समूहाने राहण्यामध्ये जास्त सुरक्षितता आणि आनंद असतो हे जेव्हा आदिमानवाला समजलं, तेव्हापासून तो कळपाने राहू लागला. प्रगतिची क्षितीजं जसजशी विस्तारत गेली तसतसा माणसाचा कल जास्तच साहसी बनला आणि त्याचा हव्यास विशेषतः जमिनीचा वाढला. त्यांतून असंख्य युद्धसंघर्ष झाले. इंग्लंड हे युरोपच्या पश्चिम कोपर्यातलं, उत्तरेकडचं एक लहानसं बेट, पण तेथील दर्यावर्दींनी जगभर प्रवास केला आणि इंग्लंडचं साम्राज्य इतकं विस्तारलं की एके काळी त्यावर सूर्यही मावळत नसे. सुमारे सातशे वर्षांपूर्वी इंग्लंडने ऑस्ट्रेलिया नामक उजाड बेटावर आपले कैदी (त्यावेळचं अंदमानच) पाठवण्यास सुरुवात केली. त्यांनी सुधारणा करून देशाला लौकिक प्राप्त करून दिला. अफाट भूप्रदेश आणि जेमतेम पावणेदोन कोटींची लोकसंख्या. आता भारतीय विद्यार्थ्यांनाही तिथे शिक्षणासाठी जाण्याचा मोह पडत गेला. आणि या घटकेला त्यांची संख्या एक लाखांच्या आसपास आहे. मराठी माणूस हा मुळातच स्थितीप्रिय असल्याने देशांतर करण्यात ते पिछाडीवरच राहिले. सध्यादेखील त्यांची संख्या प्रामुख्याने सिडनी आणि मेलबर्न या शहरांमध्येच अधिक दिसते.

कित्येक वर्षं स्वतःचा जम बसवण्यात गेल्यावर उत्सवप्रिय मराठी भाषिकांना सण, महत्त्वाचे दिवस एकत्र साजरे करावेसे वाटू लागले. संक्रांत, गणेशोत्सव किंवा दिवाळी जी खाजगी स्वरूपात घराघरांतून साजरी व्हायची, ती स्थानिक मंडळं मोठ्या उत्साहाने साजरी करू लागली. त्यामधूनच देशाच्या सर्वच भागांत विखरून परंतु तुरळक वस्तीने राहणार्या मराठी भाषिकांचं अधिवेशन भरवावं अशी कल्पना मूळ धरू लागली आणि तिला मूर्तस्वरूपही आलं. अशी तब्बल सात अधिवेशनं अत्यंत यशस्वीरित्या पार पडल्यानंतर हा तीन दिवस चालणारा हा सोहळा आणखी भव्य स्वरूपात करावा असं उत्साही शरद पाठक आणि त्यांचे सिडनीवासी सहकारी यांनी ठरवलं. त्यानुसार सिडनी शहरात २९ ते ३१ मार्च २०१३ रोजी इनकॉर्पोरेट केलेल्या सिडनी मराठी असोसिएशनतर्फे हा समारंभ आयोजित केला गेला आहे. सिडनीचं जगप्रसिद्ध ऑपेरा हाऊस सर्वांच्या परिचयाचंच आहे. हे शहर म्हणजे अमेरिकेतील न्यूयॉर्क, भारतातलं मुंबई, जपानमधील टोकियो त्याचप्रमाणेच ऑस्ट्रेलिया देशाचं हे आर्थिक केंद्र आहे. बर्याच जणांना ती देशाची राजधानीच वाटते. कारण राजधानी कॅनबेरा त्यामानाने विख्यात नाही.

भले मराठी भाषिक इतर देशांतल्या प्रमुख शहरांतल्या मराठी लोकसंख्येच्या मानाने कमी असतील. परंतु अत्यंत अभिनंदनीय बाब म्हणजे सतत १५ वर्षं सुरू असलेलं मराठी रेडिओ स्टेशन हे सिडनीमध्येच आहे. इथे कायमचं वास्तव्य करणार्या मराठी कुटुंबाना आपल्या मुलांवर भारतीय संस्कार करायचे असतात. त्याचप्रमाणे दुसर्या पिढीला मातृभाषेचा विसर पडू न देण्याबद्दलही ते जागरूक असतात आणि त्याचंच प्रत्यंतर इतकी वर्षं केवळ  स्वयंसेवी वृत्तीने चालवलेल्या मायबोली, प्रेमी मंडळींनी चालवलेल्या मराठी विद्यालयाकडे पाहिलं की येतं. लोकांना मातृभाषेची जपणूक करण्याचं महत्त्व अपार वाटतं, हे प्रेम कोणी शिकवून येत नसतं. ती आंच हृदयातच उमटावी लागते. आमच्या मुलांना मराठी शिकवून काय करायचं, ते तर कधी भारतात जाणार नाहीत असा युक्तिवाद करणार्यांच्या बुद्धिवैभवाची कीव करावीशी वाटते.

गुजराती, दाक्षिणात्य, उत्तर भारतीय जेव्हा परदेशात स्थायिक होतात, तेव्हा ते आपापली मातृभाषा कटाक्षाने आपल्या पुढच्या पिढीस शिकवण्यात गर्क असतात. त्या तुलनेत मराठी भाषिक उणे पडतात हे कटू असलं तरी सत्य आहे. त्याचमुळे अशा वार्षिक अधिवेशनाचं महत्त्व अपार आहे. देशभराच्या कानाकोपर्यात रहात असलेला समाज केवळ मराठी भाषा हा एकच समान धागा घेऊन तीन दिवस एकत्र येतो. करमणुकीचे, प्रबोधनपर त्याचप्रमाणे विचार, प्रवर्तक असेदेखील कार्यक्रम ऐकतो आणि गुण्यागोविंदाने राहतो हेही नसे थोडके! सर्वसामान्य भारतीयांच्या क्रिकेट वेडामुळे ऑस्ट्रेलियाचे जगविख्यात खेळाडू, त्यांनी केलेले विश्वविक्रम ज्ञात असतात आणि सतत सुरू असलेल्या क्रिकेट दौर्यांमुळे साहजिकच त्या देशाबद्दलची आपुलकी निर्माण होते. निदान परकेपणा तरी वाटत नाही. मध्यंतरी वर्णद्वेषापोटी काही ऑस्ट्रेलियन शहरांत भारतीय विद्यार्थ्यांवर जीवघेणे हल्लेही झाले होते, तेव्हा उठलेलं वादळ आता शमलेलं आहे.

सिडनीमधील नियोजित अधिवेशन यापूर्वी झालेल्या अधिवेशनांपेक्षा खूप मोठं असेल अशी संयोजकांची खात्री आहे. ५०० हून जास्त प्रतिनिधी आले म्हणजे डोक्यावरून पाणी गेलं हे मानण्याची प्रथा मोडून या खेपेस त्याच्या तिप्पट प्रतिनिधी जमतील असा होरा आहे. पैकी अकराशे लोकांनी नोंदणीदेखील करून आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे बजेट एकदम फुगलं. कारण सिडनीमध्ये बाराशे प्रेक्षकांची सोय होऊ शकणारे अनेक हॉल्स् आहेत. अगदी शाळांची सभागृहंदेखील तेवढे प्रेक्षक सामावून घेतात. पण संख्या तो आकडा पार करून गेली की मोठे हॉल्सच लागतात आणि त्यासाठी किमान चौपट भाडं तरी मोजावं लागतं. शरद पाठक हे अधिवेशनाचे मुख्य संयोजक. ते गेले कित्येक महिने केवळ अधिवेशनच जगत आहेत. जानेवारी २०१३ मध्ये त्यांनी खास महाराष्ट्र दौरा केला आणि जळगाव, पुणे, नाशिक, चिपळूण या शहरांत संभाव्य प्रायोजकांबरोबर चर्चा केली. हे गृहस्थ सिमेन्स कंपनीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर असले तरी मराठी भाषाप्रेम त्यांच्या नसानसांतून ओसंडून वहात आहे.

अमेरिकेतील मराठी भाषिक अधिवेशनाची परंपरा १९८४ पासून अव्याहतपणे सुरू आहे. कॅनडा आणि अमेरिकेत राहणारे सुमारे चार हजार लोक तरी दर दोन वर्षांनी एकत्र जमतात. तोच आदर्श ऑस्टे्रलियाने ठेवला असावा. पण अमेरिकेत कधीही आयोजित न केलेले उपक्रमदेखील सिडनीमध्ये पहायला मिळतील आणि या वैविध्याबद्दल आयोजकांचं करावं तेवढं कोतुक थोडंच ठरेल. भारतीय मंडळींमध्ये वय जसजसं वाढत जातं तसतसा रक्तदाब आणि मधुमेह यांचाही प्रादुर्भाव होतो, हे लक्षात घेऊन सिडनीकरांनी काही नामवंत मराठी डॉक्टरांचं सहकार्य मिळवून प्रतिनिधींचा रक्तदाब, ब्लड ग्लुकोज आणि कोलेस्ट्रॉल याचंही मापन करण्याची व्यवस्था केली आहे ही प्रशंसनीय बाब आहे. दोन कार्यक्रमांच्यामध्ये जो काही मिनिटांचा फावला वेळ असतो त्यादरम्यान ही तपासणी केली जाईल. ती अर्थात ऐच्छिक असणार आहे.

आपली आर्थिक प्रगती करणं हाच एकमेव उद्देश देशांतर करणार्या मंडळींचा असतो हे उघड गुपित आहे. आपलं रहाणीमान वाढवणं, आर्थिक सुबत्ता मिळवणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच आहे. केवळ त्याच कारणांमुळे भारतातही जनता खेडी सोडून शहरांमध्ये स्थलांतर करते. मुंबई हे मायमोट समजलं जातं. त्यामुळे येथील दीड कोटींची लोकवस्ती तर उपलब्ध असलेल्या सर्व पायाभूत सुविधांचा चुथडा उडवत आहे. नोकरी मिळवण्यासाठी गोष्टी आवश्यक असतात, आपला बायोडेटा कसा आकर्षक करायचा असतो त्याचंही मार्गदर्शन सिडनी अधिवेशनात त्या विषयांत प्राविण्य मिळवलेले तज्ज्ञ लोक करणार आहेत हे सुद्धा आगळेपण नमूदयोग्य आहे. त्यामुळे युवापिढीला योग्य दिशा दाखवली जाईल. याशिवाय जी मराठी मंडळी स्वतःच्या व्यवसायांत आहेत. त्यांच्यामध्ये आपापसांत सामंजस्य, सलोखा आणि सहचर्य (Networking) करण्यासाठीही संयोजकांनी आपली कंबर कसली आहे. त्यामुळे केवळ करमणूक आणि अवांतर गप्पा – त्या तर होणारच. यावर लक्ष केंद्रित न करता होकारार्थी आणि भरीव आणि सकारात्मक दृष्टिकोनही प्रतिनिधींना बहाल केला जाईल.

कोणत्याही भारतीय माणसाला त्याची मुलं वयात आली की त्यांच्याकरता योग्य जीवन साथीदार कसे मिळतील याची फार काळजी लागून राहिलेली असते. ती लक्षात घेऊन तरुण पिढीस एकमेकांसमवेत समय व्यतीत करण्यासाठी कार्यक्रम आहेतच. अमेरिकेतल्या अधिवेशनांची फलश्रुती प्रत्येकवेळी किमान डझनभर विवाह जमण्यात होतच असते. त्यातलं सर्वात ठळक उदाहरण म्हणजे १९९९ साली सॅन होजे येथील अधिवेशनाची परिणीती आघाडीची अभिनेत्री माधुरी दिक्षित हिचा विवाह डॉ. श्रीराम नेने यांच्याशी होण्यात झाली होती आणि या अमेरिकन रामाचा एकेलेपणाचा ‘वनवास’ संपुष्टात आला होता.

’पोटातून हृद्याकडे‘ अशी सुगृहिणीची वाटचाल सुरू असते. ‘रुचिरा’च्या गाजलेल्या पाकपुस्तकाच्या लेखिका दि. कमलाबाई ओगले या कित्येक वर्षं ऑस्ट्रेलियात रहात होत्या. त्यांनी पाकनिपुण अशा गृहिणींची फौजच तयार केली. ’आपणांस जे ठावे- ते दुसर्यांस शिकवावे’ या समर्थांच्या उक्तीनुसार ओगले वारसा पुढे सुरू ठेवण्याकरता काही पाककलानिपुण महिला तयार झाल्या आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदाही तरुण मुलींना मिळू शकेल हे सुद्धा अधिवेशन संयोजकांनी पाहिलं आहे. मराठी माणसाला साहित्याचीही जाण आणि आवड असतेच. ती ध्यानात घेऊन काही स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखक-कवींनाही खास व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाणार आहे. कालिदास क्लबच्या नावाखाली हा उपक्रम वर्षभर सुरू असतोच. त्यावर या खेपेस प्रसिद्धीचा झगझगीत झोत पडणार आहे.

टीनएजर वर्गातल्या मुलांना संगीत-नाट्य-अध्यात्म किंवा उद्योजकता यापेक्षा डान्स करण्यामध्येच जास्त रस असतो. ती बाब लक्षात घेऊन संयोजकांनी त्या गोष्टींसाठी देखील स्पेशल व्यवस्था केली आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कबड्डी, खोखो हे खास मराठमोळे खेळ. अनेक वर्षं परदेशात राहणार्यांनी ते खेळ कित्येक वर्षांपूर्वी पाहिले असल्याने ते आता विस्मरणातही गेले असल्याची शक्यता विचारांत घेऊन तसंच नवीन पिढीस त्या खेळांची पेहचान व्हावी, म्हणून त्यांचंही आयोजन केलं गेलं आहे.

कोणत्याही निःपक्षपाती विश्लेषकास हे मान्यच करावं लागेल की, गेली कित्येक वर्षं शरद पाठक यांनी त्यांच्या सहकार्यांसह अत्यंत काळजीपूर्वक सर्वांगीण विचार करून, अधिवेशनाचं पद्धतशीर नियोजन केलं आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती हे खरं असलं तरी जनसमुदायाच्या व्यापक स्वरूपाच्या आवडी, गरजा आणि हौशी, या सर्वांचा विचार झालेला आहे हे सर्वव्यापी आयोजन सिद्ध करतं.

– डाॅ. ‌विजय ढवळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *