आणि दिलगीरीही व्यक्तकरावी लागली. खरंतर फ. मुं. शिंदे यांच्याकडून अशी अपेक्षा असल्यानेच ते टीकेचेधनी झाले. दाभोलकर हे ‘साधना’चे संपादक, साहित्यिक, विचारवंत होते. ज्या पद्धतीने त्यांचा खून करण्यात आला त्याने देशभर संतापाची लाट उसळली. कोणती प्रवृत्ती या खुनामागे आहे हेही उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. या सनातनी प्रवृत्तीचा निषेध करण्याची संधी असताना फमुंनी कच खाल्ली याचं सगळ्यांनाच दुःख झालं. सनातनी प्रवृत्तीला ते घाबरले की आयोजकांच्या दबावापुढे ते झुकले?

साहित्य संमेलनं ही वैचारिक, साहित्यिक चर्चेचे मंच आहेत. समाजाच्या विविध पैलूंवर साहित्यिकांनी मतप्रदर्शन करावं, मानवी हक्कांच्या बाजूने दिशादर्शन करावं अशी अपेक्षा असते. मात्र ही अपेक्षा आता ठेवू नये अशी परिस्थिती झाली आहे. भूमिका घेणारे साहित्यिकही इतिहासजमा झालेत अशी परिस्थिती आहे. दिवसेंदिवस साहित्यिक बिनकण्याचे होत जातायत. आता केवळफालतू विनोद करा, कोट्या करा आणि टाळ्या, हशा घ्या एवढाच काय तो मामला. आता साहित्यिकांपेक्षा आयोजकांचा मान मोठा असतो. साहित्यिक दुय्यम. चिपळूणच्या साहित्य संमेलनात आडमुठ्या आयोजकांचा अनुभव सगळ्यांनाच आला होता. या आयोजकांनी परशुरामाच्या नावाने काय नंगानाच केलातेही काही नवीन नाही. खरंतर साहित्य संमेलनापेक्षा परशू अधिक गाजला. प्रा. नागनाथ कोत्तापल्ले यांच्यासारखा परिवर्तनवादी आणि चळवळींशी संबंधित असणारा विचारवंत अध्यक्ष असताना उन्मत्त आयोजकांनी त्यांनाही जुमानलं नाही. आपली धर्मवादी भूमिका कायम ठेवत हमीद दलवाई यांच्या घरावरून निघणारी दिंडी रद्द केली.आपला कंडू शमवण्यासाठी गुपचूप मंचावर एका खुर्चीच्या खाली परशुरामाची पूजा केली.

साहित्य संमेलन करण्यासाठी आपल्या अटींवर, साहित्याची जाण नसणारा प्रायोजक, साहित्यापेक्षा जुनाट वळणाच्या परंपरा मानणार्या संस्था याच अधिक प्रभावी ठरत आहेत. प्रस्थापित साहित्य संमेलनातील या अधोगतीवर गेली अनेक वर्षं टीकेची झोड उडते आहे. या अ.भा.संमेलनांवर अनेकांनी वारंवार टीका केली आहे. त्यातून समांतर अशी संमेलनं सुरू झाली आहेत. यापैकीच एक महत्त्वाची संस्था म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषद. साहित्य संमेलनातील सगळा बडेजाव टाळून कोकणाच्या चार जिल्ह्यांत तरी ‘कोमसाप’ने आपलं वेगळेपण जपलंय. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी पुढाकार घेऊन ‘कोमसाप’ची स्थापन केली. गेली १५ वर्षं अव्याहतपणे जमेल त्या पद्धतीने ‘कोमसाप’ची संमेलनं सुरू आहेत. मात्र वैचारिक तडजोडीतून तेही सुटलेले नाहीत.

‘कोमसाप’चं १५ वं कोकण मराठी साहित्य संमेलन महाड येथे होत आहे. रायगड हा ऐतिहासिक जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी इथेच आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह इथेच केला. याच भूमीत आता ‘कोमसाप’चं संमेलन होत आहे. मात्र हे संमेलन वादात अडकणार असं दिसतंय. याचं कारण असं की या संमेलनात ‘तीर्थरूप अप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी’ यांची उपस्थिती. साहित्यिकांच्या या संमेलनात राजकारण्यांना स्थान असता कामा नये असा वाद महाराष्ट्रात दीर्घ काळ चालला. मात्र म्हणून परिस्थितीत काही फरक पडला नाही. संमेलन म्हटलं की तामजाम हवा. आणि त्यासाठी पैसा हवा. यामुळेच राजकारण्यांशिवाय संमेलनं होऊच शकत नाहीत हे गणित आहे. हे आता तसं अंगवळणीच पडलं आहे. पण चिपळूण साहित्य संमेलनापासून आता या संमेलनाला धार्मिक रंगही आला आहे. ‘कोमसाप’ने तथाकथित अध्यात्मिक गुरूंनाआपल्या मंचावर स्थान देण्याचं ठरवलं आहे.

‘कोमसाप’च्या संमेलनात धर्माधिकारी यांना सन्माननीय अतिथी म्हणून बोलावण्यात आलं आहे. त्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे. खरंतर धर्माधिकारी यांनी अध्यात्माच्या नावाखाली काय उपद्व्याप केलायते जगजाहीर आहे. धार्मिक हिटलरशाही धर्माधिकारी यांनी चालवली आहे. माजी मंत्री दत्ता खानविलकर यांनी याबाबत धर्माधिकारी यांचा सगळा पर्दाफाश केलेला आहे. त्यामुळेच नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे सरकारमार्फत बांधण्यात येणारं स्मारक बारगळलं आहे. या भागातील लोकांना बैठकीच्या नादी लावून त्यांना जातिच्या चौकटीत ठेवण्याचं काम धर्माधिकारी करत आहेत. घरातील कोणताही निर्णय धर्माधिकारी यांना विचारल्याशिवाय करायचा नाही असा अलिखित नियमच करण्यात आला आहे. अगदी कुणीकुणाशी लग्न करायचं तेही धर्माधिकारीच सांगतात. आंतरजातीय विवाहाला अजिबात मान्यता देत नाहीत. तथाकथित उच्च जातितील लोकांनी मागास, अगदी आगरी समाजातील मुला-मुलींशी लग्न करायला धर्माधिकारी परवानगी देत नाहीत. जातिव्यवस्था बळकट करण्याचं काम धर्माधिकारी यांनी केलंय. इथल्या जात पंचायत बळकट होत असून त्यामुळे एकेकासमाजाला नाडणार्या कू्रर घटना समोर येत आहेत. या सगळ्याला धर्माधिकारी हेच जबाबदार आहेत. नानासाहेबांनी हे सुरू केलं आणि आता त्यांचे चिरंजीव ही अध्यात्माची घराणेशाही पुढे चालवत आहेत. या सगळ्या प्रकाराला साहित्याच्या मंचावर पाठीशी घातलं जात आहे.

ज्या भूमीत महाराजांनी समताधिष्ठित राज्याचा वस्तुपाठ घालून दिला, ज्या भूमीत चवदार तळ्याचं पाणी हाती घेऊन बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेला मुठमाती दिली, जिथे अन्यायी मनूस्मृती जाळून टाकण्यात आली… तिथेच धर्माधिकारी यांचा धार्मिक अंमल सुरू असून त्याला राजकीय, साहित्यिक पाठबळ मिळतेय हे विदारक सत्य आहे. आयोजकांपुढे साहित्यिक हतबल आहेत?

‘कोमसाप’च्या या संमेलनाचे अध्यक्ष हे जयंत पवार आहेत. पवारांचं साहित्य आणि सामाजिक बांधिलकी ही वादातीत आहे. मात्र ते याबाबत काय भूमिका घेतात हा उत्सुकतेचा विषय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *