२०१० चा जानेवारी महिना मराठी सिनेसृष्टीसाठी नवी सकाळ घेऊन आला. एक तर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’च्या ऑस्करवारीमुळे दोन महिने आधीपासूनच तो चर्चेत होता. आणि इतर तीन मराठी सिनेमे ज्यांची तितकीच जोरात चर्चा सुरू होती, ते जानेवारीत प्रदर्शित झाले. ‘नटरंग’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’, ‘झेंडा’ हे ते तीन सिनेमे. सारे तगडे सिनेमे. सगळ्यांची छान प्रसिद्धी झालेली. सगळेच जानेवारीत या चारही मराठी सिनेमांची आतुरतेने वाट बघत होते.

सारेच सिनेमे ग्रेट निघाले. २०१० चा जानेवारी महिना मराठी सिनेसृष्टी बदलणारा ठरणार असं सगळेच म्हणत होते. आणि नाही म्हटलं तरी हे चारही वेगळ्या प्रकारचे माईलस्टोन सिनेमे आपल्या शैलीतील ट्रेंडसेटर ठरले. पण यातल्या एका सिनेमाने मात्र एक वेगळाच अनपेक्षित सुखद धक्का दिला.

‘नटरंग’च्या निमित्ताने जबरदस्त अभिनय, मराठीत अभावाने दिसणारी ठळक स्टाईल असणारी सिनेमेटोग्राफी, सुंदर आणि प्रभावी दिग्दर्शन आणि अप्रतिम संगीत इतक्या सार्या गोष्टींची एकाच मराठी सिनेमात पर्वणी होती. पण हा सिनेमा सर्वांच्या लक्षात राहिला तो एका गोष्टीसाठी. ती म्हणजे अतुल कुलकर्णीने या सिनेमातील स्वतःच्या व्यक्तिरेखेसाठी आधी कमी करून नंतर वाढवलेलं वजन. बॉलिवूडमध्ये क्वचितच आणि हॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात असं घडतं. आपली सिनेमातील व्यक्तिरेखा जास्तीतजास्त खरी वाटण्यासाठी हॉलिवूडचे अभिनेते वजन कमीजास्त करतात. हा वजन कमीजास्त करण्याचा प्रकार मराठीत जेव्हा ‘नटरंग’मध्ये जाणवण्याइतपत दिसून आला तेव्हा त्या सिनेमाबद्दल आणि दिग्दर्शक, खरंतर त्या संपूर्ण प्रोजेक्टबद्दलच प्रचंड कौतुक वाटून राहिलं.

बॉलिवूडमध्येही हा प्रकार हृतिक रोशनमुळे जाणिवपूर्वक दिसतो. ‘कोई मिल गया’साठी हृतिकने आधी भरपूर वजन कमी केलं आणि नंतर त्याच सिनेमात त्याची कमावलेली पिळदार शरीरयष्टी पहायला मिळाली. मध्येच ‘गुजारिश’साठी वाढवलेलं वजन आणि नंतर ‘क्रिश’साठी कमावलेली जबरदस्त शरीरयष्टी हृतिकला बॉलिवूडमधील एक गुणी अभिनेता बनवण्यास मदतशीर ठरली. आता ‘क्रिश ३’साठी तर तो अशी मेहनत घेतोय की त्यासाठी त्याला दर दोन तासांनी जिममध्ये जावं लागतंय. २००२ मध्ये आलेला आणि अनिल कपूरचं पहिलंच प्रॉडक्शन असलेला ‘बधाई हो बधाई’ सिनेमाही अनिल कपूरच्या वजनातील तफावतीसाठी चर्चेत राहिला होता.

हॉलिवूडमध्ये अभिनेते मात्र याबाबतीत प्रचंड प्रोफेशनल आहेत. थोड्याशा बदलासाठीही ते मेकअपवर अवलंबून राहणं बहुतेकदा पसंत करत नाहीत. काही सिनेमांच्या बाबतीत तर सिनेमे कथेसाठी किंवा दिग्दर्शनापेक्षा अधिक चक्क अभिनेत्यांच्या वजनातील बदलासाठी लक्षात राहिलेले आहेत. ‘अमेरिकन हिस्टरी एक्स’ या सिनेमासाठी एडवर्ड नॉर्टनने वाढवलेलं १६ किलो वजन, ‘कास्ट अवे’साठी टॉम हँक्सने कमी केलेलं २५ किलो वजन, महान दिग्दर्शक स्कोर्सेसीच्या ‘रेजिंग बुल’ सिनेमासाठी महान अभिनेता रॉबर्ट दि निरो याने वाढवलेलं २७ किलो वजन ही हॉलिवूडची काही ठळक उदाहरणं. या सर्व सिनेमांनी इतिहास रचला. पण ‘करेज अंडर फायर’साठी मेट डेमन या अभिनेत्याने कमी केलेलं २३ किलो वजन, ‘चॅप्टर ट्वेन्टी सेव्हन’ सिनेमासाठी जेरेड लेटोने वाढवलेलं ६० किलो वजन ही अशीही काही उदाहरणं आहेत. हे सिनेमे चालले नाहीत किंवा चालले तरी या अभिनेत्यांची कुणी साधी दखलही घेतली नाही. बॉर्न सिरीजसाठी ओळखला जाणारा मॅट डेमन याला नंतर याच भूमिकेमुळे चांगले सिनेमे मिळाले असले तरी तेव्हा ‘करेज अंडर फायर’मधील त्याच्या भूमिकेबद्दल कुणीच कुठे काही बोललं नाही. तेव्हा तो डिप्रेशनमध्ये जाऊन अभिनय सोडण्याच्या मार्गावर होता. चार्लीज थेरोन आणि जवळपास दुपटीने वजन वाढवणारी रेनी झोल्वेगर या काही सुंदर अभिनेत्रींचाही इथे उल्लेख करता येऊ शकतो. कारण त्या सिनेमातील त्यांच्या व्यक्तिरेखेसाठी आपल्या सुडौल बांध्याला आणि प्रतिमेलाही बाजूला सारायला घाबरल्या नाहीत.

कपडे बदलल्यासारखं वजन कमीजास्त करण्याच्या खुबीसाठी इतिहासात नेहमी ओळखला जाईल तो बॅटमॅन सिरीजमधला बॅटमॅन क्रिस्टीअन बेल हा अभिनेता. त्याचा कुठलाही सिनेमा पहा… पंधरा वीस किलोंचा फरक त्याच्या सर्वच प्रसिद्ध व्यक्तिरेखांमध्ये दिसतोच. ‘द मशिनिस्ट’ सिनेमासाठी जवळपास सापळा झालेल्या क्रिस्टीअनने लगेचच पुढच्याच ‘बॅटमॅन बिगिन्स’ सिनेमासाठी ३१ किलोपेक्षा जास्त वजन वाढवलं. या बदलाने सगळ्यांचेच डोळे चमकले.

सर्वात क्रिएटिव्ह करिअर ऑप्शन म्हणून अभिनयाकडे पाहिलं जातं. साहजिकच प्रतिभावंतांची सर्वात जास्त गर्दी या व्यवसायात पहायला मिळते. त्यातही हॉलिवूडसारख्या ठिकाणी जिथे सर्वच अव्वल दर्जाचे तारे आहेत, तेथे इतरांमध्ये चमकून दिसण्यासाठी काही अभिनेते असे शारीरिक सीमा ओलांडताना दिसतात. जगातील सर्व सुखं पायाशी असताना निव्वळ एका व्यक्तिरेखेसाठी तब्येतीची अशाप्रकारे हेळसांड केलेल्या अभिनेत्यांना पाहून अभिनयकलेसंबंधी आदर अजून वाढतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *