आधीच्या लेखात आपण सम्राट अकबराचा काळाच्या पुढे गेलेला धर्म चिकित्सक दृष्टिकोन पाहिला आहे. या लेखात आपल्याला १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातील मुस्लिमांचा सहभाग आणि दृष्टिकोन पहायचा आहे. १८५७ साली धर्मपरायण मुस्लिमांनी देव, देश आणि धर्म यासाठी दिलेली कडवी झुंज आपण पहाणार आहोत.

पूर्वपिठीका

सावरकरवादी अशी शेषराव मोरेंची ख्याती आहे. प्रा. मोरेंना सावरकरांचे आंधळे अनुयायी मात्र म्हणता येणार नाही. १८५७ चा जिहाद हे मोरेंचं पुस्तक याची साक्ष आहे. ४०० पानांचं हे पुस्तक तब्बल २०० इंग्रजी, मराठी ग्रंथांचा अभ्यास करून लिहिलेलं आहे. पुस्तकातली एकही ओळ संदर्भाशिवाय लिहिलेली नाही. सावरकरांच्या २५ व्या वर्षी लिहिलेल्या स्वातंत्र्यसमर या ग्रंथात १८५७ मध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्य झालेलं होतं असं प्रतिपादित केलेलं होतं. झाशीची राणी आणि नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली १८५७ चा उठाव झाला असं सावरकरांचं प्रतिपादन आहे. मात्र १८५७ च्या उठावात मुस्लिमांची स्वातंत्र्यप्रियता आणि इस्लामी बंधुत्व व्यक्त झालं होतं – त्याकडे सावरकरांचं दुर्लक्ष झालं आहे. मोरेंचे निष्कर्ष सावरकरांशी जुळणारे नाहीत. १८५७ चा जिहाद या पुस्तकातले मोरेंचे सर्व विचार पटोत अथवा न पटोत पण त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे निश्चितपणे विचार करण्यासारखे आहेत.

सम्राट अकबर ते १८५७ ः

मौलवींची गुरूशिष्य परंपरा

अकबराचा सेक्युलर उदारमतवाद धार्मिक मुस्लिमांना मुळीच आवडला नाही. पण इस्लामच्या धार्मिक परंपरेतही कडवी स्वातंत्र्यनिष्ठा आहेच.

सम्राट अकबर खर्या इस्लामपासून मार्गभ्रष्ट झाला आहे. त्याला पदच्युत करण्यासाठी शेख सय्यद अहमद सरहिंदी या महान धर्मपंडिताचा उदय १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात होतो. राष्ट्रीय पुरुष म्हणून त्यांचा गौरव करताना मौलाना आझाद म्हणतात – ‘सरहिंदीमुळे अकबराच्या गैरइस्लामी दिने इलाही चळवळीवर प्राणांतिक आघात झाला आणि ती कायमची नष्ट झाली.’ सरहिंदींचे महान विचार होते – राम आणि रहीम एकत्र मानणं हा मूर्खपणाचा कळस होय. इस्लामचा मान हा काफिरांचा अवमान करण्यात आहे. झिजियाचा खरा उद्देश काफरांची मानहानी करणं हा आहे. सत्यधर्माचा मार्ग (शरा) हा तलवारीच्या धारेखाली असतो. मुजादिद अल सानि या नावाने इतिहास सरहिंदींना ओळखतो.

अकबराचा मुलगा (सलीम) जहांगीर हा बापाचंच सेक्युलर धोरण पुढे चालवू पहात होता. त्याविरुद्ध सरहिंदींनी गर्जना केली- ‘सैन्याने आता जहांगीर बादशहाच्या आज्ञा पाळू नयेत.’ आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी सरहिंदींनी शेकडो शिष्य देशभर पाठवून दिलेले होते. जहांगिर भडकला. त्याने सरहिंदींना सरळ बेड्या ठोकल्या. दिल्लीच्या उच्चासनावर बसलेल्या जहांगिराला आपल्या मांडीखाली काय जळतंय याची कल्पना नसावी. सरहिंदींच्या शेकडो प्रचारकांनी आपलं काम चोख बजावलं होतं. सैन्यावरील सरहिंदींची पकड असंतोष पैदा करू लागली. झक मारत जहांगिर सरहिंदींना सोडतो; एवढंच नव्हे तर सैन्याचे प्रमुख धर्मोपदेशक म्हणून त्यांची नियुक्ती करतो. इथून सुरू होतो इतिहासाचा एक वेगळा अध्याय. मुल्ला-मौलवींच्या सैन्यावरील पकडीची बखर. धर्मगुरूंच्या राजकीय उलाढालींचा इतिहास. सरहिंदींच्या शिकवणीला आलेलं गोंडस फळ म्हणजे शिष्योत्तम औरंगजेब होय.

औरंगजेबाचं राज्य पुढे उताराला लागलं. पुढचं शतक मुघल साम्राज्याच्या र्हासाचं होतं. मराठे शिरजोर बनू लागले. सरहिंदींची विचारकूस जन्म देते शाह वलिउल्लाह यांना (१७०३ ते १७६२). पानिपतच्या तिसर्या युद्धासाठी अब्दालीला आमंत्रण देताना ते लिहितात – ‘… थोडक्यात येथील मुस्लिमांची स्थिती शोचनीय झाली आहे. राज्य व प्रशासनाचे सर्व नियंत्रण काफरांच्या हातात गेले आहे. श्रद्धाहीन काफरांच्या सैन्याला पराभूत करण्यासाठी; हे अमीर; अल्लाहच्या विनम्र सेवकाची प्रार्थना ऐका.’ १७६१चं पानिपत मराठी भाषेत एक वाक्प्रचार बनून उरतं पण त्या आधीच १७५७ सालीच प्लासीच्या लढाईत इंग्लंडचा युनियन जॅक डौलाने फडकलेला असतो. आता भारतभर तोच फडकणार असतो. १७६४ च्या बक्सारच्या लढाईनंतर हे चित्र अधिकच स्पष्ट होतं. त्यावेळी शाह वलिउल्लाह पैगंबरवासी झालेले असतात. त्यांच्या विचारांचा झेंडा घेऊन उभा ठाकतो त्यांचा सख्खा मुलगा. शाह अब्दुल अझीज.

१८०३ साली ब्रिटिश दिल्लीचे स्वामी झालेले असतात. शाह अब्दुल अझीज फतवा जारी करतो – भारत हा आता दार उल हरब (युद्धभूमी) झालेला आहे. त्याला दार उल इस्लाम करणं ओघाने फतव्यात येतंच! दक्षिण आशियाच्या मुस्लीम इतिहासातील सर्वात महत्त्वाचा आणि युगप्रवर्तक फतवा म्हणून याचा उल्लेख मुस्लीम अभ्यासक करतात. ब्रिटिशांना हिंदुस्थानातून हाकलून द्यावं यासाठी पुकारायचा १८५७ चा जिहाद याच फतव्यातून जन्माला आला.

सरहिंदीचे शिष्य वलिउल्लाह – वालिऊल्लाह पुत्र अब्दुल अझीजचे पट्टशिष्य – सय्यद अहमद शहिद – त्यांचे पट्टशिष्य अलिबंधू आणि अलिबंधूंचा पट्टशिष्य म्हणजे बहादुरशहा जफर अशी थेट नाळ जोडता येते.पकिस्तानात ती जोडतात. १८५७ चा उठाव यशस्वी झाल्यास बहादुरशहा जफर हाच हिंदुस्थानचा घोषित सम्राट होता. खुल्क खुदाका, मुल्क बादशहा और अंमलझासी की रानी का अशा टाइपची घोषणा नानासाहेबांनीही दिली होती. १८५७ यशस्वी झाल्यास लोकशाही प्रस्थापित होणार नव्हती किंवा पेशवे हिंदुपदपादशाहीची द्वाही फिरवणार नव्हते. खुल्क कोणाचा? मुल्क कोणाचा? आणि अंमल कोणाचा हे आधीच ठरलं होतं! मुस्लीम इतिहासकार ही गुरूशिष्य परंपरा फार महत्त्वाची मानतात. वलिउल्लह यांची चळवळ आज वहाबी म्हणून ओळखली जाते. या वहाबी चळवळीचा आजही मुस्लीम मनावर जबरदस्त पगडा आहे. या दोनशे वर्षांच्या इस्लामी गुरूशिष्य परंपरेने १८५७ च्या जिहादासाठी भारताची जमीन नांगरून भुसभुशीत करून ठेवली होती.

१८५७ च्या घडामोडीत वहाबी मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. ख्रिश्चनांच्या विरुद्ध धर्मयुद्ध इस्लामच्या परंपरेत होतेच ते पुनरुज्जीवित करण्याचा वहाबींचा प्रयत्न होता. वहाबींची चळवळ ही भारतातील इंग्रज राजवटीची शत्रू होती, यात वादच नाही. पण ती इंग्रज विरोधासाठी जन्मलेली चळवळ नाही. भारतातील मुस्लिमांचं राज्य अबाधित रहावं या प्रेरणेची ती चळवळ आहे. या मूळ प्रेरणेसाठी सुरुवातीला मराठ्यांचा विरोध, शीखविरोध आणि नंतर इंग्रजविरोध हे टप्पे आपोआप निर्माण झाले.

नरहर कुरुंदकर (जागर, २४०)

उठावपूर्व स्थिती आणि कारणं ः

१८५७ चा उठाव घडण्यासाठी तत्कालिक आणि ऐतिहासिक कारणं दिली जातात.

ब्रिटिशांनी संस्थानं खालसा करणं, आर्थिक पिळवणूक, ब्रिटिशांचा धर्मप्रसार अशी १८५७ ऐतिहासिक कारणं दिली जातात. काडतुसाला गाय आणि डुकराची चरबी लावल्याचं धार्मिक कारण दिलं जातं. मुद्दा असा आहे की धार्मिक कारणांनी सर्वसामान्य हिंदू पेटून उठतो काय? औरंगजेबाच्या सैन्यातले किती हिंदू शिवाजी महाराजांना येऊन मिळाले? अधिकतर संस्थानं कोणाची खालसा झाली होती? ब्रिटिशांच्या धर्मप्रसाराने कोण अधिक चिडणार होते? हिंदू की मुसलमान?

शिवछत्रपतींचा महाराष्ट्र थंड गोळ्यासारखा का पडला होता? हा उठाव मुख्यतः उत्तर भारतात झाला. झासी, कानपूर, मीरत, दिल्ली, आग्रा, अलाहाबाद या ठिकाणी प्रामुख्याने कोणाची राज्यं होती?

ब्रिटिशांच्या सैन्याचे तीन विभाग होते. १) मुंबई २) मद्रास ३) बंगाल, सर्व मुख्य उठाव बंगाल तुकडीतच का झाले? त्यातही त्यात घोडदळच का आघाडीवर होतं? बंगाल घोडदळात कोणाची संख्या लक्षणीय होती? हिंदू की मुसलमान?

या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं मोरेंनी प्रस्तुत ग्रंथात लिहिलेली आहेत.

१८५७ चा उठाव हा वस्तुतः ब्रिटिशांविरुद्ध मुस्लिमांनी घोषित केलेला जिहाद होता. हा उठाव सरहिंदी सय्यद अहमदनी ब्रिटिश राजवटीमुळे भारत ‘दार उल हरब’ झालेला आहे म्हणून जे आंदोलन सुरू केलं होतं त्याचं पुनरुत्थान होय. हा उठाव म्हणजे भारताला ‘दार उल इस्लाम’ करण्यासाठी मुस्लिमांनी केलेला प्रयत्न होता.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(समग्र आंबेडकर वाङ्मय खंड ८ पृष्ठ २९५. महाराष्ट्र शासन)

१८५७ घटना कशा घडत गेल्या? ः सावरकर उवाच

१८५७ चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ लिहितेवेळी सावरकर २५ वर्षांचे होते. त्यांनी त्यावेळी इस्लाम धर्माचा अभ्यास केला नव्हता. जिहादचा नीट अर्थही त्यांना त्यावेळी उमगला नव्हता. त्यामुळे सावरकरांचं या उठावातील इस्लामी दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. तरीही त्यांच्याच पुस्तकातली काही वाक्यं या उठावाच्या मूलभूत प्रेरणा व्यक्त करतातच. सावरकर लिहितात ः –

जानेवारी १८५७ ः बातमी पसरली – गायीच्या आणि डुकराच्या चरबीची नवी काडतुसे येत आहेत. ती दातांनी तोडावी लागणार आहेत.

जानेवारी ते मार्च १८५७ ः बातमीबरोबरच क्रांतिचा गुप्त संदेश देणार्या चपात्या फिरवल्या जातात. १८५७ चे स्वातंत्र्यसमरमध्ये या चपात्यांना उद्देशून सावरकरांनी म्हटलं आहे… ‘जा, हे क्रांतिच्या देवदूता, तसाच पुढे जा! आपली प्रियतमा तिच्या स्वातंत्र्यासाठी जिहाद करण्यास तयार झालेली आहे… ही शुभवार्ता तिच्या लेकरांना कळवण्यासाठी दहा दिशांना धावत जा! तीरासारखा पुढे जा!… हे मायावी देवदूता…. (१८५७ – ७५)

१६ मार्च १८५७ ः सादिक अल अखबार या दिल्लीच्या वृत्तपत्राची हेडलाईनः पर्शियातील दरबारी लोकांनी आपल्या सम्राटाला सल्ला दिला की आपण ब्रिटिशांविरुद्ध जिहाद करून हिंदुस्थान जिंकून घ्यावा. याविषयी सावरकर लिहितात – ‘१८५७ चे आरंभी दिल्लीच्या मशिदींवरून याच अर्थी सार्वजनिक जाहीरनामे फडकू लागले!’ फिरंग्यांच्या ताब्यातून हिंदुस्थानची मुक्तता करण्यासाठी इराणी सैन्य लवकरच येत आहे. तेव्हा या काफीर लोकांच्या ताब्यातून मुक्त होण्यासाठी समरांगणात उडी घ्यावी’ (१८५७-६५). हेच सावरकर उत्तरायुष्यात हिंदुत्ववादी झाले. पुढे उत्तरायुष्यात गांधींनी अफगाणिस्तानच्या अमिराला आवताण धाडलं होतं तेव्हा सावरकरांनी पायताण उगारले होते.

क्रमशः

 डॉ. अभिराम दीक्षित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *