जगात अनेक ठिकाणी युद्धं चालली आहेत. लढाया थांबण्याची मुळीच चिन्हं नाहीत. बहुतेक संघर्ष धर्माची ढाल हातात घेऊन होत आहेत. अशावेळी, असा एक देश आहे की, ज्याच्याकडे स्वतःचं सैन्यच नाही, असं कोणी सांगितलं, तर त्यावर विश्वास बसणं कठीण जाईल. पण ते सत्य आहे, कोस्ट रिका नावाचा मध्य अमेरिकेतला चिमुकला देश. पनामा आणि निकरॉग्वा या देशांच्या शेजारचा, सुमारे २० हजार चौरस मैल क्षेत्रफळ आणि लोकसंख्या जेमतेम ३५ लाख. त्यापैकी १० टक्के जनता सॅन होजे या राजधानीच्या शहरात रहाते. कोस्ट रिकाला नयनरम्य किनारा लाभला आहे. तिथे पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय. तिथलं वातावरण अतिशय मोकळं आणि आरामशीर असतं.कोणालाही कसलीही घाई नसते! हॉटेल्सचे दर माफक आहेत. सेवा चांगली मिळते. कारण लहानपणापासूनच प्रत्येक लहान मुलाच्या मनावर बिंबवलं जातं की, परदेशी पर्यटक हे सर्वात महत्त्वाचे, त्यांच्यामुळे आपल्याला परकीय चलन मिळतं. त्यांच्या येण्यामुळे आपल्या नोकर्या शाबूत रहातात. त्यांना खूश ठेवण्यातच देशाचं भलं आहे.

ज्या लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात रहाण्याची आवड आहे, त्यांच्याकरता कोस्ट रिका (Costa Rica) हा देश म्हणजे नंदनवनासारखाच आहे. कारखाने नाहीत म्हणून प्रदूषण अगदी नगण्य. स्थानिक मंडळींचं राहणीमान इतर दक्षिण अमेरिकेतल्या देशांपेक्षा बरंच चांगलं आहे. त्यांना तुम्ही कसे आहात असा प्रश्न विचारायचाच अवकाश, Pura Vida असा स्पॅनिश भाषेतून हमखास प्रतिसाद मिळालाच पाहिजे. त्या दोन शब्दांचा अर्थ म्हणजे स्वच्छ आयुष्य (Pure Life) बर्याचजणांना इंग्लिश, फ्रेंच, जर्मन आणि इटालियन यापैकी दोन तरी भाषा येत असतात. त्यामुळे तिथे युरोपातले पर्यटक भरपूर संख्येने जातात. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात, दुःखाच्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. तरीही त्याचं उत्तर स्वच्छ आयुष्य हेच रहातं! सर्व जगातल्या १८५ देशांत कोस्ट रिकाच्या जनतेने अनेक आंतरराष्ट्रीय सर्व्हेज्मध्ये आम्ही सर्वात सुखी लोक आहोत असं सातत्याने दरवर्षी जाहीर केलं आहे.

सॅन होजे ही जरी राजधानी असली तरी सरकारला ती सोईस्कर कशी करता येईल याचा पुरेसा अंदाज आलेला नसावा. गाड्यांची रस्त्यांवर गर्दी होऊ नये म्हणून लायसेन्स प्लेटनुसार ठरावीक दिवशीच त्या गाड्यांना शहरात जाण्यास परवानगी मिळते. प्लेटच्या नंबराच्या शेवटी दोन किंवा दोनाने भाग जाणारा आकडा असेल तर ती गाडी समतारखेलाच राजधानीमध्ये येऊ शकते. बर्याच रस्त्यांना नावंच नाहीत. त्यावर असलेला पुतळा वा स्मारक किंवा बाग, एखादी सुरेख इमारत अशाच खुणा सांगत शहराचा अधिकृत नकाशा मिळतो! म्हणजे किती अनौपचारिक वातावरण असतं हे ध्यानात येईल. रस्त्यांवर ठिकठिकाणी कॅफेज् दिसतात. तिथे मिळणारी कॉफी ही अत्यंत चवदार असते. एक कप घेतल्यावर अवर्णनीय समाधान लाभतं.

हॉटेलात बॅगा उघड्या टाकून जा, चोरीची भीती नाही. कोणत्याही दुकानात शिरा, तिथे फसवणुकीची शक्यता नाही. टोरीगेओरो या भागातल्या जंगलामध्ये पर्यटक हमखास जातात. जातानाचा रस्ता हा जरी अनेक वळणांनी भरलेला असला तरी कुठेही खड्डे आढळणार नाहीत. चहूबाजूला हिरवीगार रानं, वनराई किंवा लहानमोठे डोंगर. संपूर्णतः झाडींनी भरलेले. वाटेत अनेक लहान लहान खेडेगावं लागतात. त्यामध्ये जेमतेम २० ते २५ घरं असली तरी एक शाळा आणि एक चर्च हे असायलाच हवं. व्हरांडा हा घराचा दर्शनी भाग जास्तीत जास्त कसा आकर्षक करता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष दिलेलं असतं. वाटेत तुम्ही ताज्या नारळाचं पाणी पिण्याकरता थांबलात, तर विक्रेता तुमच्या हातावर चार बिस्कीटं वा चॉकलेट्स तरी ठेवेलच. आपल्या देशात आलेला प्रत्येक परदेशी नागरिक त्याच्या मायदेशास परतताना कोस्ट रिकाची स्तुतीच करेल, असं आतिथ्य ठायीठायी दिसतं.

एकदा तुम्ही जंगलात शिरलात की निसर्गाचे अनेक चमत्कार दिसतात. विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, तर्हेतर्हेची फळं आणि फुलं, एका जातीच्या सरड्यांना तर Jesus christ Lizards अशी संज्ञा आहे. का? तर ते पाण्यावर चालू शकतात! भोवताली असलेल्या झाडांवर अनेक माकडं आपल्या ‘मर्कटलीला’ करत असतात. त्यांच्या वाट्याला माणूस गेला नाही तर तीही माणसांची दखल घेत नाहीत! कुठे मोठ्या डबक्याच्या किनार्यावर आठ फुटी कासव आरामात विश्रांती घेत पहुडलेलं असतं. देशाची तमाम जनताच जर आरामशीर आयुष्य व्यतीत करत असेल तर ते कासव तरी कसं अपवाद असणार? ‘जंगल मे मंगल’ म्हणजे काय हे कोस्ट रिकाची सहल केल्याशिवाय समजणार नाही. भोवतालचं सर्व जगच मंगलमय वाटतं. तणाव दूर होतो. मनात विशुद्ध आनंद दाटून येतो.

हॉटेलात परतण्याची वेळ झाली. खोली अतिशय स्वच्छ आणि प्रशस्त. तिथे डास-पिसवा-चिलटं नाहीत. खोली वातानुकूलित नाही कारण त्याची गरजच नाही. वायफाय वगैरे सुविधा नाहीत. कारण त्या वापरताना तुम्ही पुन्हा शहरास जोडले जाता. हॉटेलच्याभोवती अनेक छोटे कालवे, त्याच्यामधून सफर करण्याकरता होड्याही मिळतात. काही स्वयंचलित तर काही पॅडलवाल्या. ‘संगम’ चित्रपटातल्या राज कपूरच्या ‘मेहबुबा, ले जाऊंगा एक दिन’ असं वैजयंतीमालेस सुनावणार्या गाण्यासारखीच सिच्युएशन! होड्यांतून प्रवास करताना लाइफजॅकेट घालणं सक्तिचं. आपणच बोट चालवत नेली की मन मानेल तसं भटकता येतं. चुकण्याचा प्रश्नच नाही. पाण्यातून होडी वल्हवत जाण्याची मजा काही औरच. सूर्यप्रकाश सौम्य. भोवतालचं पाणी अगदी नितळ, मुख्य म्हणजे डास नाहीत. हा सुद्धा एक चमत्कारच मानायला हवा.

काटुंगी नावाचं पाण्यावरच तरंगतं एक रेस्टॉरण्ट आहे. तिथे खाण्याचा अनोखा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालेली असते. सेलफोनवरून नजीक आलेल्या कासवाचा फोटो घेणं आणि बोटीतून उतरण्याची घाई करणं या दुहेरी अवस्थेत जर तुमचा फोन पाण्यात पडला तर तो रसातळालाच जातो किंवा कोणा अनभिज्ञ जलचर प्राण्याच्या पोटामध्ये. भात आणि बिन्स हे कोस्ट रिका देशाचं राष्ट्रीय अन्न आहे! आश्चर्य म्हणजे देशात कुठेही ते घेतलं तरी त्याची चव सारखीच असते. तिथे कोणी राष्ट्रीय आचारी आहे की काय, अशी शंका येते! या रेस्टॉरण्टमध्ये बेंजो, बाँगो वगैरे वाजवणारे कलावंतही असतात. तुम्ही शिफारस केलेली गाणी सुरेखपणे वाजवून दाखवतात आणि जेवणात आगळाच रंग भरतात. पॅरॅस्को म्हणजे Paradise या स्वर्गात अश्वारोहण करण्याचीही सोय आहे. कॉफीची लागवड केलेली शेती, लहानमोठे अनेक धबधबे या सर्व नयन आल्हाददायी गोष्टीही पाहण्यास खूप मौज वाटते.

पक्षांची टेहेळणी (Bird Watching) या गोष्टीला भारतात आता कुठे थोडीशी प्रतिष्ठा मिळायला लागली आहे. पण कोस्ट रिकाची सहल केवळ याच एका कारणाकरता करणारे अमेरिकन आणि युरोपियन कमी नाहीत, कारण या देशात सुमारे ९०० विविध प्रकारचे, ढंगाचे आणि रंगांचे पक्षी पहायला मिळतात. पाण्यावरून राफ्टिंग करत आणि भसाड्या आवाजात मोठमोठ्याने गाणी म्हणणारे लोक दिसले की त्यांना बघे लोक हसून, टाळ्या वाजवून दाद देतात आणि उत्तेजन देतात. कारण देशात आलेला प्रत्येकजण सुखद स्मृतीच घेऊन परतला पाहिजे ही स्थानिक लोकांची ठाम भूमिका असते.

दरवर्षी सप्टेंबर महिन्यात एकाही हॉटेलात एकही रिकामी खोली आढळणार नाही. कारण तो कासवांचा अंडी घालण्याचा सिझन असतो. नशिबात असेल तर एखादं अंडं फोडून त्यामधून इवलंसं पिल्लू बाहेर येतानाही दिसतं. डुगडुगत्या चालीने ते पाण्यापर्यंत चालत जातानाचं दृश्य अगदी दुर्मीळच मानलं जातं. अशा वेळेस पर्यटक फिल्म घेऊन त्या अनोख्या प्रसंगाचं चित्रीकरण करतात.

विठ्ठलराव कामतांनी त्यांचं मुंबईतलं ‘ऑर्किड हॉटेल’ इकोटेल बनवलं तेव्हा त्यामागची निसर्गप्रेमाची प्रेरणा त्यांना समजावून सांगावी लागली होती. कचरा न करणं ही त्यामागची भूमिका कोस्ट रिकामधील सर्वच हॉटेलांतून पाळली जाते. कचरा झाला की त्याचं पृथक्करण करणं, त्यावर प्रक्रिया करणं हे झपाट्याने होतं. त्याचमुळे हा देश संपूर्णपणे प्रदूषणमुक्त आहे! पाण्याचादेखील पुनःपुन्हा वापर करण्याच्या शास्त्रीयदृष्ट्या यशस्वी झालेल्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अव्वल दर्जाच्या असलेल्या भरपूर योजना पाहून सर्वसामान्य टुरिस्ट थक्क होतो आणि हे माझ्या देशात का केलं जात नाही म्हणून खंतही व्यक्त करतो. देशात पोलीस आहेत पण सैन्य नाही! कारण आपल्या देशावर कोणी आक्रमण करणारच नाही असा इथल्या राज्यकर्त्यांचा विश्वास आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष विसर्जित करा आणि सैन्य बरखास्त करा असा सल्ला राष्ट्रपिता गांधीजींनी दिला होता म्हणे, पैकी पहिला भाग काँग्रेसचे राज्यकर्तेच आपल्या कर्तृत्वाने प्रत्यक्षात आणण्यास उद्युक्त झालेले दिसताहेत. सैन्याचा अभाव ही मात्र कोस्ट रिकाने साध्य केलेली अजब परीकहाणी आहे. त्याची अनुभूती घेणं हे ज्याला जमू शकेल, त्याने अवश्य प्रत्यक्षात उतरवावं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *